यंदाचा पर्यावरण दिन ठाण्यात!

    दिनांक  02-Jun-2019ठाणे : पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासंबंधीच्या प्रबोधनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘ग्रीन आयडिया २०१९’ या भव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. ठाण्याच्या जांभळी नाका परिसरातील शिवाजी मैदानामध्ये दि. ५, ६ व ७ जून रोजी हा महोत्सव पार पडेल. महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या आघाडीच्या संस्थांचे प्रदर्शन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संशोधकांशी संवादाचा कार्यक्रम हे या महोत्सवाचे आकर्षण आहे. तीन दिवसीय या महोत्सवातील विविध कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून हा महोत्सव सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांकरिता खुला असेल.

 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दै. ‘मुंबई तरुण भारत’ ‘ग्रीन आयडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन करते. यंदा हा भव्य महोत्सव ठाण्याच्या शिवाजी मैदानामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा ५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ‘भारतीय विचार दर्शन’चे अध्यक्ष सुश्रुत चितळे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, ‘एस.एफ.सी.एन्व्हायर्नमेंट प्रा.लि.’चे संचालक संदीप आसोलकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये वन्यजीव संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या निकीत सुर्वे, प्रदीप पाताडे, मोहन उपाध्ये, डॉ. दिनेश विन्हेरकर आणि भाऊ काटदरे यांना ‘ग्रीन अ‍ॅव्हेंजर्स’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाय या संशोधकांच्या संशोधनाला सहकार्य म्हणून ५० हजार रुपयांचा सहयोग निधी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सुपुर्द करण्यात येणार आहे. याशिवाय ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते या महोत्सवाच्यानिमित्ताने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘ग्रीन आयडिया’ या विशेषांकाचे प्रकाशन होईल. या विशेषांकात पर्यावरण आणि वन्यजीव संशोधनासंबंधीचे माहितीपूर्ण लेख तज्ज्ञ संशोधकांनी लिहिले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्रातील ५० हून अधिक पर्यावरणवादी संस्था उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्र वन विभाग, कांदळवन संरक्षण विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात येणार आहे.

 

विविध संस्थांच्या प्रदर्शनाशिवाय वन्यजीव संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तज्ज्ञ संशोधक आपले अनुभव सांगून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता निकीत सुर्वे हा तरुण संशोधक बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील बिबट्यावरील संशोधनाचा उलगडा करणार आहे. यानंतर ७ वाजता ‘सिमेंटच्या जंगलाला हिरवे कोंब’ या सत्रांतर्गत संजीव धामणसे प्रेक्षकांशी ‘ग्रीन बिल्डिंग’ या विषयासंदर्भात संवाद साधतील. त्यापुढे ८ वाजता ‘कांदळवन संरक्षण विभागा’तील डॉ. शीतल पाचपांडे आणि सुनील बाकोडे हे तज्ज्ञ कांदळवनांचे महत्त्व आणि त्यातील रोजगारनिर्मितीच्या संधी याबद्दल माहिती देतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी सकाळपासून विविध उपक्रमांचे आयोजन कार्यक्रमस्थळी करण्यात आले आहे. या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘बॅाम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या शास्त्रज्ञ तुहिना कट्टी पक्षी स्थलांतरांच्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना सांगणार आहेत. ७ वाजता सागरी परिसंस्थेतील जीवांविषयी ‘मरिन लाईफ ऑफ मुंबई’चे संस्थापक प्रदीप पाताडे प्रेक्षकांशी संवाद साधतील. ८ वाजता ‘कचरायन’ या सत्रांतर्गत कचाऱ्याचे व्यवस्थापन याविषयी शैलेंद्र सिंग राजपुत प्रेक्षकांना मार्गदर्शन करतील. तर ७ जून रोजी विविध उपक्रमांबरोबरच सायंकाळी ६ वाजता समुद्री कासवांच्या रंजक गोष्टींचा उलगडा कासवमित्र मोहन उपाध्ये आणि ‘डब्ल्यूसीएडब्ल्यूए’ या संस्थेचे कासवतज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर करणार आहेत. ७ वाजता ज्येष्ठ संशोधक भाऊ काटदरे खवले मांजरांच्या विश्वातील गुपिते प्रेक्षकांसमोर उलगडतील. ८ वाजता प्रदीप सावंत दिग्दर्शित ‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat