फुटीरतावाद्यांचा मालक नापाक पाक

    दिनांक  17-Jun-2019


 


युवकांना, पुरुषांना हाताशी धरून भारत सरकार, भारतीय लष्कराविरोधात विरोध प्रदर्शने करणाऱ्या संघटना अस्तित्वात असतानाच आसियाने काश्मीरमध्ये इस्लामी कायदा म्हणजेच शरियतची अंमलबजावणी आणि काश्मीरच्या 'आझादी'च्या हेतूने 'दुख्तरान-ए-मिल्लत' या महिलांच्या फुटीरतावादी गटाची स्थापना केली, अर्थातच पाकिस्तानच्या आर्थिक रसदीच्या बळावरच.


काश्मिरातील युवकांना चिथावणी देऊन खोऱ्यातल्या शांततेचा भंग करणाऱ्या फुटीरतावादी आसिया आंद्राबी नामक महिलेने आपला मालक पाकिस्तानच असल्याचे मान्य केले. 'दुख्तरान-ए-मिल्लत'ची प्रमुख असलेल्या आसियाने एनआयए चौकशीदरम्यान पाकिस्तानने फेकलेल्या पैशांवर आपल्या कारवाया सुरू असल्याची कबुली दिली. वस्तुतः आसिया आंद्राबीने केलेला खुलासा धक्कादायक वा खळबळजनक नसून हे सत्य देशातल्या नागरिकांना कित्येक वर्षांपासून ठाऊक होतेच. फाळणीनंतर अस्तित्वात आल्यापासून पाकिस्तानने नेहमीच भारतविरोधी भूमिका घेतली. पाकिस्तानात सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक नेत्याने, लष्करशहाने सातत्याने भारताला पाण्यात पाहण्याचे काम केले. भारतद्वेषाच्या पायावरच या सर्वांनी सत्ता मिळवली आणि मजबूत केली. अर्थातच, यात पाकिस्तानच्या लष्कराचा आणि पाताळयंत्री आयएसआयचादेखील वाटा आहेच. किंबहुना, लष्कर आणि आयएसआयच्या तालावर नाचणारेच तिथे सत्ताधारी झाले किंवा त्यांना तसे नाचावे लागले. समोरासमोरच्या युद्धात भारताला पराभूत तर सोडा, काडीइतकेही नुकसान पोहोचविण्याची कुवत नसलेल्या पाकिस्तानने नव्वदच्या दशकात जिहादी दहशतवादाचा मार्ग पत्करला. घुसखोरीच्या, दहशतवादाच्या माध्यमातून भारताला बेजार करता येईल आणि भारत जम्मू-काश्मीरवरील आपला हक्क सोडेल, अशी शेखचिल्ली स्वप्ने पाकिस्तानी नेतृत्वाने पाहिली. परंतु, इथेही भारतीय लष्कराने घुसखोर पाकिस्तान्यांना प्रत्युत्तर देत 'जन्नत'मध्ये पाठविण्याचे काम केले.

 

दरम्यानच्याच काळात प्रचंड पैसा ओतून खोऱ्यातील युवकांना 'आझादी'चे, 'जन्नत'चे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया करवून घेण्यासाठी पावले उचलली. खोऱ्यातील 'हिज्बुल मुजाहिद्दीन', 'हरकत-उल-अन्सार'सारख्या दहशतवादी संघटनांची उत्पत्ती पाकिस्तानच्या याच योजनेचा भाग होती. इथल्या दहशतवादी संघटनांना 'लष्कर-ए-तोयबा', 'जैश-ए-मोहम्मद', 'हरकत-उल-मुजाहिद्दीन' या पाकिस्तानातील गटांचीही साथ होतीच. दोन्हीकडच्या संघटनांनी एकत्र येत जम्मू-काश्मीरसह देशातल्या विविध ठिकाणी बॉम्बस्फोट, गोळीबाराच्या घटनाही घडवून आणल्या, दगडफेकीचेही उपक्रम-कार्यक्रम केले. उल्लेखनीय म्हणजे, एकीकडे खोऱ्यासह देशात दहशतवादी संघटना धुमाकूळ घालत असतानाच 'हुर्रियत कॉन्फरन्स' आणि तिच्याशी संबंधित फुटीरतावादी गटांनी या दहशतवादी संघटनांना, त्यात सामील युवकांना, दगडफेक्यांना पाठीशी घालण्याचे उद्योग केले, ज्याला पाकिस्तानचे आर्थिक पाठबळ होते. दहशतवादी संघटनांनी उग्र, कट्टर मार्ग स्वीकारायचा, तर फुटीरतावादी गटांनी जरा बरेपणाचा आव आणून त्यांना प्रोत्साहन द्यायचे, असा हा प्रकार होता. अर्थातच, हे सगळे चालू होते ते काही सर्वसामान्य काश्मिरींच्या कल्याणासाठी नव्हे, तर आपापले हितसंबंध जपण्यासाठी, जम्मू-काश्मीरचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासाठीच! सय्यद अली शाह गिलानी, मीरवाईज उमर फारुख, यासीन मलिक, मोहम्मद अब्बास अन्सारी, नईम अहमद खान अशी ही फुटीरतावादी पिलावळ यात गुंतलेली होती व आहे. आसिया आंद्राबी हीदेखील यापैकीच एक आणि तिने आता दिलेलीपाकिस्तानच्या पैशावर आम्ही कारवाया करतो,” ही माहिती केवळ तिच्या 'दुख्तरान-ए-मिल्लत' संघटनेपुरती मर्यादित नसून ती सगळ्याच फुटीरतावादी संघटनांना लागू होते.

 

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स या अब्दुल्ला आणि पीडीपी या मुफ्ती कुटुंबीयांच्या मालकीच्या पक्षांनीही दहशतवादी संघटनांत, दहशतवादी हल्ल्यांत, दगडफेकीत सहभागी झालेल्या खोऱ्यातील युवकांसाठी अश्रू ढाळले, फुटीरतावाद्यांना अटक केल्यास त्याला विरोध करण्याचे काम केले. दोन्ही पक्षांनी राज्याची सत्ता उपभोगताना केंद्र सरकारवर विश्वास दाखवायचा आणि सत्ता सुटली की, सरकारविरोधात बोलायचा कित्ता गिरवला. विशेष म्हणजे, या सर्वांचेच हितसंबंध अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांत गुंतलेले आहेत आणि ते कधी उघडपणे समोर येताना दिसतात तर कधी लपून राहतात. परंतु, आता मात्र केंद्र सरकार, सुरक्षा दले आणि तपास यंत्रणांनी देशविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे चांगलेच मनावर घेतल्याचे दिसते. दोन-तीन दिवसांपूर्वी स्थापन केलेला 'टेरर मॉनिटरिंग ग्रुप' असो की 'एनआय'ने फुटीरतावाद्यांना ठोकलेल्या बेड्या असो, या सगळ्याच जम्मू-काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे चालू असलेल्या विघातक कारवायांविरोधातील कार्यवाहीचाच भाग. कदाचित अशाच धडाडीने काम केले तर आगामी पाच वर्षांत खोऱ्यासह संपूर्ण राज्यातले चित्रही पार बदलून गेलेले दिसेलदुसरीकडे आसिया आंद्राबीचे कर्तृत्व काय, याचीही माहिती घेऊ. युवकांना, पुरुषांना हाताशी धरून भारत सरकार, भारतीय लष्कराविरोधात विरोध प्रदर्शने करणाऱ्या संघटना अस्तित्वात असतानाच आसियाने काश्मीरमध्ये इस्लामी कायदा म्हणजेच शरियतची अंमलबजावणी आणि काश्मीरच्या 'आझादी'च्या हेतूने 'दुख्तरान-ए-मिल्लत' या महिलांच्या फुटीरतावादी गटाची स्थापना केली, अर्थातच पाकिस्तानच्या आर्थिक रसदीच्या बळावरच. नंतर भारत सरकारने या गटाला दहशतवादी संघटना घोषित करून तिच्यावर बंदी घातली. तरीही तिच्या कारवाया सुरूच राहिल्या. 

 
२०१५ मध्ये आसिया आंद्राबीला गोहत्येवरुन दोषी ठरवले गेले, तसेच तिने पाकिस्तानचा झेंडा फडकविण्याचा, पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाण्याचा उद्योगही केला. नंतर एनआयएने तिच्या या देशविरोधी कारवायांविरोधात पावले उचलली. तपासादरम्यान आसियाबाबत इतरही महत्त्वाची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, आसियाचा भाचा पाकिस्तानी लष्करात कॅप्टन दर्जाचा अधिकारी असून अन्य एका जवळच्या नातलगाचे पाकिस्तानी लष्कर व आयएसआयशी चांगले संबंध आहेत. तसेच आसियाचे इतर नातेवाईक दुबई व सौदीमध्ये वास्तव्यास असून तिथूनही तिला भारतविरोधी कारवायांसाठी पैसा पाठवला जातो. परंतु, या पैशाच्या माध्यमातून आसियासह इतरही फुटीरतावादी नेते स्वतःचे घर भरतानाही समोर आले. काश्मीरमध्ये अमाप संपत्ती जमवायची, ऐशोआरामी जीवन जगायचे, स्वतःच्या पोरासोरांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचे आणि दगडफेकीसाठी, निदर्शनांसाठी, दहशतवादी हल्ल्यांसाठी सर्वसामान्य काश्मिरींना जाळ्यात ओढायचे, असा हा प्रकार. आता या सगळ्यांचेच बुरखे तपासयंत्रणा फाडत असून लवकरात लवकर यांची रवानगी कारागृहात व्हावी, त्यांच्याविरोधात ठोस पावले उचलावीत, पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवावी आणि काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी, अशी सर्वसामान्य भारतीय नागरिकांची इच्छा आहे आणि भारतीयांची ही इच्छा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण होईल, अशीही सर्वांची अपेक्षा आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat