'चाकोरी'बाहेर जगण्यासाठी प्रत्येकाने वाचावे असे...

    दिनांक  20-Jun-2019   
स्टार्टअप मंत्र : स्टार्टअप अर्थात नवोद्योगाची ओळख

 

'तुमचा पगार म्हणजे तुम्ही पाहीलेली स्वप्न विसरण्यासाठी दिली जाणारी लाच आहे', असे इंग्रजीतील वाक्य मोजक्या शब्दात चाकोरीत अडकलेल्यांना वेगळा विचार करण्यासाठी प्रवृत्त करते. सध्याच्या काळात नोकऱ्यांची घसरलेली टक्केवारी आणि वाढलेली बेरोजगारी या साऱ्यातून हताश झालेले अनेक तरुणांना उद्यमशील बनण्यासाठी प्रेरीत करण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणजे प्रेरणादायी बिझनेस लिडर, उद्योजक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे लिखित 'स्टार्टअप मंत्र - संकल्पना ते अनुभव' हे पुस्तक.

 

'स्टार्टअप इंडिया', 'मेक इन इंडिया' या योजनांद्वारे केंद्र सरकारने नवउद्यमींना अनेक संधी उपलब्ध करून देत सवलतींद्वारे अनेक युवकांना उद्योगभरारी घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. दुर्दैवाने मराठी तरुण या क्षेत्राकडे म्हणावा तितका याकडे वळलेला नाही, असे सध्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणावर 'स्टार्टअप हब्ज' अद्यापही नवी दिल्ली आणि बंगळूरू याच शहरात उपलब्ध आहेत. मुळातच नोकरी सोडून स्वतःच्या उद्योगाचा डोलारा उभा करणे आपल्या 'कन्फर्ट झोन' मधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या फारशी नाही. डॉ. हावरे यांनी अशा १५ मराठी नवउद्यमींशी चर्चा करून त्यांच्या उद्योगाचा बिजावस्थेपासूनचा प्रवास जाणून घेतला आहे.

 

नवउद्योगांबद्दल जगभरात निर्माण झालेले कुतूहल लक्षात घेऊन 'स्टार्टअप' या संज्ञेचा सारासार विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. आज एकविसाव्या शतकात मानवाला अवगत असलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक उद्योग उभारले जाऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. हीच गोष्ट या पुस्तकात नेमक्या शब्दांत मांडली आहे. डॉ. हावरे यांनी घेतलेल्या उद्योजकांच्या मुलाखतीतून ती स्पष्ट होते. भारतात जेव्हा 'स्टार्टअप्स'ची सुरुवात होऊ लागली त्यावेळेस वर्षभरातच अनेक नव्या कंपन्यांनी वर्षभरातच नांगी टाकली होती. अनेकांनी हे इथे चालणार नाही, आपल्याकडे तसे पोषक वातावरण नाही, असे सांगून त्याकडे नाके मुरडली. अनेकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला.

 

काही उद्योजकांनीच 'स्टार्टअप्स' म्हणजे अनुभव नसलेल्या तरुणांनी बेफीकिरीने पैसे उधळण्याची पद्धत, अशी व्याख्याच करून टाकली. तर, काहींनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर जिद्दीने आणि मेहनतीने अपयशावर मात करत यश संपादन केले. आपला व्यवसाय नुसता उभा न करता त्याचा विस्तार थेट देश-परदेशात केला. आज भारतात ४० हजार नवउद्योगांची स्थापना झाली आहे. अशाच काही उद्योगवेड्या मराठी युवकांच्या गोष्टी या पुस्तकात मांडल्या आहेत. डॉ. हावरे यांनी यापूर्वी लिहीलेल्या 'उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा' आणि 'उद्योग करावा ऐसा' या दोन्ही पुस्तकांनंतर नवउद्यमींशी केलेल्या संवादाद्वारे अनेकांना प्रेरणा मिळेल, असा हेतू या पुस्तकाचा आहे.

 

डॉ. हावरे आणि नवउद्यमी यांच्यात झालेला प्रश्नोत्तर रुपी थेट संवाद पुस्तकाद्वारे मांडल्याने पुस्तक वाचत असताना मुलाखत पाहिल्याचा भास होत जातो. तरुणांनी विद्यार्थीदशा ते उद्योजक होण्यापर्यंतचा त्यांच्याच शब्दात मांडलेला प्रवास सोप्या शब्दांत उलगडत जातो. लेखक स्वतः एक यशस्वी उद्योजक आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व असल्याने उद्योजकाच्या नजरेतून विचारलेले प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरे व्यवसायातील खाचखळग्यांची जाणीव होते. पुस्तकाची प्रस्तावना 'जेनकोवॅल ग्रुप ऑफ कंपनीज'चे अध्यक्ष दीपक घैसास यांनी लिहीली आहे. रोजच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी लागणारी व्यावसायिक युक्ती म्हणजेच नवउद्योग, असे सांगत असताना प्रस्तावनेतही 'अॅमेझॉन', 'उबेर', 'मेक माय ट्रीप', 'शादीडॉटकॉम', 'पे पॅल' आदी उदाहरणा दाखल नवी संकल्पना घेऊन यशस्वी झालेल्या उद्योगांची उदाहरणे दिली आहेत.

 

'स्टार्टअप' सुरू करण्याचा प्रयत्न करणारे आणि तशी इच्छा असणाऱ्या प्रत्येक वाचकांना आवश्यक १० सुत्रांची विस्तृत माहीती पुस्तकाद्वारे दिली आहे. त्यात कल्पना सुचवण्यापासून ती रुजवणे, तिची अंमलबजावणी, संस्थापक, टीम, उत्पादन, भांडवल उभारणी, मर्यादा, भविष्यातील योजना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा या गोष्टींचे महत्त्वही पुस्तकात नमूद केले आहे. प्रत्येक उद्योजकाच्या मुलाखतीची सुरुवात करताना त्याच्या कार्याबद्दल थोडीशी तोंडओळख केल्याने संपूर्ण मुलाखतीचे स्वरूप थोडक्यात समजते आणि पूर्ण गोष्ट समजून घेण्याची उत्सूकता वाढत जाते हे विशेष.

 

स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक गोष्टींचा संपूर्ण विचार पुस्तकात मांडण्यात आला आहे. बाजारातील संधी ओळखून त्यांचा फायदा स्वतःच्या उत्पादनाद्वारे आपल्या संस्थेला मिळवून देण्यापासून ते पुन्हा नव्या संधींद्वारे त्याचा पसारा वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उद्यमींची संघर्षगाथा सोप्या शब्दात मांडली आहे.

 

पुस्तकातील काही नवउद्यमींची वाक्य तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. इंग्रजी भाषा शिकवणारे 'अटर' अॅप विकसित करणारे निनाद वेंगूरलेकरांचे वाक्य येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. २० वर्षे इमाने इतबारे मोठ्या पगाराची नोकरी करणारे वेंगूरलेकर यांनी वयाच्या ४३ व्या वर्षी उद्योग सुरू करण्याचा विचार मनात आणला. घराचे कर्ज, मुलांची जबाबदारी, घरखर्च आदी साऱ्या गोष्टींचा भार समोर असतानाच त्यांनी उद्योग सुरू करण्याची सुरुवात केली. त्यांनी सांगितलेला अनुभव म्हणजे, 'जोवर तुम्ही चाकोरीतून बाहेर येत नाही तोवर तुम्हाला तुमच्यात काहीतरी नवीन करण्याची क्षमता आहे यावर विश्वास बसणार नाही.'

 

पुस्तकातील प्रत्येक मुलाखतीनंतर लेखकाने 'स्टार्टअप थॉट्स' मांडले आहेत. वाचलेल्या गोष्टीतून नेमके काय घ्यायला हवे हे एका उद्योजकाच्याच लेखणीतून टीपण्यास आणि वाचकाला सोप्या पद्धतीने बोध होण्यास मदत होते. उद्योजकाने विचार कसा करावा, त्याचा दृष्टीकोन कसा असावा याचा आदर्श मार्गदर्शक हे पुस्तक ठरेल. पुस्तकाच्या समारोपापूर्वी लेखकाने तरुणांसह ज्यांना व्यावसाय करण्याची इच्छा आहे, त्यांना डॉ. हावरे यांचे शब्द इच्छाशक्तीला बळ देणारे ठरतात.

 

स्टार्टअप मंत्र : संकल्पना ते अनुभव

लेखक : डॉ. सुरेश हावरे

मुद्रक व प्रकाशक : प्रदीप चंपानेरकर, रोहन प्रकाशन

मुखपृष्ठ : राजू देशपांडे, शेखर गोडबोले

पृष्ठं : ११६

मुल्य : १०० रुपये

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat