बंगालमधील डॉक्टरांचा संप मागे

17 Jun 2019 21:02:23



कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत गेल्या आठवड्याभरापासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

 

सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत ममतांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता बॅनर्जी यांनी कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना शहरातील प्रत्येक रुग्णालयात एक पोलीस अधिकारी तैनात करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. बैठकीला सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. ममतांनी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस पाऊल उचलल्याने डॉक्टरांनी समाधान व्यक्त करत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कोलकातातील मंत्रालयाजवळ असलेल्या एका सभागृहात ही बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीचे लाइव्ह कव्हरेज करण्यासही ममतांनी परवानगी दिली होती. दरम्यान, पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप आजपासून देशव्यापी झाला. देशभरातील ५ लाख डॉक्टर संपात उतरले. त्याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0