दगा गाफिल असतानाच होतो...

    दिनांक  23-Jun-2019   


 
भारतीय टीमनं अफगाण टीमच्या मॅचआधी विश्रांतीसाठी सरावातून सुट्टी घेतली होती. अफगाण टीमला कमी लेखण्याची चुक भारताला आज महागात पडू शकली असती. अफगाण टीमला भारतीय टीमला आज पराभूत करता आलं नाही पण क्रिकेट शौकीनांची अगदी भारतीयांचीही मनं त्यांनी जिंकली.
 

काळ आला होता पण वेळ नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे... अफगाणिस्तानच्या रुपानं पराभवानं अगदी भारताच्या उंबरठ्यावर येऊन दस्तक दिली, पण नशिब बलवत्तर शमीच्या हॅट्ट्रीकमुळे भारताची लाज राखली गेली. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज टीमना धुळीस मिळवणाऱ्या भारतीय टीमला तळाशी असणाऱ्या अफगाण टीमनं ताळावर आणलं. आणि हो हरता हरता इशाराही दिला की खबरदार... दगा हा गाफिल असतानाच होतो.

 

भारतीय टीमनं अफगाण टीमच्या मॅचआधी विश्रांतीसाठी सरावातून सुट्टी घेतली होती. अफगाण टीमला कमी लेखण्याची चुक भारताला आज महागात पडू शकली असती. अफगाण टीमला भारतीय टीमला आज पराभूत करता आलं नाही पण क्रिकेट शौकीनांची अगदी भारतीयांचीही मनं त्यांनी जिंकली. मोठ्या स्पर्धेत दुबळ्या टीमकडून हरण्याची भारताची तशी ही जुनी सवय... याआधी २००७ च्या वेस्ट इंडिजमधील वर्ल्डकपमध्ये भारतीय टीम बांगलादेशकडून अशीच हरली होती आणि भारतीय टीमचं वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं होतं. कॅप्टन राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील त्या भारतीय टीममधिल फक्त एकचं खेळाडू विराटच्या या टीममध्ये आहे आणि तो म्हणजे महेंद्र सिंग धोनी. गेल्या १२ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहवून गेले. टीमचा पुर्णता कायापालट झाला. धोनीने वन डे आणि टी२० वर्ल्डकप भारताला जिंकून दिला आणि आता विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम रोज नवनवा विक्रम रचतेय. अफगाणविरुध्दच्या आजच्या विजयामुळे भारतानं वर्ल्डकपमधे ५० विजयांचा टप्पा गाठलाय. आजवर फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडलाच अशी कामगिरी करता आलीय.

 

आजच्या या संघर्षमय विजयाचं भारतासाठी इशारा एकच होता आणि तो म्हणजे बलवान म्हणून गणली जाणारी भारतीय बॅटींग अफगाणी माऱ्यापुढेही कोसळू शकते हे जगाला कळले. सलामीवीर रोहित शर्मा अपयशी झाला की भारतीय बॅटींगला खिंडार पाडता येऊ शकते हे आज दिसून आले. पण अशा पडत्या काळात केदार जाधवनं आपली उपयुक्तता दाखवून दिली. भारताच्या आजच्या विजयात शमी, जसप्रित बुमरासोबतचं विराट आणि जाधवच्या जिगरबाज खेळीचं मोठं योगदान आहे. एक मात्र नक्की भारताकडे मॅचविनर ठासून भरलेत. अगदी बारूद ठासून भरावं तसं. ठिणगी पडली की विजयोत्सवाच धमाकाच... पण कधी कधी सततच्या विजयानं या बारूदालाही ओलावा लागतो आणि मग पेट घ्यायला उशिर लागतो. आजच्या या जोर का झटका जोरसे लागेमुळेच्या नाट्यामुळे भारतीय संघ अधिक सतर्क झालीय... धोका टळलेला नाही पण आता किमान भारतीय टीम गाफिल राहणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat