'डॉक्टर फॉर बेगर्स'

    दिनांक  19-Jun-2019


 


रुग्णसेवेसोबत अनेक डॉक्टरांनी समाजसेवेचेही व्रत हाती घेतलेले दिसते. पण, फक्त रस्त्यावरील गरीब-भिकाऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठीच तत्पर असे डॉक्टर दिसत नाहीत. पण, याला अपवाद ठरले ते डॉ. अभिजित सोनावणे.


'भिकाऱ्यांचे डॉक्टर' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. अभिजित सोनावणे यांची कहाणी खरं तर सगळ्यांनाच विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. डॉ. अभिजित सोनवणे हे सर्व सुखसुविधांवर पाणी सोडून, लाखोंच्या पगाराला चक्क नाकारून रस्तोरस्ती फिरत भिकाऱ्यांची सेवा करीत आहेत. डॉ. सोनावणे यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण साताऱ्याच्या 'न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये झाले असून महाविद्यालयीन शिक्षणही साताऱ्याच्या 'सायन्स कॉलेज'मध्ये झाले. त्यानंतर पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून अभिजित यांनी १९९९ साली आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आयुर्वेदातील शिक्षण घेऊन 'डॉक्टर' झालेल्या अभिजित यांनी एका छोट्या गावात वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. परंतु, तिथे त्यांचा जम बसत नव्हता. त्यानंतर डॉ. अभिजित यांनी रोज एका गावकऱ्याकडे जाऊन अल्प दरात तपासणी करण्यास सुरुवात केली. मात्र, लोक त्यांच्याकडून तपासून घेण्यासही तयार होत नव्हते. याचे कारण म्हणजे अभिजित यांचा गबाळ्यासारखा अवतार. त्यामुळे ते डॉक्टर आहेत का कोणी भोंदूबाबा, असा प्रश्न गावकऱ्यांना पडे. आता पुढे काय करावे, हा प्रश्न डॉ. अभिजित यांच्या समोर 'आ' वासून उभा होता. आपण आपल्या शिक्षणासाठी सात वर्षे खर्ची घातली. पण, तरी आपल्याला पोटापुरतंही मिळू नये, या विचाराने ते नैराश्याच्या गर्तेत गेले.

 

मंदिरात अभिजित आपल्या भविष्याच्या काळजीत तासन्तास बसून राहत. तेव्हा त्या मंदिराजवळ ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा बसलेले दिसायचे. ते तिथे बसून भिक्षा मागत असत. हळूहळू अभिजित आणि त्यांची मैत्री झाली. त्या आजी-आजोबांनी अभिजित यांना अनेक अनुभव सांगून आयुष्याला कसे सामोरे जायचे, याचे जणू धडेच दिले. त्या काळात त्या आजी-आजोबांनी अभिजित यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. त्यांना भिक्षेतून मिळणाऱ्या अन्नावर अभिजितची गुजराण चाले. लोकांनी दिलेले पैसेही ते नकळत अभिजित यांच्या पिशवीत टाकत. त्या पैशांवर अभिजित दिवस कसेबसे ढकलत होते. अशाच हलाखीच्या दिवसात अभिजित यांना अखेरीस एका चांगल्या रुग्णालयामध्ये नोकरी मिळाली. पगारही समाधानकारक होता. हळूहळू डॉ. अभिजित यांचे राहणीमानही सुधारले. गरिबी आणि श्रीमंती या दोन टोकांच्या आयुष्यातील तफावत त्यांनी जवळून अनुभवली होती. म्हणूनच आता हे सुखही त्यांना कुठे तरी बोचत होतं. सुखवस्तू जीवन जगणाऱ्या डॉ. अभिजित यांना मात्र त्या वृद्ध आजी-आजोबांच्या वेदना स्मृतीपटलावरुन पुसल्या जात नव्हत्या. त्यांच्या प्रेमाची परतफेड करायची, या एकाच निर्धाराने झपाटलेल्या अभिजित यांनी १५ ऑगस्ट, २०१५ रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. देशाच्या स्वातंत्र्य दिनीच स्वत:ला त्यांनी या जोखडातून मुक्त केले. पुढे काय करायचं हेही त्यांना ठाऊक नव्हतं. पण, मनात एक मात्र नक्की होतं की, ज्या आजी-आजोबांनी आपल्याला मदत केली, त्यांचे ऋण फेडायचे. डॉ. अभिजित यांनी आपल्या या सामाजिक कामाला पुण्यातून सुरुवात केली. मंदिर, मशीद, चर्च किंवा गुरुद्वारा अशा धार्मिक स्थळांवर दररोज भिकाऱ्यांना भेटून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारण, डॉ. अभिजित यांना भिकाऱ्यांवर दया करून 'देवता' बनायचे नव्हते, तर त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करायचे होते. एखादा दिवस प्रवासानिमित्त किंवा कुठल्या कामानिमित्त अभिजित ठराविक मंदिराजवळ, मशिदीजवळ, चर्चजवळ वा गुरुद्वाराजवळ गेले नाहीत, तर तेथील भिक्षेकरी चिंतीत होत. ते अभिजित यांची आतुरतेने वाट पाहायचे. त्यांना कोणत्या वाराला अभिजित कुठे असतील, हेही चांगलेच माहीत झाले होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ते नेमक्या ठिकाणी हजेरी लावायचे. विशेष म्हणजे, आजवर अशाच ३३ भिक्षेकऱ्यांना त्यांनी हाताला काम मिळवून दिले.

 

या कार्याविषयी डॉ. अभिजित म्हणतात, “माझा परमेश्वर या पीडित माणसांमध्ये आहे. त्यांना भिक्षा देऊ नका. त्यांच्याशी फक्त प्रेमाने वागा. त्यांना सन्मानाने वागवा. मला एकच आशीर्वाद द्या, माझं हे काम एक दिवस संपलं पाहिजे. या भिक्षेकऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे.” ज्या व्यक्तींना समाजाने टाकून दिलं, त्यांना आपलंस करणं, त्यांना सन्मान प्राप्त करून देणं हेच डॉ. अभिजित यांचे ध्येय आहे. 'डॉक्टर फॉर बेगर्स'अशी डॉ. अभिजित सोनवणे यांची ओळख आहे. त्यांनी या सामाजिक उपक्रमाद्वारे गेल्या तीन वर्षांत ४० आजी-आजोबा आणि दहा युवकांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. या आजी-आजोबांनी आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा हा मार्ग डॉ. अभिजित यांनी निवडला असून अनेकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ते म्हणतात, “डॉक्टर होण्यास चांगली 'डिग्री' लागते, पण चांगला माणूस होण्यास कुठल्याही 'डिग्री'ची गरज लागत नाही.” अभिजित यांनी 'सोहम ट्रस्ट' नावाची संस्थाही स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून भिक्षेकऱ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते. या कामात त्यांच्या पत्नी डॉ. मनीषाही त्यांना मदत करतात. भिक्षेकऱ्यांचा हा नि:स्वार्थी डॉक्टर पुण्यात सोमवार ते शनिवार मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये किंवा गुरुद्वाराबाहेर तुम्हालाही कधी दिसतो का ते बघा...

 

- कविता भोसले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat