दत्तक शहराचे पालकत्व

    दिनांक  19-Jun-2019   नाशिक शहर हे दत्तक घेतले असल्याचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराप्रसंगी केले होते. त्यानंतर नाशिकस्थित आणि नाशिककर जनतेने मनसे नाकारलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना नाशिक विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्या दत्तक विधानाबाबत कायमच जाब विचारला. मात्र, दत्तक घेतलेल्या या शहराचे पालकत्व नुकतेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यातून निभावले आहे. नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर. तसेच, येथे राज्याचे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठदेखील आहे. मात्र, या नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी होती. त्यानुसार राज्यात ज्या सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली, त्यात नाशिकचादेखील समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दाखल केला असता, त्याला तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक येथे सुरू होणारे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे. तसेच, नाशिक येथे असणाऱ्या जिल्हा रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालयावरील ताण हलका होण्यासदेखील यामुळे मदत होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे यासारखा वनवासीबहुल जिल्हा, तसेच नाशिकमधील वनवासीबहुल पाच तालुके यातील होतकरू आणि गुणवान विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईपेक्षा आता नाशिक हा जवळचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुळात, राज्यात केवळ नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत असतो. अशावेळी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकला येत असतात. अशा गर्दीच्या वेळी आरोग्याच्या समस्यादेखील डोके वर काढत असतात. त्यावेळी केवळ जिल्हा आणि संदर्भ सेवा हीच रुग्णालये रुग्णांची शुश्रूषा करणार का, हा प्रश्न नाशिककर जनतेला सतावत होता. मात्र, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे आता हा प्रश्न निकाली लागणार असून दत्तक वडिलांनी आपले पालकत्व निभावाल्याची जाणीवदेखील काही विरोधकांना होईल, अशी आस बाळगण्यास हरकत नसावी.

 

अध्ययनासाठी परिवेशही महत्त्वाचाच

 

मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने ‘अर्थ’ प्राप्त करून देणारे साधन म्हणजे शिक्षण. शिक्षणात अध्यापन करत असताना अभ्यासक्रम, अध्यापक याचबरोबर महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे भवताल अर्थात परिवेश. आपल्या आजूबाजूचा परिसर नेमका कसा आहे, यावरदेखील व्यक्तीची किंवा व्यक्तीसमूहाची सकारात्मक दृष्टी निर्माण होत असते. जर, परिवेश हा सकरात्मक उर्जेने ओतप्रोत भरलेला असेल तर, निश्चितच व्यक्तीविकासास चालना मिळते. शिक्षणात विद्यार्थ्यांचे मन रमावे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण घटावे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी शासन प्रयत्नशील आहेच. मात्र, त्याला जर सामाजिक संस्थेच्या कार्याची जोड मिळाली, तर चित्र काही वेगळेच उमटते. नेमक्या याच कार्याची प्रचिती नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील आश्रमशाळेमध्ये दिसून आली. येथील आदिवासी सेवा समिती संचालित पूज्य बाप्पा ठक्कर प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेच्या भिंती ‘उडान’ या सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून रंगविण्यात आल्या आहेत. तसेच, शाळेला डागडुजीदेखील करून देण्यात आली आहे. तसेच, रंगविलेल्या भिंतींवर विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने रंग लावू देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेशी असणारी भावनिक जवळीक वाढण्यास मदत झाली. शाळेच्या भिंतीवर इंग्रजी अक्षरे, कार्टून, आकर्षक रंग, मराठी अक्षरे रंगविण्यात आली आहेत. सुट्टीपूर्वी असणारी शाळा आणि आताची शाळा पाहून विद्यार्थी भारावून गेले. तसेच, आगामी पावसात प्रतिवर्षी जाणविणाऱ्या गैरसोयी आता जाणवणार नाहीत, याचेही समाधान विद्यार्थ्यांना मिळाले असणार, हे नक्कीच. शासकीय शाळा म्हटली की, कौलारू किंवा सिमेंट पत्र्याचे छप्पर, जीर्ण झालेली भिंत, बसायला शहाबादी फरशी असे सामान्यतः चित्र असते. ते बदलणे जरी एखाद्या सामाजिक संस्थेच्या आवाक्याबाहेर असले तरी, आहे त्यातच बदल घडवून जे आहे, त्याला आकर्षक करणे सहजशक्य आहे, हेच ‘उडान’ने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेला आकर्षक परिवेश हा नक्कीच त्यांच्या मानस, भौतिक यंत्रणेस गतिशीलता प्रदान करणारा ठरेल आणि त्यांच्या मनात एक सकारात्मक आणि प्रसन्न भाव निर्माण करण्यास यामुळे मदत होईल. त्यातूनच हे विद्यार्थी आपला व्यक्तिमत्त्व विकास सहज साधू शकतील, अशी आशा करुया.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat