हमारे मुठ्ठी में है आकाश सारा...

    दिनांक  17-Jun-2019   प्रतिकूल परिस्थितीमध्येही अनुकूल समाजभान जपणाऱ्या आणि स्वत:सोबतच अनेकांच्या आयुष्याला घडवणाऱ्या सुचित्रा देहेरकर-इंगळे.


आयुष्य सुगंधित होण्यासाठी काट्यांनाही स्वीकारावे लागते. येणाऱ्या सगळ्याच अडथळ्यांना आयुष्याचा उत्सव म्हणून साजरे करावे लागते... असे जगणे असणाऱ्यांपैकी एक सुचित्रा देहेरकर-इंगळे. ‘केशवसृष्टी ग्रामयोजने’चे सध्या ग्रामीण क्षेत्रात मोठे काम सुरू आहे. साधारण ४२ गावे या योजनेंतर्गत विकासाच्या मार्गावर आहेत. या गावांपैकी कुडूत गावामध्ये विशेष काम करण्याची इच्छा असलेल्या सुचित्रा इंगळे. सुचित्रा इंगळे या ‘केशवसृष्टी’च्या सह कार्यवाह आहेत. यापूर्वी समाजसेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यंदाच्या महाराष्ट्र शासनाच्या ‘समाजभूषण पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्या ‘जनसेवाबँके’च्या संचालिका तर आहेतच, शिवाय मुंबईमध्ये पहिला बचतगट तयार करण्याच्या मानकरीही सुचित्रा इंगळेच आहेत. त्यांनी त्यावेळी ७५० बचतगट तयार केले होते. वनवासी क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्वांसाठी आवश्यक असलेले समाजसेवेचे पदव्युत्तर उच्चशिक्षणही त्यांनी घेतले.

 

मूळ वाडा, पालघरच्या, पण नंतर मुंबईतील सांताक्रुझमध्ये स्थायिक झालेल्या चंद्रकांत देहेरकर आणि रोहिणी देहेरकर यांना चार अपत्य. त्यापैकी एक सुचित्रा. चंद्रकांत हे बीएसएनएलमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यावेळी देहेरकर कुटुंबाची आर्थिकस्थिती अतिशय उत्तम होती. घरात नोकरचाकर होते. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. मात्र, चंद्रकांत यांना दारूचे व्यसन लागले आणि त्यांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले. स्वभावाने कुटुंबवत्सल आणि अतिशय हरहुन्नरी चंद्रकांत यांचे दारूच्या व्यसनाने सर्वकाही हिरावून घेतले. त्यांच्या मद्यपानामुळे घरची परिस्थिती पालटली आणि अन्नान दशा सुरू झाली. रोहिणी साध्या भोळ्या गृहिणी. नवऱ्यापुढे अगदी ‘ब्र’ही न काढणाऱ्या. सुचित्रा सांगतात, “दारू आणि त्याचे भयंकर परिणाम माझ्या मनावर कोरलेले आहेत. आमच्या एका नातेवाईकाच्या कार्यक्रमाला जाणे गरजेचे होते. वडील व्यसनाधीनतेमुळे गेलेच नाहीत. त्यामुळे आईला जाणे भाग पडले. तिथे कौटुंबिक गप्पा सुरू झाल्या. आमचा विषय निघाल्यावर उद्गार काढले गेले की, यांचा बाप २४ तास दारू पिऊन पडून असतो. ही पोरं काय शिकणार बिचारी... आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो प्रसंग माझ्या मनाला इतका लागला की मी ठरवले की मी शिकणार.”

 

सुचित्रा यांनी शिकण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. घरात एकवेळचे अन्न मिळणेही मुश्किल होते. पाचवीत शिकणाऱ्या सुचित्रा आणि त्यांच्या भावंडांनीही काम करायचे ठरवले. त्यावेळी त्यांच्या घरासमोर चिंच आणि बोराचे झाड होते. शेवग्याचे झाड होते. चिंचा, बोरे, शेंगा बाजारात विकण्याचे काम सुचित्रा करू लागल्या. दिवस असेच पोट भरण्यासाठी कष्ट करण्याचे होते. मात्र, सुचित्रा यांच्या मामांनी-मावशींनी या पडत्या काळात खूप मदत केली. पुढे सुचित्रा आठवीला असताना वडिलांची नोकरी गेली. मग तर कामामधून मिळालेले राहते घरही २४ तासात सोडावे लागले. सांताक्रुझहून देहेरकर कुटुंब बोरिवलीला स्थायिक झाले. त्यावेळी सुचित्रा दहावीलाहोत्या. दोन महिन्यांवर शालान्त परीक्षा. काय करावे? बोरिवलीहून दररोज शाळेत सांताक्रुझला ये-जा करणे शक्य नव्हते. त्या दोन महिन्यांसाठी मैत्रिणीच्या घरी राहिल्या आणि शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्या. घरच्या परिस्थितीत काहीच बदल होत नव्हता. मात्र, बारावीला असतानाही परीक्षा शुल्क भरण्यासाठी आईने परिस्थिती चांगली असताना केलेले चांदीचे पैंजण विकावे लागलेे. आईचे डोळे रडून सुजले. दु:खाचे डोंगर उपसूनही आईच्या डोळ्यात आसू आले नव्हते. मात्र, पैंजण विकताना तिला रडू आवरले नाही. ती म्हणाली, “गरिबातल्या गरिबाशी लग्न कर, पण दारूड्याशी करू नकोस. तू खूप मोठी हो, शिक.” त्या अश्रूंनी सुचित्राच्या काळजाचा ठाव घेतला.

 

सुचित्रा त्यांच्या बहिणींसोबत खाजगी शिकवणी घेऊ लागल्या. परिस्थिती थोडी सुधारली. त्यांनी समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. लातूरचा भूकंप आणि १९९२च्या धार्मिक दंगलीमध्ये त्यांनी धडाडीने समाजिक कार्यात भाग घेतला. सुचित्रा या विवेक पंडित यांच्या ‘श्रमजीवी संघटने’त काम करू लागल्या. समाजसेवा करताना त्यांना उमगले की, दारूने केवळ देहेरकर कुटुंबाचीच वाताहत केली नव्हती, तर व्यसनाधीनतेमुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांची वाताहत झाली आहे. त्यातही वनवासीमहिलांच्या आणि पुरुषांच्या हालअपेष्टांना तर पारावरच नाही. विजय इंगळे या संघ स्वयंसेवकाशी परिचय आणि मनोमिलन झाले आणि त्यांनी आंतरजातीय विवाहही केला. जातीपातीच्या पलीकडे माणूस म्हणून जगण्याचे महत्त्व जाणणाऱ्या सुचित्रा यांना त्यांच्या पतीनेही सतत सोबत केली. आज सुचित्रा कौटुंबिक समस्यांवर समुपदेशन करतात. समाजामध्ये तरुणाईने व्यसनमुक्त राहावे, यासाठी प्रयत्न करतात. समाजात जातीपातीच्या भिंती पुन्हा कठोर होताना दिसत आहेत. त्यावर भाष्य करताना सुचित्रा म्हणतात की, “डॉ. बाबासाहेबांना व्यसनाधीन नाही, तर कर्तव्यदक्ष-जबाबदार-सुशिक्षित तरुण आणि समाजही हवा होता. तो समाज घडवायचा असेल तर जातीपातीच्या राक्षसासोबतच व्यसनाचा कलीही गाडला पाहिजे.” मनात आणले, तर सारे शक्य आहे. कारण, हमारे मुठ्ठी मे हैं आकाश सारा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat