ग्रामविकासाचा कल्पवृक्ष

    दिनांक  18-Jun-2019   


देश हमे देता हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सिखे’चा मंत्र जगणारी ‘केशवसृष्टी.’ आपल्या विविध उपक्रमांद्वारे ‘सब समाज को साथ लिये’ शब्दातीत समाज उत्थानाचे काम करत आहे. सूर्यप्रकाशाने परिसरातील कणनकण दीप्तिमान करावा, तसे ‘केशवसृष्टी’ने आपल्या कामामुळे समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये प्रगतीचे तेज जागवले आहे. त्या सर्व उपक्रमांपैकी एक उपक्रम ‘केशवसृष्टीग्राम विकास योजना.’ २०१७ पासून सुरू झालेल्या या योजनेची प्रत्यक्ष प्रचिती देणारा संस्मरणीय कार्यक्रम नुकताच मुंबईच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. औचित्य होते, ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजना’ अहवालाचे प्रकाशन...

 

मनसा सततं स्मरणीयम।

लोकहितं मम करणीयम॥

 

असा वसा घेऊन समाजहितासाठी देशासाठी काही काम करणारी सगळी सज्जनशक्ती ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजना’ अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. केशवसृष्टी ग्राम विकास योजना वार्षिक अहवाल २०१८-२०१९’चे प्रकाशन ‘केशवसृष्टी’च्या माजी अध्यक्षा डॉ. अलका मांडके, ‘अजंता फार्मा’ आणि ‘समता फाऊंडेशन’चे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल, ‘जेटकिंग’चे सुरेश भारवानीयांच्या हस्ते पार पडले. ’यावेळी ‘केशवसृष्टी ग्राम विकास योजने’चे अध्यक्ष विमल केडिया आणि स्वामी विज्ञानानंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते की, या कार्यक्रमामध्ये ‘केशवसृष्टीच्या ग्रामविकास योजने’अंतर्गत सुरू असणार्‍या कामांची अतिशय नेटक्या आणि सुंदर पद्धतीने माहिती दिली गेली. या योजनेंतर्गत विविध आयामांवर काम केले जाते. या कामांचा आढावा, त्या कामांची जबाबदारी घेतलेली तरुणाई उत्स्फूर्तपणे मांडत होती. या सगळ्यांच्या बोलण्यातून या ‘ग्रामविकास योजने’चे भीष्म पितामह आणि दीपस्तंभासारखे मार्गदर्शक म्हणून एकच नाव सातत्याने पुढे येत होते आणि ते नाव होते, ‘विमल केडियाजी.’

 

ग्रामविकास योजनेमध्ये विमल केडियांचे महत्त्वाचे योगदान असण्यापाठी कारण काय असावे? हा प्रश्न विचारताच विमल केडियाजी म्हणाले, “पंतप्रधान मोदीजी म्हणाले आहेत की, ‘घर, ऊर्जा, पाणी आणि स्वच्छतेची सुविधा तसेच बँकखाती आणि विमा या सोयी प्रत्येक नागरिकाला मिळाव्यात.’ एकमेकांशी सर्वार्थाने विकासात्मकरीत्या, संपन्नपूर्ण जोडलेली गावे हे भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केशवसृष्टी खारीचा वाटा उचलत आहे.” विमलजींच्या बोलण्यानंतर ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’चे महत्त्व उलगडत गेले. पालघरमधील जव्हार विक्रमगड मोखाडा हा वनवासी पट्टा, जंगल भाग. या परिसरामध्ये कम्युनिस्टांनी भोळ्या आदिवासींना वेठीस धरलेले. येथील समस्या येथीलच काही समाजविघातक लोक संपू देत नव्हते. स्थानिक आदिवासी नेतृत्वही तयार होऊ देत नव्हते. नेमकी हीच बाब ‘केशवसृष्टी’ने हेरली आणि ‘ग्रामविकास योजने’च्या माध्यमातून यावर काम सुरू केले. राष्ट्रप्रेमी विचारांची संवेदनशील, समाजशील युवापिढी निर्माण करणे म्हणजे अत्यंत चिकाटीचे काम. पण हे दिव्य ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’ने यशस्वीपणे पेलले.

 

या योजनेची सुरुवात कशी झाली? तर, ‘केशवसृष्टी’मध्ये कृषी महाविद्यालय आहे. २०१५ साली विद्यार्थ्यांची पहिली तुकडी महाविद्यालयातून बाहेर पडली. विद्यार्थी हे पालघर जिल्ह्यातीलच होते. आपले विद्यार्थी काय करतात, याचा मागोवा घेण्यासाठी विमलजी केडिया आणि टीम विद्यार्थ्यांच्या गावात त्यांच्या गेले. विमलजींनी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्यांनी एकच प्रश्न विचाारला की, इथे काय समस्या आहेत? यावर सर्वच विद्यार्थी मत मांडू लागले. पण प्रत्येकाचा सांगण्याचा उद्देश हाच होता की, इथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही, समस्याच समस्या आहेत. यावर विमलजींनी त्यांना विचारले, मग या समस्या कोण सोडवणार? यावर विद्यार्थी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. मात्र एक विद्यार्थी म्हणाला, “आम्ही स्वत: सोडवू. मी करेन.” त्याच्या उत्तराने तेथील विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. त्यातूनच मग ग्रामविकास करायचा ही कल्पना पुढे आली.

 

कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी ‘केशवसृष्टी’ पुढे सरसावली.या योजनेद्वारे गावाची पाणीसमस्या, वीजसमस्या, स्वच्छतेची समस्या यावर काम केले जाते. ज्या गावात वीज पोहोचू शकली नाही तिथे सौरऊर्जा पुरवली गेली आहे. ‘माधव संस्कार केंद्रा’च्या माध्यमातून संस्कार केंद्र सुरू आहे. दुसरे असे की, या योजनेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, ग्रामीण युवकांसोबत शहरी भागातल्या युवांना या योजनेमध्ये सहभागी केले जाते. या योजनेमध्ये शहरातल्या युवकाला आपल्या स्वत:च्या प्रतिमेत दडलेल्या परोपकारी ‘हिरो’ला काम करण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळते. त्यामुळेच की काय, टेटवली गावात २६ वनवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणारा शहरी तरुण आहे, गौरव श्रीवास्तव. त्यांना ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’चा यावर्षीचा ‘नानाजी देशमुख पुरस्कार’ही मिळाला आहे. या टेटवली गावामध्ये २६ महिलांच्या प्रगतीने गावाचा उत्कर्ष साधला. या गावात कधी नव्हे, तर या भगिनींच्या प्रेरणेने १०० टक्के मतदान झाले.

 

दुसरीकडे या पालघरमध्ये महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे शिकवले गेले. २१६ महिलांनी या शिकवणीचा लाभ घेतला. या महिलांनी एवढ्या सुंदर पिशव्या बनवल्या की, ‘कोटक महिंद्रा लाईफ इन्शुअरन्स कोर्पोरेशन’ने ३५ हजार पिशव्या शिवण्याचे कंत्राट दिले. एका महिन्याचा अवधी दिला. १४२ महिलांनी हे आवाहन स्वीकारले आणि मुदती पूर्वीच म्हणजे २२ दिवसांमध्ये ३५ हजार पिशव्या शिवून दिल्या. या योजनेमध्ये काम करणार्‍या गावातल्या यास्मिन शेखचे मनोगत तर अत्यंत भावपूर्ण आहे. “कापडी पिशव्या शिवण्याचा रोजगार मिळाला म्हणून एवढ्या तेवढ्यासाठी आम्हाला व्याजाने उसने पैसे काढावे लागत नाही,” हे सांगताना समाधानाने आणि कृतज्ञतेने या भगिनीच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. तिचे मनोगत ऐकून सगळे स्तब्ध झाले. आसन व्यवस्थेच्या बरोबर बाजूला बसलेले विमलजी केडिया हलकेच डोळ्याच्या कडा टिपत होते. याबद्दल त्यांना नंतर विचारल्यावर ते म्हणाले, “माय-भगिनींचं दु:ख थोडंतरी कमी करण्याचा प्रयत्न आमच्या ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’तून होत आहे, याचे ते आनंदाश्रू होते.” यावर काय बोलावे कळेना... दुसर्‍यांच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळाले म्हणून पालकत्वाच्या दृष्टीने आनंदाश्रू टिपणारे अध्यक्ष ज्या योजनेला असतील, त्या योजनेची व्याप्ती नितळ माणुसकी आणि समाजशील आहे हे नक्कीच.

 

केशवसृष्टी ग्राम विकास योजना संस्थात्मक बांधणी

 

अध्यक्ष विमलजी केडिया आहेत, तर संयोजक अरविंद मार्डीकर आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष गायकवाड आहे. प्रशासकीय अधिकारी महेश चितळे आहेत. पुढे शेती आणि पर्यावरण, नीतिमत्तापूर्ण शिक्षण, पाणी, कौशल्य विकास- उद्योगिता, महिला सक्षमीकरण, अपारंपरिक ऊर्जा, सरकारी योजनांची पूर्तता, नेतृत्व विकास, आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर काम करणार्‍या नऊ प्रमुख समित्या आहेत. वाडा, जव्हार आणि विक्रमगडमधील ४२ गावांना सहा भागात विभागून काम केले जाते. प्रत्येक विभागात पाचजण असतात. प्रत्येकी एक विभाग प्रमुख, विस्तारक, महिला प्रमुख, पालक आणि शहरी युवा अशी टीम असते.

 

मिशन २०२२

२०२२ साली भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. त्याअनुषंगाने ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’ने तीन वर्षांची उद्दिष्टं ठेवली आहेत. त्याला ‘मिशन २०२२’ असे नाव दिले गेले आहे. २०२२ सालापर्यंत ७५ गावांमध्ये काम वाढवायचे आहे. स्थानिकांसाठी ७५ नवीन उद्योग या गावांमध्ये सुरू करायचे आहेत. पालघरमध्ये आयटी उद्योग सुरू करायचे आहेत. प्रत्येक वर्षी पाच म्हणजे तीन वर्षात १५ सरकारी योजना ग्रामविकास योजनेअंतर्गत असलेल्या गावांमध्ये पूर्णत्वास न्यायच्या आहेत. तसेच वाडा विक्रमगड जव्हार याबरोबर मोखाडा येथेही काम सुरू करायचे, असे ‘मिशन २०२२चा उद्देश आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष गायकवाड यांनी सांगितले.

९५९४९६९६३८

(संपर्क: संतोष गायकवाड- ७८७५२८३१२३)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat