माओवादाला पोसणारी आंतरराष्ट्रीय रसद थांबविण्याची गरज

    दिनांक  22-Jun-2019   माओवाद संपवण्याकरिता आपल्याला सर्वसमावेशक उपाययोजनांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावरून त्यांना मिळणारी मदत थांबवावी लागेल. याशिवाय त्यांना मदत करणारे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि ईशान्य भारतातील काही बंडखोर गटांनासुद्धा उद्ध्वस्त करावे लागेल.

 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानकडून आता माओवाद्यांनाही रसद पुरविली जात असल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे. छत्तीसगढमध्ये कांकेर येथे चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून जप्त केलेल्या रायफल्स या पाकिस्तानी बनावटीच्या असल्याचे आढळले. त्यामुळे माओवाद्यांच्या चळवळीला भारताबाहेरूनसुद्धा पाठिंबा मिळतो का? माओवाद्यांचे आंतरराष्ट्रीयस्तरावरील काही संघटनांशी संबंध आहेत? त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयकडून व भारताशी शत्रुत्वाचे संबंध असणाऱ्या इतर देशांकडूनही मदत मिळते? यांसारखे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. दि.१३ जून, २०१९ ला कांकेरमधील तडोकी येथे सुरक्षादलांची माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार झालेल्या माओवाद्यांकडून एसएलआररायफल, ‘एके ३०३रायफल, ‘एक १२ बोररायफल, काडतुसे आणि इतर साहित्य जप्त केले. या रायफल्स पाकिस्तानी बनावटीच्या आहेत. आता पाक लष्कर ते वापरते. त्यामुळे पाक लष्कराकडून थेट माओवाद्यांना शस्त्रपुरवठा केला जातो का, याचा तपास सुरू आहे.

 

माओवादी चळवळीचे अस्तित्व थोड्या प्रमाणात नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्येही दिसून येते. त्यामुळे माओवाद्यांना परदेशातून शस्त्रास्त्रांची मदत मिळते, असे म्हणणे म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक ठरेल.

 

देशाच्या शत्रूंशी असणाऱ्या संबंध

 

देशाच्या शत्रूंशी असणाऱ्या संबंधांशी त्यांचे वर्गीकरण असे करता येईल 

 

१) भारतीय दहशतवादी गटांशी संबंध

२) स्थानिक दहशतवादी गटांशी संबंध

३) आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंध

 

भारतीय दहशतवादी गटांशी संबंध

 

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गट : माओवाद्यांनी आत्तापर्यंत अनेकदा जम्मू-काश्मीर दहशतवादी गटांना पाठिंबा दर्शवला आहे. त्या बदल्यात जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांनी माओवाद्यांना स्फोटके आणि शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. लष्कर आणि माओवाद्यांचे संबंध केवळ आसाम आणि पश्चिम बंगालपुरतेच मर्यादित नाहीत. त्यांनी झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, केरळ या राज्यांमधील गटांशीही संधान साधण्यास प्रयत्न सुरू केले आहेत.

 

ईशान्य भारतातील बंडखोर गट : गुप्तचर यंत्रणांनी आत्तापर्यंत अनेकदा माओवादी आणि ईशान्य भारतातील बंडखोरांच्या/घुसखोरांच्या संबंधांबद्दल अहवाल दिले आहेत.भारताला हिंसात्मक मार्गाने विरोध करणाऱ्या संघटनेबरोबर माओवाद्यांचा संबंध भारताला हिंसात्मक मार्गाने विरोध करणाऱ्या कोणत्याही संघटनेबरोबर माओवादी जुळवून घेतात आणि हीच त्यांची कार्यप्रणाली आहे.

 

जगभरातील दहशतवादी गटांशी संबंध

 

रिमचे सदस्यत्व :रिमअर्थात रिव्होल्युशनरी इंटरनॅशनल मूव्हमेंट,’ ‘क्रांतिकारक आंतरराष्ट्रीय चळवळदेशभरातील माओवादी चळवळींना पाठिंबा देते. हा अमेरिकास्थित गट आहे. तुर्कस्थानातील कट्टर डाव्या विचारसरणीचे लोक आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांचे साहित्य, जर्नल्स प्रकाशित करतात आणि त्यांच्या संकेतस्थळाचे काम पाहतात. माओवादी कम्युनिस्ट पक्ष रिमचा सदस्य आहे. रिमच्या संकेतस्थळावरील यादीमध्येही संघटनेचे नाव आहे. त्यामुळे जगभरातील माओवादी संघटनांशी संपर्कात राहण्यासाठी संघटनेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

 

आग्नेय आशियाई कट्टर डाव्या विचारसरणीच्या गटांशी संबंध

 

आग्नेय आशियातील माध्यमांच्या काही वृत्तानुसार, भारतातील माओवादी आणि फिलिपिन्समधील कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये संबंध आहेत. या माध्यमातून माओवाद्यांनी आग्नेय आशियातील इतर गटांशीही संबंध प्रस्थापित केले आहेत.

 

माओवाद्यांचे जाळे जागतिक पातळीवर कसे काम करते?

 

२००४च्या विलीनीकरणानंतर माओवाद्यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय विभागाची स्थापना केली. हा विभाग केंद्रीय समितीच्या नेतृत्वात काम करतो. या युद्धाला आणखी व्यापक स्वरूप द्यायचे असेल, तर विविध देशांत सक्रिय असलेल्या व माओच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या संघटना तसेच पक्षांना एकत्र आणावे लागेल, या हेतूने हा विभाग स्थापन करण्यात आला.

 

माओवाद्यांना काही वर्षांपूर्वी श्रीलंकेत सक्रिय असलेल्या लिट्टेने युद्धतंत्र शिकवले. तसेच फिलिपिन्स, नेपाळमधील सशस्त्र माओवाद्यांशी माओवाद्यांचा नियमित संबंध होता. पण, आता माओवादी नेपाळमध्ये सत्तेत आल्यामुळे तो कमी झाला आहे. माओवादाचा उदय चीनमधील असल्याने तेथून माओवाद्यांना बरीच मदत मिळते.

 

माओची क्रांती जगभर नेण्याची प्रतिज्ञा

 

फिलिपिन्स, भारत, तुर्कस्थान व ब्राझील या देशात सक्रिय असलेले चार पक्ष व अमेरिका आणि इराणमध्ये सक्रिय असलेल्या दोन संघटनांचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय संघटनेत राहतील असे ठरवले. हजर असलेल्या इतर देशांनी भारतात माओवादाने आता चांगलेच रूप धारण केल्याने भारतानेच मार्गदर्शकाची भूमिका निभवावी, असेही सुचवले. या सर्वांनी माओची क्रांती जगभर नेण्याची प्रतिज्ञा केली आहे.

 

जोसेफ व प्रकाश या भारतीयांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना हजेरी लावली. जोसेफ व प्रकाश ही दोन्ही नावे बनावट आहेत. प्रकाश हा दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचा प्राध्यापक साईबाबाआहे, असा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे. या प्रकाशने माओवादी चळवळीचे उघडपणे समर्थन करणाऱ्या देशातील अनेक बुद्धिवादी व विचारवंतांना या आंतरराष्ट्रीय विभागाशी जोडले व त्यांचा वापर जागतिक पातळीवरील नेटवर्क उभारण्यासाठी करून घेतला. काही विचारवंतांना आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने परदेशात पाठवायचे मात्र परदेशात जाताच माओवाद्यांचे प्रवक्ते म्हणून काम करायचे असे त्यांचे काम आहे.

 

नेपाळी माओवाद्यांवर जगभरातील माओवादी नाराज

 

नेपाळमध्ये माओवाद्यांचे प्रचंड सरकारसत्तेत आले, पण त्यांना सत्ता सांभाळता आली नाही. प्रचंड सरकारने त्याच्याकडे असलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांना तेथील सैन्यात सामील करून घेतले. यामुळे जगभरातील माओवादी नाराज झाले आहेत. नेपाळी माओवाद्यांचा जागतिक पातळीवर उपयोग करून घेता आला असता, असे सर्वांना वाटते. भारतातील माओवादीसुद्धा प्रचंडवर नाराज आहेत. प्रचंडपासून अंतर राखून असलेल्या एका गटाला आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी करून घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशातील माओवादी भारतातील जनयुद्धाकडे क्रांतीचे केंद्र म्हणून आशेने बघत आहेत. त्यामुळे आता भारतातील माओवाद्यांनी केवळ परिषदांना हजेरी न लावता नेतृत्वासाठी पुढाकार घ्यावा, असे काहींना वाटते.

 

सुरक्षा यंत्रणांनी काय करावे?

 

अनेक कारणांमुळे माओवादाची व्याप्ती आंतरराष्ट्रीयस्तरावर पसरवण्यात भारतातून गेलेल्या माओवाद्यांना फारसे यश मिळाले नाही. एक मुख्य कारण होते की, माओवाद आता चीन आणि रशियामध्येसुद्धा फारसा प्रचलित नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की, चीन किंवा पाकिस्तान सोडून कुठल्याही इतर देशांची भारतीय माओवाद्यांना मदत मिळत नाही. तरीपण अनेक भारतीय जे आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताविरुद्ध कारस्थानं रचतात, त्यांच्या विरुद्ध कुठलाही मोठा हिंसाचार घडण्यापूर्वीच कायदेशीर कारवाई केली पाहिजे. काही भारतीय विद्वान जे आंतरराष्ट्रीयस्तरावर संशयास्पद सेमिनार्सला उपस्थित राहतात, त्यांच्यावर त्या देशांतील भारतीय दूतावासांच्या मदतीने लक्ष ठेवले पाहिजे. आयोजित करणाऱ्या संस्था संशयास्पद असतील तर त्यांच्या विरुद्ध त्या देशाला माहिती दिली पाहिजे.

 

म्हणजे माओवाद संपवण्याकरिता आपल्याला सर्वसमावेशक उपाययोजनांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावरून त्यांना मिळणारी मदत थांबवावी लागेल. याशिवाय त्यांना मदत करणारे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि ईशान्य भारतातील काही बंडखोर गटांनासुद्धा उद्ध्वस्त करावे लागेल. दि. १५ मे, २०१९ पासून भारतीय सैन्य म्यानमारच्या आत ऑपरेशन सनराईज-२हे ईशान्य भारतातील बंडखोर गटांच्या विरोधामध्ये राबवत आहे. आशा करूया की, या अभियानाला पूर्ण यश मिळेल.माओवाद्यांना शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि प्रशिक्षण देणारे प्रशिक्षित दहशतवादी अशा पद्धतीने पाठिंबा देण्यात येतो. लिट्टेचा गट समुद्री मार्गाने पाठिंबा देतो, त्यामुळे पूर्व किनाऱ्याची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. लष्करआणि हुजीया संघटनांनी बांगलादेशला आपला तळ बनविले आहे. त्यामुळे बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षादलांनी घुसखोरी थांबविणे आवश्यक आहे. बांगलादेशमध्ये लष्करआणि हुजीच्या ज्या कारवाया सुरू आहेत, त्या थांबविण्यासाठी भारताने बांगलादेशावर दबाव टाकणे आवश्यक आहे. नेपाळमधील माओवाद्यांनी चीनला नेपाळमध्ये भारताविरोधातील कारवायांची आखणी करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. भारत आणि नेपाळ ही सीमा सीलकेली पाहिजे. माओवाद्यांना भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चीन आंतरराष्ट्रीय स्मगलिंग सिंडिकेटच्या मदतीने दारुगोळा पुरवठा करतो असा संशय आहे. म्हणून पूर्व किनारपट्टीची सागरी सुरक्षा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. माओवाद्यांना बाहेरून मिळणारा पाठिंबा थांबविला, तर भारताच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये मोठी प्रगती होऊ शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat