'यांत्रिक पोलीसदादा'

    दिनांक  20-Jun-2019   'एचपी रोबोकॉप'ला लॉस एंजेलिस शहरापासून १० किमी अंतरावरील ५० हजार लोकसंख्येच्या हंन्टिंग्टन उद्यानाजवळील रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. 'एचपी रोबोकॉप'च्या तैनातीचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियासह संपूर्ण अमेरिकेत 'रोबोकॉप' तैनाती केले जातील.


आज प्रत्येक माणूस आधुनिकच नव्हे, तर अत्याधुनिक युगात जगत आहे. मानवी विकासप्रक्रियेचे अश्मयुग, ताम्रयुग आदी कालखंड एका बाजूला आणि आताचा चालू कालखंड एका बाजूला अशीही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. इतकेच नव्हे तर औद्योगिक क्रांतीचा, प्रबोधन पर्वाचाही कालखंड अतिशय मागे पडला असून माणूस त्याच्याही कितीतरी पुढे निघून गेला आहे. २०, ३०, ५० वर्षे आणि त्याआधीची स्थिती आता राहिलेली नसून काळ झपाट्याने बदलत आहे. दूरध्वनी, चारचाकी, रेल्वेगाडी, विमानाचे कुतूहल मर्यादित स्वरूपात उरले असून आता मोबाईल, स्मार्टफोन, कॉम्प्युटर, इंटरनेट, ड्रोन, हायपरलूप आदी नवनव्या आविष्कारांमुळे मानवी प्रगतीच्या, विकासाच्या व्याख्येने मोठी झेप घेतली आहे. सोबतच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' आणि रोबोटिक्सचादेखील जगभरात मोठाच बोलबाला होत आहे. एखाद्या यंत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनुभवाने विकास करण्याची त्या यंत्राची क्षमता, म्हणजेच ते यंत्र माणसासारखेही विचार करू शकण्याची शक्यता, अशा निरनिराळ्या मुद्द्यांची चर्चाही होत आहे. तसेच रोबोटमुळे मानवी आयुष्य सुलभ होईल का? मानवी आयुष्यातल्या समस्या रोबोट सोडवू शकेल का? माणूस आणि रोबोटमध्ये संघर्ष होईल का? माणूस आणि रोबोटमध्ये कोण जिंकेल, कोण हरेल? रोबोटमुळे मानवी रोजगारांवर अतिक्रमण होईल का? असे एकाहून एक प्रश्नही कित्येकजण विचारू लागले आहेत. परिणामी, दोन्ही बाजूने समर्थकांचे आणि विरोधकांचे गटही तयार झाले. अशाप्रकारे समर्थन आणि विरोधाच्या क्रिया-प्रतिक्रिया विविध माध्यमांतून, समाजमाध्यमातूनही वाचायला, पाहायला मिळत आहेत.

 

एका बाजूला अशी परिस्थिती असतानाच आता अमेरिकेतून एक बातमी आली, ज्याला स्वागतार्ह, स्वीकारार्ह म्हणावे की, नाही असाही प्रश्न पडू शकतो. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील ही घटना असून नाविन्याचा, संशोधनाचा दैनंदिन आयुष्यातील वापरासंबंधीचे हे महत्त्वाचे पाऊल आहे, असेही त्याकडे पाहून वाटते. तर झाले असे की, कॅलिफोर्नियात मंगळवारी पहिल्यांदाच रस्त्यांवर 'रोबोकॉप' म्हणजेच यांत्रिक पोलीस तैनात करण्यात आला. या यांत्रिक पोलिसाला 'एचपी रोबोकॉप' नावाने संबोधण्यात येत असून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या कॅप्सूलसारखा या 'रोबोकॉप'चा आकार आहे. हा 'रोबोकॉप' पूर्णपणे स्वयंचलित असून तो ३६० अंशांच्या कोनात निरीक्षण करू शकतो. 'एचपी रोबोकॉप'च्या साहाय्याने रस्त्यांवर, आजूबाजूच्या उद्यानांत आणि इमारतींजवळ होणाऱ्या संशयास्पद घडामोडींची माहिती थेट पोलीस मुख्यालयाला पाठवली जाईल. 'एचपी रोबोकॉप'ला लॉस एंजेलिस शहरापासून १० किमी अंतरावरील ५० हजार लोकसंख्येच्या हंन्टिंग्टन उद्यानाजवळील रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. 'एचपी रोबोकॉप'च्या तैनातीचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियासह संपूर्ण अमेरिकेत 'रोबोकॉप' तैनाती केले जातील, असे म्हटले जात आहे.

 

'रोबोकॉप'ने एखादी संशयास्पद माहिती दिली तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना तिथे तत्काळ पोहोचण्याची सवलतदेखील असेल. शिवाय, या 'रोबोकॉप'चे स्वतःचे असे एक ट्विटर खातेही असेल, तसेच या रोबोटच्या छातीवर एक टचस्क्रीन लावण्यात आली आहे. टचस्क्रीनचा वापर करून अडचणीत सापडलेली, समस्यांनी त्रस्त, संकटांनी घेरलेल्या व्यक्ती आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. तसेच हा 'रोबोकॉप' नागरिकांनी केलेल्या तक्रारी समजून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाहीदेखील करेल. शिवाय यातून लोकांना आपण केलेल्या तक्रारीच्या सध्याच्या स्थितीची माहितीदेखील मिळेल. असा सर्व सुविधांनी युक्त, जनसेवेसाठी तत्पर असलेला 'रोबोकॉप' किंवा 'यांत्रिक पोलीसदादा' मदतीला असल्यावर जनसामान्यही कोणत्याही दडपण वा दबावाविना त्याच्याकडे तक्रार नोंदवू शकतील. म्हणूनच लॉस एंजेलिसच्या महापौर करीना मॅकियास यांनी असे म्हटले की, "या संशोधनामुळे सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट होईल." दरम्यान, भारतातही केरळ राज्यात असाच 'रोबोकॉप' कार्यरत असून त्याला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जादेखील दिलेला आहे. आता अशाप्रकारे यांत्रिक पोलीस जर सर्वत्र अस्तित्वात आले तर सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होईल. पण, पोलिसांच्या नोकऱ्या जातील का? की ते एकमेकांना पूरक ठरतील, हा एक प्रश्न निर्माण होतोच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat