‘शूटिंग’मध्ये चमकणारी ‘धाकड गर्ल’

    दिनांक  23-Jun-2019   


 


नेमबाजीच्या विश्वात सध्या नाव गाजते आहे ते म्हणजे हरियाणाची ‘धाकड गर्ल’ मनूभाकर हिचे. तिने नुकतेच आयएसएसएफ विश्वचषकामध्ये सुवर्णपदक पटकावले.

 

सध्या नेमबाजीमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करण्याचे काम भारतीय नेमबाज करत आहेत. अंजली भागवतनंतर भारताला अनेक नेमबाज प्राप्त झाले. ज्यांनी नेमबाजीच्या विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव कोरले आहे. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाचा इतिहास लाभलेल्या भारतामध्ये पुरुषांसोबत आता महिलाही नेमबाजीमध्ये स्वतःचे नाव कोरत आहेत. अंजली भागवत, राही सरनोबत अशा अनेक भारतीय महिलांनी नेमबाजीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामध्ये अजून एक नाव येते ते म्हणजे हरियाणाची ‘धाकड गर्ल’ मनू भाकर. नेमबाजीच्या कारकिर्दीमध्ये तिने अनेक शिखरे सर केली आहेत. नुकतेच तिने जर्मनीच्या म्युनिच शहरात सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. खेड्यातून आलेल्या या मुलीने नेमबाजी विश्वात अनेक नवीन विक्रम केले. आज जाणून घेऊया तिच्याबद्दल थोडे.

 

मनू भाकरचा जन्म हरियाणातील झज्जर जिल्हातील गोरिया या छोट्याशा गावात झाला. तिचे वडील रॅम किशन भाकर हे मर्चंट नेव्हीमधील मुख्य अभियंता म्हणून काम करतात. तिची आई ही शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. लहानपणापासूनच तिला खेळांची आवड होती. वयाच्या १४व्या वर्षांपर्यंत तिने अनेक खेळांमध्ये पदके मिळवली होती. बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंग तसेच हुयेन लँगलोन आणि मणिपुरी मार्शल आर्टस्मध्ये ती पारंगत होती. या खेळांमध्ये तिने राष्ट्रीयस्तरांवर पदके कमावली. तिचे आजोबा राजकरणसाहेब हेदेखील एक ज्येष्ठ नेमबाज होते. ते ‘रेजिमेंट ३’मध्ये भारतीय सैनिक होते. १९६२ सालचे भारत-चीन युद्ध, १९६५ आणि १९७१ मध्ये झालेला भारत-पाक लढा याचे ते साक्षीदार होते. त्यांनी नेहमी मनू आणि इतर मुलांना कठोर परिश्रम आणि सतत अभ्यास करण्याचे मूल्य शिकवले. ही मूल्ये, ही शिकवण उराशी बाळगून आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मनू भाकरने नेमबाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने सुरुवातीला गोरियातील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमधील छोट्या शूटिंग रेंजमध्ये सरावास सुरुवात केली. या सर्व प्रवासात तिच्या वडिलांनी तिला साथ दिली. मुलीचा सराव व्यवस्थित व्हावा आणि तिला छोट्या-मोठ्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःची नोकरी सोडून मार्गदर्शक म्हणून त्यांनी साथ दिली. ती दिवसातून १० तास सराव करत असे आणि सुट्ट्यांच्या दिवशी ती जास्तीत जास्त वेळ सरावासाठी घालवत असे. इतर खेळाडूंसारख्याच तिलाही अनेक अडचणी आल्या. सरावासाठी पिस्तुल मिळवण्यासाठी तिला झगडावेही लागले.

 

मनू भाकरने स्वतःच्या हिंमतीवर या क्षेत्रात उतरण्याचे ठरवले आणि तिला त्यामध्ये यशही प्राप्त झाले. पहिल्यांदा काही अडचणी आल्यानंतर २०१७च्या ज्युनिअर आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले. यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. त्याचवर्षी झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये नऊ पदके पटकावली. तिने विश्वचषक विजेत्या हिना सिद्धूला पराभूत करून २४०.८ पॉईंट्सचा तिचा विक्रम तोडत २४२.३ पॉईंट्सचा नवीन विक्रम केला. २०१८ मध्ये मेक्सिकोमधील गुडालजरा येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’च्या विश्वचषकामध्ये भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मेक्सिकोच्या अलेजांद्रा झवालाचा दारुण पराभव केला. सोळाव्या वर्षी हे सुवर्णपदक जिंकून ती विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला ठरली. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत तिने १० मीटर एअर पिस्तुल मिश्र संघात आपले दुसरे सुवर्णपदक जिंकले. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल पात्रता फेरीत ‘राष्ट्रकुल २०१८’ खेळामध्ये ३८८/४०० अंक मिळविले आणि अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरली. ‘गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स’दरम्यान महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने २४०.९ गुण कमावले आणि सुवर्णपदक जिंकले. याचसोबत तिने ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये २४०.९ गुणांचा विक्रम केला. २०१८ मध्ये झालेल्या आशियाई गेम्समध्ये तिने २५ मीटर एअर पिस्तुल स्पर्धेच्यापात्रता फेरीत ५९३ गुणांचा विक्रम नोंदवला. परंतु, ती एकही पदक जिंकू शकली नव्हती. तिला गुणतालिकेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 

परंतु, आलेल्या या अपयशाने न डगमगता तिने नेमबाजीचा सराव चालूच ठेवला. पुढे २०१८ मध्येच झालेल्या ‘युथ ऑलिम्पिक’मध्ये १० मीटर पिस्तुल प्रकारामध्ये २३६.५ गुणांची कमाई करत अव्वल स्थान गाठले. १६ वर्षीय मनू भाकर ही ‘युवा ऑलिम्पिक’ खेळांमध्ये सुवर्णपदक मिळविणारी भारतातील पहिली नेमबाज आणि भारतातील पहिली महिला अ‍ॅथलिट ठरली. त्यानंतर २०१९मध्ये मे महिन्यात जर्मनीच्या म्युनिच शहरात सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत तिने सौरभ चौधरीच्या साथीने आणखी एक सुवर्णपदक भारताच्या नावावर केले. तिचा हा खडतर प्रवास आणि कठोर परिश्रम हे खेड्यातील मुलींना तसेच नेमबाजीमध्ये काही तरी करून दाखवण्याची धमक असलेल्या तरुण वर्गासाठी प्रेरणादायी आहे. अशा या हरियाणाच्या ‘सुवर्ण’कन्येला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat