पाणीबाणीशी जगाचा लढा

    दिनांक  17-Jun-2019   प्रदूषण आणि हवामान बदलामुळे जगभरातील देश जलसंकटांचा सामना करत असतानाच, सिंगापूरपासून जपानमधील लोक आपापल्या पद्धतीने यावर उत्तरे शोधतानाही दिसतात. अशाच काही नाविन्यपूर्ण पद्धती पाहूया, ज्यामुळे पाण्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते.


महाराष्ट्रासह देशातील लोकसंख्येचा एक मोठा भाग भीषण जलसंकटाशी दोन हात करत असून कित्येक ठिकाणी जमिनीच्या ६०० ते ८०० फूट खाली खोदूनही पाणी हाती लागत नाही. अनेक भागांत घरातील महिला-पुरुषांसह छोट्यांनाही मैलोन्मैल पायपीट करून पाणी आणावे लागते किंवा दूषित पाण्याचा वापर करून तहान भागवावी लागत आहे. प्रदूषण आणि हवामान बदलामुळे जगभरातील देश जलसंकटांचा सामना करत असतानाच, सिंगापूरपासून जपानमधील लोक आपापल्या पद्धतीने यावर उत्तरे शोधतानाही दिसतात. अशाच काही नाविन्यपूर्ण पद्धती पाहूया, ज्यामुळे पाण्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते. जपानमध्ये जलसंकटाचा सामना करण्यासाठी एकाच पाण्याचा पुन्हा पुन्हा उपयोग केला जातो. कसा? तर तिथे स्नानासाठी वॉटर स्प्रे आणि बाथटबचा वापर करतात. सुरुवातीला वॉटर स्प्रेने शरीराला भिजवले जाते आणि नंतर बाथटबमध्ये 'वॉटर डिसइन्फेक्टंट' टाकून त्यात बसायचे. अशाप्रकारच्या बाथटब वॉटरचा उपयोग परिवारातील सदस्य पुन्हा-पुन्हा करतात. नंतरही या पाण्याचा उपयोग घर आणि कपडे धुण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त जपानमधील बहुसंख्य घरांच्या बेसिनमधील पाण्याचा उपयोग टॉयलेटच्या स्वच्छतेसाठीही करतात. नळाखाली हात धुतल्यानंतर पाणी बेसिनखालच्या भांड्यात एकत्र करुन टॉयलेटच्या फ्लशटँकमध्ये सोडले जाते व नंतर त्याचा उपयोग करतात.

 

दुसरीकडे सिंगापूरमध्ये पाणी वाचवण्यासाठी एक निराळीच पद्धती शोधली गेली. या पद्धतीनुसार एका व्यक्तीला स्नानासाठी चार लीटर पाणी मिळेल आणि फरशी धुण्यासाठी स्प्रेचा वापर केला जाईल, अशी रचना करण्यात आली. यासाठी बाथरूममध्ये मॉडिफाईड शॉवर लावण्यात येत असून तेथील पाण्याचा दाब असा असतो की, एक व्यक्ती पाच मिनिटांत चार लीटर पाण्याने स्नान करू शकते. सध्याच्या घडीला सिंगापूर पाण्यासाठी मलेशियावर अवलंबून आहे. अमेरिकेच्या एका अहवालानुसार, २०४० पर्यंत सिंगापूरमध्ये पाण्याचे भयंकर संकट ओढवू शकते. हेच ध्यानात घेऊन इथे रोजच्या कामांतील पाण्याचा वापर ८ टक्क्यांहून कमी करण्यासाठी अभियान चालवले जात आहे, त्याचाच भाग म्हणजे वरील पद्धती होय. चीनममध्येही पाण्याच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. इथे यान लू नामक एका व्यक्तीने दशकभरापूर्वी 'लिटल फिश बेसिन' तयार करून त्या दिशेने पावले उचलली. अनोख्या पद्धतीने तयार केलेले हे फिश बेसिन चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आणि घराघरांत उपयोगातही येऊ लागले. यात बेसिनच्या वर फिश जार लावण्यात आले व त्यात मासे सोडले गेले. अशा बेसिनमध्ये हात धुताना फिश जारमधील पाणी कमी कमी होऊ लागते व पाण्याचा वापर कमीत कमी करण्याची सूचना संबंधित व्यक्तीला मिळते. तसेच हात धुतल्यानंतर ते पाणी पुन्हा फिश जारमध्ये भरले जाते तर सिंकमधून निघालेल्या पाण्याचा वापर स्वच्छता-साफसफाईसाठी केला जातो.

 

दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध केपटाऊन शहरात तर चहूबाजूंनी समुद्र असूनही डे-झिरोसारखी स्थिती उद्भवली. केपटाऊन व परिसरातले पाणी जवळपास संपण्याच्या स्थितीत असून तिथे सरकार व नागरिकांनी एकत्र येऊन पाणी वाया जाणाऱ्या जागा शोधल्या. विविध उपाययोजनांबरोबरच लोकांनाही पाण्याचा उपयोग कमीतकमी करण्याचे आवाहन केले गेले. शाळांमध्येही बालकांना पाण्याच्या किमान वापराचे महत्त्व सांगितले गेले. इथल्या तब्बल २० हजार, ५७४ पाणीगळतीच्या जागा शोधून पाण्याच्या अशाप्रकारे होत असलेल्या अपव्ययावर अंकुश लावला गेला. जुन्या पाईपलाईनही बदलण्यात आल्या. गोल्फ कोर्स आणि उद्यानांमध्ये केवळ प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करण्यात आला. परिणामी, लोकसंख्येत वाढ होऊनही इथे पाण्याचा अपव्यय ३० टक्क्यांहून कमी झाला आणि 'डे-झिरो' स्थितीपासूनही लोकांची काही प्रमाणात सुटका झाली. युरोपातील देशांतही पाणी वाचवण्यासाठी नवनवीन कल्पना लढवल्या जात आहेत. एसी आणि आरओद्वारे बाहेर पडलेल्या पाण्याचा उपयोग इंग्लंड, डेन्मार्कसह युरोपातील कित्येक देशांत बाग-बगिच्यांसाठी, कपडे धुण्यासाठी केला जात आहे. इथे एसी आणि आरओमधून निघालेले पाणी पाईपने हौदात नेले जाते व नंतर तिथून ते अन्य कामांसाठी वापरले जाते. उदाहरणादाखल - एका आरओ मशीनच्या साहाय्याने सरासरी २० लीटर शुद्ध पेयजल मिळवले, तर ते तयार करण्यासाठी ५० लीटर पाणी वाया जाते. इथली सरासरी काढल्यास जवळपास दोन लाख लीटर पाणी केवळ या मशीनमधून खराब म्हणून बाहेर फेकले जाते, पण हेच पाणी वाचवून जलसंकटावर मात करता येऊ शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat