
शिवाजी महाराजांनी सुरू केलेले चलन एका ठिकाणी असावे आणि सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने पोहोचावे, या हेतूने ही सर्व माहिती ‘स्वराज्याचे चलन’मध्ये संकलित करून आशुतोष राहाणे-पाटील यांनी ती ६ जून, २०१८ रोजी शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण केली. याच स्वराज्याच्या चलनाची सफर आज आपण संक्षिप्त रुपात बघूया. नुकताच शिवराज्याभिषेक दिन संपन्न झाला. त्यानिमित्ताने स्वराज्याच्या चलनाचा संक्षिप्त आढावा घेऊया.
आपल्या महाराष्ट्रात अनेक लोकांना ‘नाणेसंग्रह’ करण्याचा छंद आहे. ते विविध काळातील, विविध धातूंची नाणी जमवतात. मी दहावीत असताना हा छंद मलाही लागला. नाण्यांमध्ये असलेल्या विविधतेबद्दलच्या उत्सुकतेने माझ्यातील संग्राहकाला जागे करत हा नाणी जमवण्याचा छंद मला लावला. फक्त एक संग्राहक म्हणून सुरुवातीला मी नाणी जमवत होतो. मग त्यात काल-स्थल मर्यादा नव्हती. वाट भरकटलेल्या प्रवाशासारखा या नाण्यांच्या माध्यमातून सर्वच काळ फिरू लागलो. काही काळानंतर हे ‘नाण्यांचे जग’ अफाट आहे, हे लक्षात येताच, आपण सर्व काळ फिरत चुकतोय आणि आपल्याला सर्व काळातील नाणी जमा करणं शक्य नाही हे लक्षात आलं. तिथेच मी चूक सुधारून ठराविक विषय निवडत पुढच्या प्रवासाला लागलो. संग्राहकाचा प्रवास हा फक्त छंदापुरता मर्यादित राहून शेवटपर्यंत फक्त संग्राहक म्हणूनच राहावे, हे मला पटत नव्हते. मग मी या नाण्यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. अभ्यास करताना मराठी भाषेत या विषयाबद्दलच्या पुस्तकांच्या असलेल्या कमतरतेने माझ्यातील लेखकाला जागवत ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ हे पुस्तक हातून घडले. पुढे एक गोष्ट प्रकर्षाने खटकत होती आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या स्वराज्याच्या चलनावर नसलेले सखोल पुस्तक! मग मीच हे शिवधनुष्य पेलत शिवाजी महाराजांनी सुरू केलेले चलन एका ठिकाणी असावे आणि सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने पोहोचावे, या हेतूने ही सर्व माहिती ‘स्वराज्याचे चलन’मध्ये संकलित करून ती ६ जून, २०१८ रोजी शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण केली. याच स्वराज्याच्या चलनाची सफर आज आपण संक्षिप्त रुपात बघूया. नुकताच शिवराज्याभिषेक दिन संपन्न झाला. त्यानिमित्ताने स्वराज्याच्या चलनाचा संक्षिप्त आढावा घेऊया.
‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा ही काही वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांआधी घडवलेला इतिहास आजही आम्हाला प्रेरणादायी आहे. जनतेचे राज्य ‘स्वराज्य’ स्थापण्याचे मनात असलेले स्वप्न सत्य करण्याच्या मार्गाने महाराजांची सुरू झालेली घोडदौड थांबवणे शक्य नाही, हे विरोधी शक्ती ओळखून होत्या. ‘दार उघड बये दार उघड’ असे म्हणणाऱ्या संतांची आर्त हाक देवांनी ऐकली होती. स्वराज्य निर्मितीचे कार्य हळूहळू भव्य होऊ लागले होते आणि दि. ६ जून, १६७४ रोजी हे स्वप्न सत्यात उतरले. शेकडो वर्षांचे या भूमीला लागलेले ग्रहण सुटले. स्वराज्याला अभिषिक्त राजा मिळाला. या पृथ्वीवर एक मराठा राजा ‘छत्रपती’ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून, १६७४ रोजी मोठ्या थाटात पार पडला. ‘ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा एवढा मऱ्हाटा पातशाहा छत्रपति जाहला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही,’ असे कृष्णाजी अनंत सभासद स्वाभिमानांनी त्यांच्या बखरीत लिहिले आहे. या राज्याभिषेकापासून महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणे सुरू केलेले ‘स्वचलन’ ही काही साधारण घटना नव्हती. त्यांनी मुघल वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारून देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची नाणी ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.
राज्याभिषेकसमयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिडेन रायगडवर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती, त्यातील १९ वे महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र, महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली. यावरून महाराजांची दूरदृष्टी पुन्हा आपल्या नजरेस पडते आणि महाराज स्वतःचीच टांकसाळी काढून स्वतःचेच नाणे चालवणार असल्याने आपल्याला परवानगी मिळणार नाही, असे हेन्री ऑक्झिंडेन पत्रात सांगतो. आता स्वराज्याला आपले प्रतिनिधित्व करणारे तांब्याची ‘शिवराई’ आणि सोन्याचा ’शिवराई होन’ हे चलन लाभले होते. ‘शिवराई’ नाणे स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय झाले आणि १६७४ पासून तब्बल १९व्या शतकापर्यंत ‘शिवराई’ नाणे चलनात राहिले. अर्थात, महाराजांनंतर त्यांच्या उत्तराधिकार्यांनी अशीच नाणी चलनात आणली. खरंतर १९व्या शतकात ‘शिवराई’ बंद करण्यासाठी इंग्रजांना फार प्रयत्न करावे लागले असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ला आपल्या राज्याभिषेकापासून टांकसाळीत पाडलेले ‘शिवराई’ नाणे तांब्याचे होते. या नाण्याच्या पुढील बाजूस बिंदूमय वर्तुळामध्ये ‘श्री/राजा/ शिव’ असे तीन ओळीत तर मागील बाजूस ’छत्र/पती’ असा दोन ओळीत मजकूर होता. या नाण्यांचा आकार साधारणतः वाटोळा असून अत्यंत सुबक अक्षरात या नाण्यांवर मजकूर होता. ही नाणी ११-१३ ग्रॅम वजनात आढळतात. या ‘शिवराई’ची त्याकाळात किंमत १ पैसा होती आणि अशा ६४ ‘शिवराई’ मिळून १ रुपया होत असे. १६७४ ला पाडलेल्या ‘शिवराई’ आपण सुरुवातीच्या ‘शिवराई’ म्हणून ओळखतो. या ‘शिवराई’ सुरुवातीच्या असल्याचे त्यांच्या जास्त वजनावरून तसेच त्या नाण्यांवर असलेल्या सुबक अक्षरांवरून आपण मानतो.
साधारणतः पूर्ण एक ‘शिवराई’ १२-१३ ग्रॅम वजनाची मानल्यास अर्धी ‘शिवराई’ ही सहा-सात ग्रॅम्सची असेल आणि पाव ‘शिवराई’ तीन-चार ग्रॅम्सची असेल. या विविध परिमाणांच्या ‘शिवराईं’चे अक्षरवळण साधारणतः सारखेच असून यावरील उल्लेख हा पुढील बाजूंनी तीन ओळीत ‘श्री/राजा/शिव’ आणि मागील बाजूंनी ‘छत्र/पति’ असा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यास ’शिवराई होन’ म्हणतात. शिवाजी महाराजांच्या ’शिवराई होन’ या नाण्यावर बिंदूमय वर्तुळात पुढील बाजूंनी तीन ओळीत ‘श्री/राजा/शिव’ तर मागील बाजूंनी दोन ओळीत ‘छत्र/पति’ असे अंकीत केलेले होते. या नाण्याचा आकार वाटोळा असून नाण्याचे वजन २ मासे ७ गुंजा म्हणजेच २.७ ग्रॅमच्या आसपास आढळते. नाण्याचा व्यास १.३२ सेमी असून त्यात सोन्याचा कस हा ९७.४५ आहे. राजधानी रायगडवरील टांकसाळीत फक्त ‘शिवराई होन’ पाडण्यात येत होती. ‘रुका,’ ‘तिरुका,’ ‘सापिका’ आणि ‘ससगणी’ ही नाणी इतरत्र पाडण्यात येत असल्याचे अप्पा परब त्यांच्या ‘किल्ले रायगड स्थळदर्शन’ या ग्रंथात पृष्ठ क्र. १६४ वर लिहितात. हा ‘शिवराई होन’ आज फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ‘स्वराज्याचे चलन’ या पुस्तकात १८ ‘शिवराई होन’ छायाचित्रांसहित सादर केलेले आहेत म्हणजे आज ‘शिवराई होन’ १८ हून अधिक उपलब्ध आहेत, असे म्हणता येईल.
धनानी दिलेल्या साथीमुळे आणि स्वराज्यरक्षकांच्या मेहनतीमुळे प्रतिपदेची चंद्रकोर आता फक्त कोर राहिली नव्हती. त्याचा लवकरच पूर्ण चंद्र होणार होता. महाराजांचे राज्य आता दक्षिणेपर्यंत पोहोचलेले होते. तिकडेही महाराजांच्या नावाने नाणी पाडली जात होती आणि त्या नाण्यांद्वारे प्रत्येक सामान्यापर्यंत महाराज पोहोचत होते! छत्रपती शिवाजी महाराज एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व! किती ते त्यांचे पैलू, किती तो त्यांचा दूर दृष्टिकोन आणि किती तो त्यांचा स्वाभिमान! महाराज काय होते हे समजून घेणे अत्यंत कठीण आहे. प्रत्येक जण महाराजांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करीत असतो. मला महाराज समजले ते चलनातून ! एका अशा गोष्टीतून जे मराठ्यांच्या इतिहासातील एक फार कमी हाताळलेले दुर्मीळ सोनेरी पान आहे.
- आशुतोष राहाणे-पाटील
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat