इस्रायलच्या राजदूतांकडून प्रगती प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक

    दिनांक  19-Jun-2019


 


मुंबई : इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिंकलस्टाईन यांच्यासह दूतावासातील निमरोड काल्मर, मिशेल जोसेफ, डॉ. अनुजा पुरंदरे आणि अनय जोगळेकर या अधिकाऱ्यांनी बुधवारी जव्हार आणि मोखाडा येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यात इस्रायल कशाप्रकारे योगदान देऊ शकेल, या उद्देशाने भेट दिली. प्रथम त्यांनी वाघ्याची वाडी येथील ‘बोर्लोफ इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया’च्या (बीआयएसए) पाठिंब्याने सुरू असलेल्या आधुनिक अशा कृषी प्रकल्पाला भेट दिली. तद्नंतर वाघ गावातील जल व्यवस्थापन आणि सौरपंप प्रकल्प, तसेच खोच गावातील तलावातील मत्स्यपालन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली. जव्हारमधील कर्णबधीर मुलांच्या शाळेलाही इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांनी भेट देत मुलांबरोबर आणि कृषी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

 

याकोव्ह फिंकलस्टाईन यावेळी म्हणाले की, “ ‘प्रगती प्रतिष्ठान’सारख्या तळागाळात काम करणाऱ्या संघटना जे काम इस्रायलने आपल्या स्थापनेवेळी केले तसेच काम करत आहे. इथे येऊन शेती, जल व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण विकासात इस्रायलचा दीर्घ अनुभव आपल्याशी सामायिक करताना आनंद होत आहे,” असे सांगतानाच ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबासाठी ‘इंडो-इस्रायल सेंटर्स ऑफ एक्सिलेंस’ला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

“दरम्यान, यंदा दि. १५ सप्टेंबर रोजी हॉटेल ओबेरॉयसह मुंबईतील सुमारे ८० दूतावासांनी-सर्व दुतावासांच्या शिखर संस्थेने मिळून मेल्टींग पॉट नावाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर महोत्सवात निरनिराळ्या देशांतील खाद्यपदार्थांचे प्रदर्शन वेगवेगळ्या देशांच्या दूतावासांकडून ठेवले जाते, ज्याचा उद्देश प्रत्येक देशाने सुचवलेल्या समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका एका स्वयंसेवी संस्थेसाठी निधी संकलनाचा असतो,” असेही त्यांनी सांगितले. यंदा इस्रायलच्या दूतावासाने यासाठी ‘प्रगती प्रतिष्ठान’ची लाभार्थी म्हणून निवड केली आहे. प्रगती प्रतिष्ठान शिक्षण, जल संधारण, शेती, शाश्वत विकास आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात १९७२ पासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वनवासी भागात काम करीत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat