महाराष्ट्रातील पहिल्या 'क्लाऊनफिश हॅचरी'चे उद्घाटन

    दिनांक  02-Jun-2019
 

सागरी जिल्ह्यांतील लाभार्थींना मिळणार लाभ

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - गेल्या वर्षभरापासून वन विभागाच्या 'कांदळवन संरक्षण कक्षा'कडून प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या 'क्लाऊनफिश प्रजनन हॅचरी'चे येत्या ५ जून रोजी उद्घाटन होणार आहे. कांदळवन कक्षाच्या रोजगार निर्मिती प्रकल्पाअतंर्गत या हॅचरीत जन्मास आलेली पिल्ले कोकणातल्या किनाऱ्यालगतच्या लोकांना प्रजोत्पादन आणि विक्रीकरता देण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे 'क्लाऊनफिश हॅचरी'चा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.
 

'कांदळवन संरक्षण विभाग' आणि लखनऊ येथील 'नॅशनल ब्युरो आॅफ फिश जेनेटिक रिसोर्सेस' (एनबीएफजीआर) यांच्या संयुक्तविद्यमाने 'क्लाऊनफिश प्रजनना'चा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून ऐरोलीच्या 'किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रा'मध्ये 'क्लाऊनफिश प्रजनना'चा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. यासाठी केंद्राच्या आवारात हॅचरी उभारण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असणाऱ्या या प्रकल्पामध्ये 'क्लाऊनफिश'चे प्रजोत्पादन यशस्वी झाले आहे. त्यामुळे येत्या ५ जून रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे अधिकृतपणे उद्घाटन केले जाणार आहे.

 

'क्लाऊनफिश'ला शोभिवंत माशांमध्ये मोठी मागणी आहे. या माशाची एक जोडी बाजारात १५०० ते २००० रुपयांपर्यत मिळते. त्यामुळे कोकणपट्यातील कांदळवन क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना या माशांच्या प्रजोत्पादनातून रोजगार मिळावा या हेतूने कांदळवन कक्षाने २०० 'क्लाऊनफिश' आणले होते. 'एनबीएफजीआर'च्या सहकार्याने अंदमान, लक्षव्दीप आणि तामिळनाडू येथून या माशांना मुंबईत आणण्यात आले. ऐरोली येथील केंद्रामध्ये हॅचरी बांधून त्यांचा प्रजननाचा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रजनन यशस्वी करण्याबरोबरच माशांची शास्त्रीय पद्धतीने देखभाल करण्यासाठी 'एनबीएफजीआर'चे तज्ज्ञ गेल्या वर्षभरापासून मुंबईत तळ ठोकून आहेत. या प्रकल्पासाठी आणण्यात आलेल्या २०० 'क्लाऊनफिश'ना जोड्यांमध्ये विभागण्यात आले. त्यातील सुमारे ४० जोड्यांनी तग धरल्याची माहिती कांदळवन कक्षातील एका अधिकाऱ्याने दिली. या हॅचरीमध्ये सध्या १० प्रजातींच्या 'क्लाऊनफिश'चा प्रजनन प्रकल्प सुरू आहे. त्यातून सुरूवातीच्या काळात जन्मास आलेली काही पिल्ले दगावली. मात्र आता पिल्लांचा मृत्यूदर नियंत्रणात असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

 

या हॅचरीमध्ये जन्मास येणाऱ्या पिल्लांना कांदळवन रोजगारनिर्मिती प्रकल्पांअंतर्गत कोकणातील गावांमध्ये विक्री आणि प्रजोत्पादनासाठी देण्यात येणार आहे. यासाठी कोकणकिनारपट्टीलगतच्या ६० गावांना निवडण्यात आले आहे. हॅचरीमध्ये जन्मास येणाऱ्या पिल्लांना महिनाभर हॅचरीमध्येच सांभाळून त्यानंतर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील गावांतील प्रकल्पाच्या लाभार्थींना दिले जाणार आहे. या लोकांना हे मासे प्रतिमासा २५ रुपये दराने देण्यात येणार आहेत.या माशांची वाढ करण्यासाठी गावातील लोकांना कृत्रिम पाण्याचे टॅंक बनविणे, त्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारणे आणि पाण्याची गुणवत्ता मोजण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ठाणे आणि पालघर जिह्ल्यामधील लाभार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाले. साधारण आॅक्टोबर महिन्यातपर्यत सर्व जिल्ह्यांतील गावांचे प्रशिक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat