मुंबई (अक्षय मांडवकर) : मान्सूनच्या आगमनाने खवळलेल्या समुद्रामुळे राज्याच्या किनाऱ्यांवर जखमी अवस्थेतील सागरी कासवे वाहून येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील वर्सोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर जखमी कासवे आढळून आली आहेत. तर मंगळवारी मुंबईच्या ससून बंदरात मासेमारीच्या जाळ्यात अडकलेले जखमी कासव सापडले. गंभीर बाब म्हणजे यांमधील दोन कासवांच्या पोटात मासेमारीच्या जाळीचे दोर आणि लोखंडी आकडा (हुक) अडकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे समुद्रातील अनावश्यक कचरा सागरी जीवांसाठी घातक ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
दरवर्षी साधारण जून ते सप्टेंबर या कालवधीत राज्याच्या किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जखमी सागरी कासवे आणि डाॅल्फिन, व्हेल सारखे समुद्री सस्तन प्राणी वाहून येत असतात. यातील काही जीव मृतअवस्थेत तर काही अर्धमेल्या अवस्थेत सापडतात. मान्सूनमध्ये समुद्र खवळलेला असतो. अशा परिस्थिती जखमा आणि अशक्तपणामुळे समुद्रात तग धरु न शकलेले सागरी जीव लाटांच्या जोरदार माऱ्यांमुळे किनाऱ्यांवर वाहून येतात. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळदेगच्या किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेले 'हाॅक्सबिल' प्रजातीचे सागरी कासव वाहून आले होते. या कासवाचा एक पर ( पोहण्यासाठी वापरला जाणारा फ्लिपर) कापला गेला होता. गंभीर बाब म्हणजे कासवाभोवती गुडांळलेल्या मासेमारीच्या जाळीचा एक दोर कासवाच्या तोंडावाटे पोटात खोलवर गेल्याचे स्थानिक रहिवाशी सागर मालडकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही दोर काळजीपूर्वक कासवाच्या पोटातून बाहेर काढली. तसेेच कापलेल्या पराजवळील जखमही भरली गेल्याने त्याला पुन्हा समुद्रात सोडल्याची माहिती सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार यांनी दिली. याशिवाय कुणकेश्वरच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या कासवाची सुटका केल्याचे त्यांनी सांगितले. देवगडच्या सागरी पट्यामध्ये मच्छीमारांकडून समुद्रातील प्रवाळ खडकांजवळ जाळी लावून ठेवली जाते. बऱ्याचदा ही जाळी न काढल्याने किंवा ती अनावधानाने वाहून गेल्याने खडकांजवळ आढळणाऱ्या 'हाॅक्सबिल' आणि 'ग्रीन सी' प्रजातीची कासवे यामध्ये सापडत असल्याची माहिती दप्तरदार यांनी दिली. त्यामुळे दरवर्षी मान्सूनदरम्यान या दोन प्रजातींची कासवे देवगड तालुकामधील किनाऱ्यांवर वाहून येत असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय सोमवारी मुंबईतील वर्सोवा किनाऱ्यावर ३१ किलो वजनाचे 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीचे जखमी कासव 'वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमे'चे स्वयंसेवक रोहन कोटवलकर यांना आढळून आले. त्यांनी वन विभागाला कळविल्यानंतर 'राॅ' या प्राणिप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कासवाला ताब्यात घेऊन उपचाराकरिता पुशवैद्यक डाॅ. रिना देव यांच्याकडे दाखल केले. या कासवाच्या गुद्दव्दारामध्ये मासेमारीकरिता वापरल्या जाणाऱ्या नायलाॅनच्या जाळीचा दोर अडकल्याचे दिसून आले. एक्स-रे केल्यानंतर त्याच्या छातीमध्ये लोखंडी आकडा (हुक) अडकल्याचे निदर्शनास आल्याचे 'राॅ' चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी सांगितले. हे कासव सध्या जखमांमुळे ट्राॅमामध्ये आहे. त्यामुळे या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्या छातीत अडकलेला लोखंडी आकडा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेबरोबरच मंगळवारी पहाटे ससून डाॅकजवळ मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना जाळ्यात जखमी कासवे सापडले. हे कासव 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीचे असून परांनजीक जखमा आढळल्याने त्याची माहिती कांदळवन कक्ष आणि 'राॅ'ला दिल्याचे मच्छीमार गणेश नाखवा यांनी सांगितले. 'राॅ' ने या कासवाला वैद्यकीय मदतीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेल्या सागरी जीवांच्या जनजागृतीसंदर्भात सद्या कांदळवन कक्ष आणि मत्स्यविभागाच्या वतीने राज्यातील विविध मच्छीमार संघटनांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळांमध्ये वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित असलेले सागरी कासव किनाऱ्यावर वाहून आल्यास त्याला कसे हाताळावे यासंदर्भात मच्छीमारांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती कक्षाचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी दिली. बऱ्य़ाचदा सागरी कासवांना त्याच्या पुढील परांना धरुन हाताळले जाते. मात्र अशाने त्याच्या परांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला कवचाजवळ पकडून हाताळण्याची पद्धत योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat