‘कचरेवाले’तून स्वच्छतेची ‘गरिमा’

    दिनांक  18-Jun-2019   अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांपैकी नील बेट अर्थात शहीद बेटाला ‘कचरेवाले’ अभियानातून कचरामुक्त करणार्‍या गरिमा पूनिया या तरुणीची ही प्रेरक कथा...

 

निळ्याशुभ्र आकाशाची हुबेहूब नक्कल करणारे अंदमानचे निळेशार अथांग पसरलेले समुद्रकिनारे. काही किनारे तर इतके निर्मनुष्य की, आपणच जणू या किनार्‍याला प्रथम चरणस्पर्श करणारे ‘वास्को-द-गामा’च आहोत की काय असा भास व्हावा. पण, अंदमान बेटांच्या सर्वच किनार्‍यांवरील चित्र इतके नितळ-निर्मळ नक्कीच नाही. अंदमान द्वीपसमूहातील असेच एक बेट म्हणजे ‘नील बेट,’ ज्याचे नामकरण ‘शहीद बेट’ असे गेल्याच वर्षी करण्यात आले. या बेटावर आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेलेल्या २६ वर्षीय गरिमा पूनियाला मात्र समुद्रकिनार्‍यावरील तसेच इतरत्र विखुरलेला कचरा या बेटाच्या सौंदर्याला डाग लावणारा वाटला. अंदमानच्या या पहिल्या भेटीतच या नितांत सुंदर समुद्राची झालेली ‘शोभा’ गरिमाच्या मनाला अस्वस्थ करून गेली. सामाजिक कार्य आणि विकास याच अनुषंगाने तिचा अभ्यासही सुरु होताच. मग काय, गरिमाने पालकांची परवानगी घेतली आणि मुख्य भारतीय भूमीपासून दोन हजार किमीहून अधिक लांबच्या अनोळखी अंदमानात ती दाखल झाली आणि स्वच्छता मोहिमेसाठी गरिमाने निवड केली ती ‘शहीद बेटा’ची.

 

साधारण सात किमी लांब आणि चार किमी रूंद क्षेत्रात पसरलेल्या या बेटाला मोठ्या संख्येने देशीविदेशी पर्यटक भेट देतात. या बेटावर सर्व सुखसोयींनीयुक्त अशी रिसोर्ट्सही किनार्‍यावर विसावलेली. पण, या बेटावर कचरा संकलनाची कुठलीही व्यवस्था नव्हती. रिसोर्ट्सचा कचराही आसपासच्या झाडीत टाकला जायचा किंवा थेट जाळला जायचा. अवघ्या पाच-सहा हजार लोकसंख्येच्या या बेटावरील स्थानिकांमध्येही कचरा विल्हेवाटीविषयक अनास्था होती. बेटावरील एका डम्पिंग साईटवर खड्ड्यात सगळा कचरा पुरला जायचा. हीच परिस्थिती बदलण्यासाठी गरिमाने कंबर कसली. सर्वप्रथम या बेटावर राहूनच ही मोहीम राबवायची असेल, तर हाती चार पैसे हवे. नोकरी हवी. म्हणून गरिमाने सुरुवातीला एका रिसॉर्टमध्ये मॅनेजर म्हणून व नंतर एका खाजगी फेरीबोटीतर्फे प्रकाशित मासिकामध्ये संपादक म्हणून नोेकरी स्वीकारली. त्यानंतर स्थानिक रहिवासी, सरकारी अधिकारी आणि रिसॉर्ट मालकांना विश्वासात घेऊन गरिमाच्या ‘कचरेवाले’ मोहिमेने हळूहळू आकार घेतला.

 

पण, गरिमासमोर सर्वप्रथम आव्हान होते ते ‘कचरा वर्गीकरणा’चे. म्हणून रिसॉर्ट मालकांसह स्थानिकांना तिने आधी विश्वासात घेतले. घरोघरी ओला कचरा, सुका कचरा, पेपर, प्लास्टिक, काचा असे वर्गीकरण सुरू झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या साहाय्याने स्वच्छता मोहिमाही राबविल्या गेल्या. ‘शहीद बेटा’वरील एकूण पाच समुद्रकिनार्‍यांवर स्वच्छतेची ही गरिमारूपी लाट सर्वशक्तीनिशी उसळली होती आणि म्हणता म्हणता तब्बल २५० टन कचरा संकलित झाला. कचरा संकलनापूर्वीच त्याच्या विल्हेवाटीचा विचार गरिमाने केला होता. कारण, कचर्‍यावर पुनर्प्रकिया करणारी कोणतीही यंत्रणा या बेटावर उपलब्ध नव्हती. सरकारी अधिकार्‍यांशी पाठपुरावा करून मग हा सगळा कचरा फेरीबोटीतून पोर्ट ब्लेअर येथे आणला गेला.

 

काही कचर्‍याची तिथेच विल्हेवाट लावण्यात आली, तर उर्वरित कचरा पुनर्प्रकियेसाठी चेन्नईला पाठविण्यात आला. गरिमाची ही ‘कचरेवाले’ मोहीम सुरू असताना एक निर्णायक क्षण तिच्या आयुष्यात आला, जिथे तिला पुढील शिक्षणासाठी परदेशगमन किंवा अंदमानातील या मोहिमेपैकी काहीतरी एक निवडण्याची वेळ आली. त्याविषयी गरिमा सांगते की, “मला खरचं वाटलं नव्हतं की ही मोहीम इतकी दीर्घकाळ चालेल. कारण, सुसेक्स विद्यापीठात मी ‘डेव्हल्पमेंटल स्टडीज’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासासाठी इंग्लंडला रवाना होणार होते. पण, त्यापेक्षा अंदमानला माझी जास्त गरज होती. त्यामुळे इथे येणं भागं होतं. कारण, जैवविविधतेने नटलेल्या या बेटांचे संरक्षण, संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. म्हणजे हेच बघा, एकट्या अंदमान-निकोबार बेटांवर पशुपक्ष्यांच्या एक हजार अशा प्रजाती आहेत, ज्यांचे फक्त या बेटांवरच आज अस्तित्व आढळते.”

 

गरिमा आणि तिची मोहीम एवढ्यावर थांबणारी नाही. ‘शहीद बेटां’वरील रिक्षा, वाहनांच्या माध्यमातून स्वच्छताविषयक जनजागृतीपर संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गरिमा आणि तिची स्थानिक स्वयंसेवकांची फळी प्रयत्नशील आहे. गरिमाच्या ‘कचरेवाले’ मोहिमेतील एक प्रमुख घटक म्हणजे पर्यटक. खाण्या-पिण्याचे पॅकेट्स, बाटल्या ते इतरत्र अगदी सहजपणे फेकून मोकळे होतात. कारण, शेवटी त्यांची या पर्यटनस्थळाशी तशी कुठलीही बांधिलकी, आपुलकी नसते. म्हणून, आपल्या मोहिमेत पर्यटकांच्याही मनात स्वच्छतेचे हे बीज रुजवण्यासाठी गरिमा प्रयत्नशील असते. अंदमानला ही व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यापूर्वीही कचरावेचकांसमवेत गरिमाने काही काळ काम केले होते. त्यामुळे कचर्‍यासंबंधी शास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक पैलूंची तिला पूर्ण समज होती. तिची हीच समज, हाच अनुभव अंदमानमध्येही तिच्या कामी आला. गरिमासारखा विचार करणारे मदतीचे असे लाखो हात जर स्वच्छता अभियानाशी जोडले गेले, तर खरंच महात्मा गांधींच्या या दीडशेव्या जन्मशताब्दीवर्षाचे सर्वार्थाने सार्थक होईल, हे निश्चित.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat