हम बेगाने हो गये!

    दिनांक  02-Jun-2019   ते हरले, पुन्हा माईक हातात घेतला आणि ते बडबडले. पण काय आहे ना की, जित्याची खोड मेल्याशिवाय काय जात नाही, हेच खरे. या पक्षनेत्याचे प्रत्येक भाषण, भाषणातील प्रत्येक मुद्दा म्हणजे कशाचा कशाला धरबंध नाही, असेच असतात. पण या सगळ्यामध्ये एक साम्य मात्र जरूर असते, ते म्हणजे विरोधी पक्षात असल्यामुळे सत्ताधारी पक्षाबद्दल काय वाट्टेल ते बोलायचे. पुराव्याशिवाय आणि बदनामीकारक निंदाजनक बोलणे, हे तर या विधानांचे अंतरंग. खोटारडेपणामुळे तोंडघशी पडले की, माफी मागायची हेच या नेत्याच्या जीवनातले महत्त्वाचे कार्य असावे की काय? असे वाटते. या नेत्याने पुन्हा एकदा असेच काहीसे विधान केले आहे. आता ते म्हणाले आहेत की, “देशाची एकही संस्था तुम्हाला म्हणजे काँग्रेसला मदत करणार नाही. एकही व्यक्ती अगदी एकही व्यक्ती तुम्हाला मदत करणार नाही.” ब्रिटिशांच्या काळातही काँग्रेसला कोणत्याही संस्थात्मक घटकांनी मदत केली नाही. तरीही त्यावेळी काँग्रेस ब्रिटिशांशी लढली आणि जिंकली. आताचे राज्य त्यावेळच्या ब्रिटिश राजवटीसारखे आहे. निवडणूकांपुर्वी ते म्हणत होते की, देशातले संस्थात्मक घटक संपणार आहेत. त्यावर भाजप, रा. स्व. संघ आपली माणसं सामील करत आहेत वगैरे वगैरे... हाच मुद्दा आहे. भाजप आणि रा. स्व. संघातली माणसं काय भारताबाहेरची आहेत का? की जे काँग्रेसी विचारधारेचे नाहीत ते परकीय आहेत? राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला असेच वाटते. त्यामुळेच तर त्यांनी देशातल्या संविधानयुक्त प्रशासनास, संस्थात्मक घटकांवरही अविश्वास दाखवला आहे. ते म्हणाले, “एक व्यक्तीसुद्धा काँग्रेसला मदत करणार नाही.” याचाच अर्थ त्यांचा या देशातल्या जनतेवरही अविश्वास आहे. भारतीय जनतेच्या संविधानात्मक निवडीवर राहुल गांधींनी संशय घेतला आहे. पारतंत्र्य लादणाऱ्या ब्रिटिश सरकारची तुलना राहुल यांनी भारतीय जनतेने लोकशाही प्रक्रियेने बहुमताने निवडून दिलेल्या सरकारशी केली. भारतीय जनता, प्रशासन, संविधान यांना परके समजणाऱ्या राहुल यांना या जनतेबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल काही देणेघेणे असेल का? काही आपलेपणा असेल का? याचे उत्तर जे आहे, तेच काँग्रेसच्या भयंकर हरण्याचे उत्तर आहे. तूर्तास, राहुल यांच्या मनात आहे, ‘ये देश लगता है बेगाना।’ त्यामुळेच जनतेच्या सुखदुःखापासून बेगान्या असलेल्या राहुल यांना जनतेने बेगाने केले.

 

डोळे मारायचे की काय?

 

अभी तो मैं जवान हूँ.. हे गाणे फार पूर्वी फार फार लोकप्रिय होते. आता हाच राग रागांनी आळवला आहे. रागा म्हणजे आपले राहुल गांधी हो. तसाही रागा शब्द हा जरा त्यातल्या त्यात नाक्याबिक्यावर कमी उभे राहणाऱ्यांसाठी राहुल गांधी या नावाचा लघुशब्द असेल. पण पट्टीच्या आम जनतेला रागा म्हणजे राग देणारा उर्फ काहीही बोलून अकलेचे तारे तोडणारा म्हणजे राग देणारा अशी व्याख्या असते. यात आता राहुल गांधींचे राहुलचे ‘रा’ आणि गांधीचे ‘गा’ मिळून परफेक्ट रागा बनले, हे त्यांचे म्हणजे राहुल गांधींचे दुर्दैव म्हणायला हवे. तर मुद्दा राहिला की, अभी तो मैं जवान हूँ, असे राहुल म्हणाले. ते म्हणाले त्यांच्या पक्षाबद्दल. काँग्रेस पक्ष हरला तर त्याला आणखीन जवान बनवायचे आहे आणि तो जवान होत आहे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. आता ते असे काहीबाही बोलत असतात. त्यामुळे राहून देऊया. तर आपल्या पक्षाच्या खासदारांना राहुल यांनी मार्गदर्शन केले की, “जरा आक्रमक व्हा, मोठ्याने बोलायला शिका.” या नेत्याला कुणी सांगावे की, बाबा रे खासदार हे त्या त्या लोकसभेचे खासदार पहिले असतात. त्यानंतर एखाद्या पक्षाचे ते खासदार असतात. त्यामुळे आक्रमक व्हायचे म्हणजे काय व्हायचे आणि कुणाशी आक्रमकपणे वागायचे? पंतप्रधान ज्या संसदेला लोकशाहीचे मंदिर मानून नतमस्तक होतात, त्या संसदेमधील खासदारांनी आक्रमक होऊन फक्त भांडाभांडी करायची, वादविवाद करायचे, हे या नेत्याला अपेक्षित आहे का? मुद्दा आहे की, लोकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणजे जे काही ५२ खासदार जिंकून दिले, ते काय संसदेमध्ये तू तू मै मै करत वादावादी करायला निवडून दिलेत का? हरल्यानंतरही जनतेच्या अपेक्षांचा भंगच करायचा, असे काही या नेत्याने ठरवले आहे का? कारण खासदारांनी काम चांगले करावे, लोकांच्या समाजाच्या हिताचे काम करावे, देशसमाज उन्नती पथावर न्यावा, गेला बाजार काँग्रेस पक्षाचे नाव लोक सकारात्मक पद्धतीने घेतील, असे काही करा, असे जर हा नेता त्या पक्षाच्या खासदारांना म्हटला असता तर ठिक आहे. पण त्याने सल्ला दिला, आक्रमक व्हा. त्यांच्या या बोलण्यावर काँग्रेसी खासदार संभ्रमात आहेत की, आक्रमक व्हा म्हणजे गळ्यात पडून डोळेबिळे मारायचे की काय?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat