मुंबई : राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता आयटीआयमध्ये सुमारे ५० हजार प्रवेश क्षमता वाढविणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आयटीआयमध्ये ५० हजार प्रवेश क्षमता वाढविण्याबाबतची लक्षवेधी सूचना जगन्नाथ शिंदे यांनी मांडली होती त्याला उत्तर देताना डॉ.पाटील यांनी माहिती दिली.
राज्यात तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मध्येही आयटीआयचे कोर्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. राज्यभरात आयटीआयच्या प्रवेशासाठी जिथे मागणी असेल तिथे कोर्स सुरु केले जातील. तसेच प्रवेश क्षमता व तुकड्यांची संख्याही वाढविली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात ४१७ शासकीय व ४२५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्येक वर्षी सरासरी १ लाख ४० हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat