सत्ते पे सत्ता : भारताची पाकवर सातव्यांदा कुरघोडी

    दिनांक  17-Jun-2019


 


मँचेस्टर : सर्व जगाचे लक्ष लागलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेट युद्धामध्ये भारताने मात केली. आयसीसी विश्वचषकमध्ये भारत आणि पाकिस्तान ७वेळा एकमेकांसमोर आले आणि भारताने ७ वेळा पाकिस्तानवर बाजी मारली. रोहित शर्माच्या १४० धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांमुळे पाकिस्तानसमोर ३३७ धावांचे आव्हान उभे केले. ते पार करताना पाकिस्तानची मात्र दमछाक झाली. पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ८९ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघाने ४० षटकांमध्ये ६ विकेट गमावत २१२ धावा केल्या.

 

भारतीय संघाने टॉस हरल्यानंतरही पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. पहिले फलंदाजी करताना भारताने ३३६ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये रोहित शर्माने नावाला साजेशी खेळी करत १४० धावा केल्या. रोहितने विश्वचषक २०१९मधले आपले दुसरे शतक साजरे केले. तर, शिखर धवनच्या जागेवर आलेल्या के.एल.राहुलने ५७ धावांची खेळी करून पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ७७ धावा करून भारताला मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर मधल्या फळीला आलेल्या हार्दिक पांड्याने २६ धावा केल्या. ५० षटकांमध्ये भारताने ५ विकेट गमावत ३३६ धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर ठेवला.

 

३३७ धावांचे डोंगर सर करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पहिल्यांदाच विश्वचषकमध्ये खेळत असलेल्या विजय शंकरने इमाम हकला ७ धावांवर बाद करत नवीन विक्रम स्वतःच्या नावावर केला. त्याने विश्वचषकाच्या कारकिर्दीत पहिल्याच चेंडूंमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आलेल्या फखर जमान आणि बाबर आझम यांनी अनुक्रमे ६२ आणि ४८ धावा करत भारताला जेरीस आणले होते. परंतु कुलदीप यादवने दोघांचे विकेट घेऊन भारताला पुन्हा सामन्यामध्ये आणले. त्यानंतर हार्दिक पांड्याने एकाच षटकामध्ये २ विकेट घेऊन भारताला विजयाच्या जवळ आणले.

 

पाकिस्तानची ५ बाद १५४ अशी स्थिती असताना पावामुळे खेळ अर्ध्या तासासाठी थांबवण्यात आला. मात्र, त्यानंतर डकवर्थ लूईस नियमानुसार १० षटके कमी करून पाकिस्तानला ३०२चे ध्येय देण्यात आले. मात्र, पाकिस्तानला हे आव्हानही पेलवता आले नाही. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन बळी घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

 


माहितीच्या
महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat