आयएमए'चा आज देशव्यापी बंद : अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभाग बंद

17 Jun 2019 10:35:53



कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या सोमवारी (दि.१७) देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर सोमवारी बंद राहणार आहेत. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचे आंदोलन हे दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले असून संपावर जाण्याचा डॉक्टरांचा हा सहावा दिवस आहे.

 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी सर्व राज्यांना डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे कोणत्याही हिंसेपासून संरक्षण करण्यासाठी विशेष कायदा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर रविवारी आयएमएने देशव्यापी संपाची घोषणा केली. देशातील वैद्यकीय सेवेबाबतची सर्वोच्च संस्था असलेल्या आयएमएने डॉक्टरांवरील आणि हेल्थकेअर सेवेतील कर्मचार्यांवरील मारहाणीबाबत केंद्रीय पातळीवर व्यापक कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली होती.

 

त्यानुसार, उद्याच्या संपावेळी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा इमर्जन्सी आणि कॅज्युलिटी सेवा वगळता रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर्स २४ तासांसाठी सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी ६ वाजेपर्यंत बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

'प्रसारमाध्यमे असली तरच, चर्चा करू'

डॉक्टरांचा हा संप मिटविण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दाखवली. मात्र, डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांना सोबत घेणार असाल, तरच चर्चा करू, असा पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांसोबत बंद खोलीत चर्चा करण्याचे ममता यांचे निमंत्रण फेटाळून लावले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0