इमरान नाही, नादान खान!

    दिनांक  21-Jun-2019   सौदीचे प्रमुख भेटायला आले असता इमरान यांनी त्यांचा चक्क अपमानच केला होता. बरं, आपण अपमानबिपमान किंवा जागतिक स्तरावरच्या शिष्टाचाराची ऐशीतैशी करतो आहोत, हे त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. शिष्टाचाराची शिस्त त्यांनी पाळली नाही.


शाळा, महाविद्यालय आणि पुढे स्पर्धा परीक्षांमध्येही परीक्षेला काही प्रश्न हमखास विचारले जातात. त्यापैकी एक 'गाळलेल्या जागा' वगैरे सारखे किंवा 'कोण कोणास म्हणाले' अशाप्रकारचे प्रश्न असतात. अर्थात, या प्रश्नांकडे चिल्लर म्हणूनच पाहिले जाते. द्या काहीही ठोकून, लागला तर लागला खडा. मिळाले तर मिळाले गुण, असाच काहीसा भाव विद्यार्थ्यांचा असतो (अपवाद क्षमस्व) तर असे हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, याचा साक्षात्कार नुकताच झाला. बरं, तो साक्षात्कारही कुणामार्फत व्हावा तर इमरान खान यांच्याकडून. त्याचे झाले असे की, इमरान खान यांनी सोशल मीडियावर एक सुविचार लिहिला होता. आता सगळ्यांना माहिती आहे की, सोशल मीडियावर 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट' वगैरेंचा रतीब घालून वाचणाऱ्याच्या मोबाईलच्या मेमरीला फेस आणणाऱ्यांनी सगळ्यांनाच 'दे माय धरणी ठाय' करून सोडले आहे, तर अशा 'गुड मॉर्निंग' वगैरेंच्या संदेशाबरोबरच लोक ज्ञानामृतही पाजत असतात. सुभाषित, विचारधनाचे डोसवर डोस देत असतात. अशाच एका संदेशामध्ये इमरान खान यांनी एक सुविचार लिहिला म्हणजे 'कोट' केला. तो असा, “मी झोपेत असताना स्वप्न पाहिले की, जीवन आनंदी आहे. मात्र, मी जागे झाल्यावर पाहिले की जीवन तर सेवा आहे. पण, मी सेवा केली तर मला आनंद लाभला.” आता सोशल मीडियावर संदेश लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या तमाम लोकांची ही एक सामुदायिक मानसिकताच झाली आहे की, 'मला काय वाटते' किंवा 'मी काय अनुभवतो' हे त्याच क्षणाला सगळ्या जगाला कळावे. या अनुषंगाने बहुतेक इमरान खान यांनी हा संदेश पाठवला असावा.

 
 
 

त्यांना लोकांना सांगायचे असावे की, बघा मला सेवा करायची आहे आणि त्यातून आनंद मिळवायचा आहे. किती मोठा संदेश! पण लोक पण ना... त्यातही भारतीय आणि त्यांच्या पाकिस्तानमधले काही नतद्रष्ट तर टपलेलेच आहेत, इमरान खान यांची खिल्ली उडवायला. त्याचे झाले असे की, त्यांनी हा सुंदर संदेश तर लिहिला, पण हा संदेश कुणाचा अशी तळटीप देताना त्यांनी हे विचार, हे वचन खलिल जिब्रान यांचे आहे, असे लिहिले. आता असे आहे की, भले शेक्सपियरदादा म्हणून गेलेत की 'नावात काय आहे?' पण, सुविचारांच्या बाबतीत तसे नसते ना? ज्याचे आहे त्याचेच नाव लिहायला हवे. इमरान खान यांनी सुविचार लिहिताना सेवेतून आनंद मिळतो, हा संदेश खलिल जिब्रान यांच्या नावाने ठोकून दिला. मात्र, तो सुविचार आहे गुरू रवींद्रनाथ टागोर यांचा. झाली का पंचाईत? कारण नाही म्हटले तरी पंतप्रधानपदावर, देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने कधीही, काहीही, कुणाचे कुणासाठीही म्हणावे? हे तर अगदीच तारतम्यहीन आहे. ज्या देशाच्या पंतप्रधानांचा जागतिक स्तरावरच्या साहित्यिकांचे सुप्रसिद्ध वचन लिहिण्यातही गोंधळ उडतो, त्या देशाच्या साहित्यिक आणि विचारवंतांचे काय होणार देव जाणे...

 

असो, तर इमरान यांच्या या कर्तृत्वावर नेटकरी, विचारवंत, साहित्यिक अत्यंत नाखुश झाले आहेत. एकतर माहिती नसताना नको ती अक्कल पाजळून जगात हसे का करून घ्यावे? बरं, इमरान यांचे हे असे वागणेबोलणे एका वेळचे असते तर ठीक आहे, चूक होते माणसाची. पण, दर आठवड्याला इमरान यांच्या बोलण्यातून-वागण्यातून अज्ञान प्रगट होते. त्या अज्ञानाचा संबंध पाकिस्तानसोबतच जोडला जाणार, हे नक्की. तर इमरान खान यांच्या या अशा वागण्याबोलण्यामुळे वाटते की, रिकाम्या जागा भरा, कोण कुणास म्हणाले किंवा कोण म्हणाले, हे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे पक्की करून ठेवायला हवीत. आता कुणी म्हणेल की, इमरान खानकडून काही शिकायची अपेक्षा ठेवलीच कशी? असा प्रश्न पडणारच पडणार. पण होते कधी कधी असे की, ज्याच्याकडून जे अपेक्षित नसते ते त्याच्याकडूनच शिकायला मिळते. मागे त्यांच्याकडून असेच शिकायला मिळाले होते की, इतर देशांचे प्रमुख भेटीला आले की कसे वागायचे आणि वागू नये. सौदीचे प्रमुख भेटायला आले असता इमरान यांनी त्यांचा चक्क अपमानच केला होता. बरं, आपण अपमानबिपमान किंवा जागतिक स्तरावरच्या शिष्टाचाराची ऐशीतैशी करतो आहोत, हे त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. शिष्टाचाराची शिस्त त्यांनी पाळली नाही. या पार्श्वभूमीवर इमरान खान यांना शिस्त शिकायची असेल तर त्यांनी शरद पवार यांचे म्हणणे ऐकावे. ते म्हणाले होते की, “अनुशासन, शिस्त वगैरे संघाच्या मंडळींकडे आहे.” बाकी आता इमरान खान यांनी ठरवावे, शिस्त शिकायची आहे की नाही ते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat