शासकीय कार्यालयांसाठी आता सौरऊर्जेचा वापर

17 Jun 2019 16:30:31


 


'स्कोपिंग मिशन फॉर सोलर रुफटॉप' उदघाटनप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती


मुंबई : वीज बचतीसाठी सौरऊर्जा महत्त्वाचा पर्याय असून भविष्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित स्कोपिंग मिशन फॉर सोलर रुफटॉप कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज असून त्यामुळे पाणी आणि कोळशाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्याचबरोबर पर्यावरणपूरक वीज उपलब्धतेमुळे कार्बन उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात घट होऊन कोट्यवधी रुपयांची आर्थिक बचत होऊ शकते.

 

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांनी पथदिव्यांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्याची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अशी ऊर्जा निर्माण केली तर पर्यावरणाची हानी होणार नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नसल्याचे पाटील म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर टप्प्या-टप्प्याने कमी करावा लागणार असून त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याबाबत जनजागृती करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.

 

इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्यात येणार

 

राज्य शासनाने ५ इलेक्ट्रिक वाहने प्रायोगिक तत्वावर घेतली असून लवकरच शासकीय कार्यालयांसाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्यात येणार आहे. वाहनांच्या चार्जिंगसाठी रस्त्यावर जागोजागी चार्जिंग पॉईंट उभारण्यात येतील, त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होईल, असेही पाटील म्हणाले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सौर पंप दिलेले असून त्यामुळे वीजेची बचत झालेली आहे. सौरऊर्जेचा वापर केवळ शासकीय कार्यालयांनी न करता सर्वसामान्य नागरिकांनीही याचा वापर केल्यास आर्थिक बचतीबरोबरच पर्यावरणाचे रक्षण होईल, असे सांगून पाटील म्हणाले, जवळपास ५ हजार सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनल बसविलेले असून सरकारकडून त्याची चाचपणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील सरकारी इमारतींनी ३९ टक्क्यांपर्यंत ऊर्जा बचत केली आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0