प्रश्नांची उकल

    दिनांक  20-Jun-2019जीवात्मा हा वायूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि कर्तबगार आहे. देह आणि जीवात्मा एकत्र असण्याला समर्थांनी 'देहात्मयोग' असे सार्थ नाव दिले आहे. या देहात्मयोगाच्या बळावर विवेकाने हा जीवात्म त्रैलोक्याचा ठाव घेऊ शकतो, असे स्वामी म्हणतात.


जे मुळात नाही, त्याच्या कर्त्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशा तार्किक युक्तीने स्वामींनी 'कर्त्या'चा प्रश्न निकालात काढला, हे आपण मागील लेखात पाहिले. त्यानंतर आणखी एका प्रश्नाची चर्चा स्वामींनी दासबोधात केली आहे. तो प्रश्न म्हणजे माणसाला जी सुखदुःखे भोगावी लागतात, ती 'भोगणारा' कोण? त्यासाठी प्रथम सचेतन, अचेतन प्राणी, पदार्थ याचा विचार केला पाहिजे. या विश्वातील प्रत्येक पदार्थात 'बाह्यांग' आणि 'अंतरंग' असे दोन भाग असतात. अचेतन पदार्थाचे बाह्यांग 'पंचमहाभूतात्मक' असते. म्हणजे ती वस्तू पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या तत्त्वांनी बनलेली असते. परंतु, त्या अचेतन वस्तूंचे अंतरंग गुणमय शक्तिमय असते. उदा. साखरेचा खडा बाह्यांगाने पृथ्वी तत्त्वाचा असला तरी, तो जीभेवर ठेवला असता त्याच्या अंतरंगातील गुणमय गोडीची प्रचिती येते. पाणी बाह्यतः 'आप' तत्त्वाचे आहे. पण, त्याच्या अंतरंगात जीवाची तहान भागवण्याची शक्ती आहे. त्याचप्रमाणे पाण्याची वाफ तयार झाल्यावर पाण्याच्या अंतरंगातील प्रचंड शक्तीची कल्पना येते. त्या शक्तीच्या जोरावर वाफेचे इंजिन चालते हे सर्वांना माहित आहे. आता सचेतन प्राण्याचा देह पंचमहाभूतात्मक असला तरी त्याचे अंतरंग जाणीवरूप असते. ती जाणीव जीवात्म्याच्या साहाय्याने सचेतन प्राण्याच्या अंतरंगात राहते. या विश्वात पाहिले तर हा जीवात्म्याला व देहाला एकमेकांवाचून गत्यंतर नसते. पंचमहाभूतात्म देह नसेल, तर नुसता जीवात्मा असणे संभवत नाही आणि जीवात्मा नसेल तर प्राण्याचे शरीर निर्जीव प्रेत होते. देहाच्या पोषणाने जीवात्मा तेथे राहतो. हा जीवात्मा शरीरातील सर्व कार्ये घडवून आणतो. जीवात्म्याच्या प्रेरणेने शरीराद्वारा होणाऱ्या कार्याचे म्हणजे हालचालींचे वर्णन स्वामींनी द. १३ स. ९ मध्ये मिश्किलपणे केले आहे. पतीपत्नींच्या संवादाचे नाट्यमय प्रसंग ते या समासात सांगतात. श्रोत्यांना तत्त्वज्ञान विचाराच्या क्लिष्टपणापासून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून हे प्रसंग स्वामींनी या समासात घेतले आहेत. त्यातून जीवात्म्याच्या शरीराद्वारा केलेल्या हालचाली समजतात. तहान लागली की हा जीवात्मा शरीराला पाणी शोधायला सांगतो. नंतर पाणी प्राशन करून तहान भागल्याचे समाधान मिळवतो. भूक लागली की तो देहाला उठवतो आणि बायकोला अद्वातद्वा बोलायला लावतो. बायकोचा जीवात्मा 'झाले, झाले' म्हणून जेवणाची तयारी करायला लावतो. मग हा देहाला सोवळ्यात गुंडाळून पानावर बसवतो व जेवू लागतो. हाच जीवात्मा जीभेत संचार करून सुवास, चव यांचा आस्वाद घेतो. जेवताना एखादा पदार्थ अळणी लागला, तर हा जीवात्मा त्याला बायकोच्या अंगावर ओरडायला लावतो. बायकोकडे डोळे वटारून पाहतो व मीठ मागतो. तसेच एखादा पदार्थ खूप तिखट लागला, तर त्याचे डोके भडकते. हा जीवात्मा जीभेकडून बायकोला नाही नाही ते कठोर शब्द बोलतो.

 

आज्य उदंड जेविला।

सवेंच तांब्या उचलिला।

घळघळा घेऊ लागला। सावकास॥

 

अनेक तुपकट पक्वान्न पोटभरून जेवला की त्याला खूप तहान लागते. मग तो गडवा उचलून घटाघट पाणी पिऊ लागतो. अशा रितीने हा जीवात्मा देहात राहून अनेक सुखदुःखे भोगत असतो.

 

देही सुखदुःख भोक्ता।

तो येक आत्माचि पाहातां।

आत्म्याविण देह वृथा।

मडें होय॥(१३.९.२६)

 

सर्वांच्या अंतर्यामी हा 'जीवात्मा' कार्य करीत असतो. त्याचप्रमाणे जगाच्या अंतर्यामी असणारा तो 'जगदात्मा' आणि विश्वाच्या अंतर्यामी 'विश्वात्मा' कार्य करीत असतो. देहाला केलेले उपचार या जीवात्म्याला पावतात. म्हणून ही सुखदुःखे भोगणारा 'जीवात्मा' होय.

 

शरीरास बरें केले। तें आत्मयास पावलें।

शरीरयोगे जाले। समाधान॥

 

अशा रितीने जे जे उपचार देहाला केले जातात, ते सारे जीवात्म्याला पावतात. यासाठी देह नसेल तर जीवात्म्याची मोठी पंचाईत होते. त्याला देहाशिवाय स्वतंत्रपणे राहता येत नाही. जीवात्मा हाच शरीरातील सर्व कार्ये घडवून आणत असतो. तो स्वप्नात गेला तरी शरीर सोडून जात नाही. अन्नरसाने शरीर वाढते, तसेच विचारसुद्धा वाढीस लागतात. मादक पदार्थांचे सेवन केले तर त्याचा अंमल जीवात्म्यावर होऊन त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण होतात. त्यामुळे वाढणे, मोडणे, भ्रम होणे या गोष्टी जीवात्म्याला भोगाव्या लागतात. हा जीवात्मा सजीव प्राण्यांच्या ठिकाणी राहून कार्य करीत असतो. पुढे स्वामींनी जीवात्म्याची वायूबरोबर तुलना केली आहे. वायू स्वतःबरोबर सुवास, कुवास, धूळ, रोगराई हे संचार करतात. अडथळा आला की वायू अडतो. परंतु, जीवात्म्याचे तसे नाही. ही तुलना करून स्वामी सांगतात की, जीवात्मा हा वायूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि कर्तबगार आहे. देह आणि जीवात्मा एकत्र असण्याला समर्थांनी 'देहात्मयोग' असे सार्थ नाव दिले आहे. या देहात्मयोगाच्या बळावर विवेकाने हा जीवात्म त्रैलोक्याचा ठाव घेऊ शकतो, असे स्वामी म्हणतात. येथे आणखी एका प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जर सर्व प्राण्यांच्या ठिकाणी एका जीवात्मा असतो, तर सर्व प्राण्यांना माणसांना सारखे मानावे हे योग्य आहे का? हा जीवात्मा अंतरात्मा माणसा-माणसात कमी-अधिक प्रमाणात प्रकट होत असतो. त्यामुळे आचारशुद्धता पाळणारा, तसेच बुद्धिमान माणसाचा दर्जा इतरांपेक्षा वेगळा असणार हे उघड आहे. परंतु, लोक सांगत सुटतात की, सर्वांचा आत्मा एक आहे तेव्हा माणसा-माणसात भेद करू नये. अशा वाक्यांचा समाजात विपरित परिणाम होतो आणि तो घातकही ठरू शकतो. म्हणून स्वामींच्या मते, या दृश्य जीवसृष्टीत सर्वांचा अंतरात्मा एकत्र असला तरी माणसा-माणसात, पशूत फरक हा असणारच.

 

पुण्यात्मा आणि पापत्मा।

दोहींकडे अंतरात्मा।

साधु भोंदु सीमा। सांडूच नये॥ (१३.१०.१२)

 

अंतरात्मा एकच आहे म्हणून माणसा-माणसात भेद करू नये, हे स्वामींना मान्य नाही. दासबोधाच्या द. १३ स. १० मध्ये समर्थांनी याचे अधिक स्पष्टीकरण केले आहे. दृश्य जीवसृष्टीत सर्वांचा जीवात्मा एक असला तरी त्यांच्यात फरक राहणारच. स्वामी विचारतात, 'पंडित आणि चारी पोरे येक कैसी?' विद्वान पंडित आणि वात्रट पोरे यांना एक सारखे कसे मानता येईल? पुढे काहीसे रागावून स्वामी म्हणतात,

 

मनुष्य आणि गधडे।

राजहंस आणि कोंबडे।

राजे आणि माकडे। येक कैसी॥

(दा. १३.१०.१४)

 

भागीरथीचे जळ आप। मोरी संवदणी तौही आप।

कुश्चिळ उदक अल्प। सेववेना॥

(दा. १३.१०.१५)

 

शूरांहून मानिले लंडी।

तरी युद्धप्रसंगी नरकाडी।

श्रीमंत सांडून बराडी।

सेविता कैसे॥१७॥

 

सर्वांचा आत्मा एक म्हणून माकडाला राजा करता येत नाही. गाढवाला माणसासारखे पूज्य मानता येत नाही. गाढवाची पूजा करायला गेले तर लाथांचा प्रसाद मिळेल! गंगेचे शुद्ध जल आणि मोरीतून वाहणारे गटारातील पाणी, तसेच धोब्याच्या कपडे धुण्याच्या कढईतील कपडे धुतलेले पाणी सारखे कसे मानता येईल? समजा, भित्र्या माणसाला शूर माणसापेक्षा जास्त दर्जा दिला, तर युद्धप्रसंगी फजिती होईल. एखाद्या श्रीमंताला सोडून दरिद्री माणसाची सेवा चाकरी केली, तर काहीच पदरी पडणार नाही. तेव्हा सर्वांचा आत्मा एक म्हणून 'माणसामाणसात भेद करू नये' हे टाळ्या मिळवणारे वाक्य स्वामींनी उडवून लावले आहे.

 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat