हॉलिडे एक्स्प्रेसचे चाक तुटले ; रेल्वे विस्कळीत

    दिनांक  02-Jun-2019नाशिक : बरेलीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हॉलिडे एक्स्प्रेसचे दोन डबे नाशिकमधील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. या दुर्घटनेत कोणतीही हानी किंवा जखमी झाले मसाल्याची माहिती आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या मध्य रेल्वेतर्फे समर स्पेशल गाड्या सुरु करण्यात आलेल्या आहेत.

 

बरेली-मुंबई ही एक्सप्रेस आठवड्यातून एकदाच धावते. ही ट्रेन रविवारी नेहमीप्रमाणे मुंबईला येत असताना नांदगाव रेल्वे स्थानक येण्याच्या तीन ते चार किलोमीटर आधी या गाडीच्या गार्डच्या पुढील बी १५ या बोगीच्या ब्रेक व्हिलचे तुकडे पडले. बोगी डळमळत असल्याचे बोगीतील एसी अटेन्डन्स कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने गार्डच्या बोगीत जाऊन याविषयी माहिती दिली. गार्डने गाडीची साखळी ओढत गाडी थांबली. खाली उतरल्यावर बी १५ या बोगीच्या एका बाजूचे चाक तुटल्याचे लक्षात येताच तातडीने याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली.

 

काही वेळातच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर गाडीचे दोन्ही डबे जागीच काढण्यात येऊन उर्वरित गाडी प्रवाशांना घेऊन नांदगाव रेल्वे स्थानकात घेऊन जाण्यात आली. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पोहचल्यानंतर अपघातग्रस्त बोगीचे काम सुरु झाले. तीन तासानंतर या बोगीला त्या ठिकाणाहून रेल्वे यार्डात नेण्यात आले. यामुळे मागून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या अन्य रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. काही वेळानंतर भुसावळ-मुंबई मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक हळूहळू सुरु करण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat