फेसबुकतर्फे 'लिब्रा' क्रिप्टोकरन्सीची घोषणा

    दिनांक  19-Jun-2019 

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप अशी ओळख असलेल्या फेसबुकने आभासी चलन 'लिब्रा'ची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात हे चलन बाजारात आणले जाणार आहे. ही घोषणा केल्यानंतर बिटकॉईन किंवा इतर आभासी चलनांसारखे कमी अधिक मुल्य असणारे हे चलन नसेल, असेही अधोरेखित केले आहे. जगभरातील फेसबुक युझर्स यापूर्वीच गोपनियतेच्या मुद्द्यावरून चिंतेत आहेत. त्यानंतर फेसबुकतर्फे यासाठी उपाययोजनाही आणण्यात आल्या होत्या. आता आभासी चलनामुळे फेसबुककडे पुन्हा एकदा त्याच नजरेने पाहीले जाऊ शकते, त्यामुळे फेसबुकतर्फे आधीच हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भारतात मात्र, हे चलन लॉन्च केले जाणार नाही. 

 

व्हिसा मास्टरकार्डची मदत

फेसबुकतर्फे बाराहून जास्त भागधारकांसह लिब्राची घोषणा केली जाणार आहे, त्यात स्पॉटीफाय, व्हिसा आणि मास्टरकार्ड अशा कंपन्यांच्याही सामावेश आहे. फेसबुकला या भागधारक कंपन्यांतर्फे ७० अब्ज रुपयांच्या गुंतवणूकीची गरज आहे. लिब्रा या आभासी चलनाची लोकप्रियता वाढल्यानंतर त्याअंतर्गत होणाऱ्या व्यवहारांद्वारे नफा मिळवण्याचा विचार कंपनीने केला आहे.

 

स्थिर आभासी चलन

लिब्रा एक स्थिर आभासीचलन आहे. स्थिर चलन सरकार आणि संबंधित मध्यवर्ती बॅंकांतर्फे मान्यता करन्सिज आणि सिक्युरिटीजची मान्यता मिळालेली असते. फेसबुकच्या ब्लॉकचेन समुहाचे अध्यक्ष डेविड मार्कस यांनी दिलेल्या माहीतीनुसार, कंपनी एक डिजिटल वॉलेटची निर्मिती करत आहे. जे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या खात्याशी संलग्न असेल. याचा वापर मित्रमैत्रिणी, कुटूंबातील सदस्य आणि इतर व्यापारविषयक कामासाठी केला जाऊ शकतो.

 

लिब्रा वॉलेटही येणार

लिब्रा वॉलेटसाठी केलिब्रा नावाची कंपनी तयार करण्यात आली आहे. हिच कंपनी डिजिटल वॉलेटची निर्मितीही करणार आहे. इन्स्टाग्रामशी हे वॉलेट जोडलेले असणार नसल्याची माहीती कंपनीने दिली आहे. हे चलन अन्य पेमेंट अॅपमध्ये सुरू राहणार की नाही, याबद्दल अद्याप माहीती उघड झालेली नाही.

 

ऑनलाईन शॉपिंगसाठीही मदत

फेसबुक अधिकाऱ्यांच्या मते जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून व्यवहार करण्यासाठी या करंसीचा उपयोग केला जाऊ शकतो. सद्यस्थितीत असे करण्यासाठी किमान शुल्क आकारले जाते. ज्या खातेधारकांचे बॅंक खाते नाही, किंवा क्रेडिट कार्ड नाही, त्यांच्यासाठी हे चलन ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठीही उपलब्ध असणार आहेत.

ऑनलाईन सवलतींचा भडीमार

लिब्रा कंपनीतर्फे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांना चलनाच्या वापरासाठी सलवतीही देणार आहेत. लिब्रातर्फे विविध कंपन्यांवर भरघोस सवलत मिळण्याचीही शक्यता आहे. साइन इन करतेवेळीच या ऑफर्स दिल्या जाणार आहेत. लिब्रा हे आभासी चलन इतर कंपन्यांपेक्षा संपूर्ण वेगळे असेल, अशी माहीती फेसबुकतर्फे देण्यात आली.

 

डॉलर, युरो, येनच्या तुलनेत असेल मुल्य

लिब्राचे मुल्य, डॉलर, यूरो, येन आणि अन्य देशाच्या चलनांच्या तुलनेत ठरवले जाणार आहे. त्याला या देशातील मध्यवर्ती बॅंकांची मान्यता मिळणार असल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

लिब्रा असोशिएशनचे मुख्यालय

फेसबुक स्वतंत्र्यपणे लिब्राचे संचलन करणार नाही. लिब्रा असोशिएशन नामक बिगर नफा तत्वावर चालणारी संस्था हा कार्यभार सांभाळणार आहे. या संस्थेचे मुख्यालय जिन्होवा येथे होणार आहे. हेच लिब्रा असोसिएशन हे स्वीर्झलॅंड स्थित वित्तीय अधिकारी संस्थेद्वारे संचालित केले जाणार आहे.

 

फेसबुकला विरोध

दरम्यान, लिब्रा बाजारात आणल्यावर फेसबुकला सर्व शंका आणि प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. यापूर्वीच फेसबुकच्या सहसंस्थापकांनी कंपनी गरजेपेक्षा जास्त शक्तीशाली झाल्याचे म्हटले होते. जगभरातील २ अब्ज लोक दररोज फेसबुकचा वापर करतात. डिलिट प्रायव्हसीच्या मुद्द्यावरही फेसबुकचा इतिहास म्हणावा तितका चांगला नाही. त्यामुळे आभासीचलनाला जगभारातून विरोधही केला जाऊ शकतो.

 

गव्हर्नरांना अहवाल सादर करण्याच्या सूचना

या घोषणेनंतर युरोपातील काही राजकीय पक्षांनी फेसबुकच्या विरोधात आवाजही उठवला आहे. पारंपारिक चलनांसमोर अशी आभासी चलन बाजारात आणायला नको, असे वक्तव्य फ्रान्सच्या अर्थमंत्र्यांनी केले आहे. त्यांनी मध्यवर्ती बॅंकांच्या गव्हर्नरांची भेट घेत एक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat