कोल्हापूरची 'तेजस्वी' राही...

    दिनांक  17-Jun-2019आयएसएसएफ विश्वचषक २०१९ मध्ये नेमबाज राही सरनोबतने सुवर्णपदक जिंकून २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमधील स्वतःचे स्थान निश्चित केले. आज जाणून घेऊया तिच्याबद्दल...


छोट्या शहरात मोठी स्वप्ने अनेकजण पाहतात. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवून ते पूर्णदेखील करतात. महाराष्ट्रातील अशाच एका छोट्या शहरातून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 'ती' म्हणजे 'अर्जुन पुरस्कार'प्राप्त नेमबाज राही सरनोबत. एकेकाळी पिस्तुल नेमबाजीमध्ये पुरुषांची मक्तेदारी असतानादेखील काही महिलांनी यामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला. अंजली भागवतनंतर महाराष्ट्रातील नेमबाज म्हणूनही राहीची ओळख आहे. दुखापतीवर मात करून तिने तिच्या कारकिर्दीत अनेक शिखरे सर केली आहेत. तिने २०१९ मध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकामध्ये नेमबाजीत तिने सुवर्णपदक मिळवले. यामुळे तिचा २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी प्रवेश मोकळा झाला आहे. राहीच्या या कामगिरीने अंजली भागवत हिने घातलेल्या पायासाठी कळस रचण्याचे काम केले आहे. तिचा कोल्हापूर ते ऑलिम्पिक हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.

 

राही जीवन सरनोबत हिचा जन्म ३० ऑक्टोबर, १९९०रोजी कोल्हापूरमध्ये झाला. शाळेमध्ये असतानाच तिचा संबंध हा एनसीसीशी आला. आठवी आणि नववीमध्ये एनसीसीमध्ये पहिल्यांदा रायफल हातात घेतली. दोन वर्षे थोडीफार तिने शुटिंग केले. परंतु, नंतर दहावीमध्ये गेल्यानंतर अभ्यासाला महत्त्व दिले. दहावीत असतानासुद्धा तिला नेमबाजीमधील आवड स्फुर्ती देत होती. दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने ही आवड जपली. गंमत म्हणजे, ती मुळातच मितभाषी होती. महाविद्यालयीन काळात कुणाशी बोलायला लागू नये म्हणून तिने सरावासाठी रेंजवर जाणे पसंत केले. कारण, तिकडे सर्वचजण सरावामध्ये गुंतलेले असायचे. त्यामुळे तिलाही नेमबाजीमध्ये एकाग्रतेसाठी मदत मिळाली. कमी वयातच तिने तिचे ध्येय ठरवले होते. ५० मीटर 'रायफल प्रोन' प्रकारातील विश्वविजेती नेमबाज तेजस्विनी सावंतकडून राहीने नेमबाजीची प्रेरणा घेतली. २००६ मध्ये तिचा पिस्तुल नेमबाजीचा प्रवास सुरू झाला. २००८ मध्ये 'राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धे'त तिने पहिले सुवर्णपदक मिळविले. आशियाई क्रीडा स्पर्धेतसुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल नेमबाजीसाठी २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत जकार्ता पालेबांग येथे सुवर्णपदक जिंकले. तसेच पुढे तिने २०१० च्या नवी दिल्लीमध्ये झालेल्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे'त दोन सुवर्णपदके पटकावली होती. विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली पिस्तुल नेमबाज ठरली.

 

चँगवॉन येथे झालेल्या 'आयएसएसएफ विश्वचषका'मध्ये तिने २५ मीटर पिस्तुल स्पर्धा जिंकली. राहीने विश्वचषक २०११ मध्ये कांस्यपदक जिंकले. पुढे २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाली. २२ ऑगस्ट, २०१८ रोजी २५ मीटर पिस्तुल प्रकारात ३४ गुण मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. तसेच पदक जिंकणारी ती सर्वात कमी वयाची नेमबाज ठरली होती. तिने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला सुवर्णपदकांच्या शर्यतीत मागे टाकून हा विजय मिळविला. ग्लासगो येथे २०१४ च्या राष्ट्रकुल खेळात तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. नंतर २०१४ मध्येच वर्षी तिने इंचीऑन येथे आशियाई स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक मिळविले. जिथे राही सरनोबत, अनीसा सय्यद आणि हीना सिद्धू या तिघी विजेत्या ठरल्या.

 

त्यानंतर २०१५ ते २०१७ हा काळ तिच्यासाठी दुखापतीचे काळे ढग घेऊन आला. तिच्या हाताला दुखापत झाली. याच काळात २०१६ मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीदेखील गाठता आली नव्हती. कुठल्याही खेळाडूला त्याचे स्वास्थ्य आणि खेळामधील सातत्य महत्त्वाचे असते. परंतु, यावरही मात करत तिने पुनरागमन केले. या सर्व गोष्टींसाठी तिला कुटुंबाकडूनही चांगले सहकार्य लाभले. त्या काळात खचून न जाता तिने स्वतःचाखेळ सुधारण्याकडे लक्ष दिले. याचा फायदा तिला पुढे झाला. २०१७ मध्ये राहीने जर्मनीच्या विश्वविजेत्या नेमबाज मुंखबयार दोरजसुरेन यांना प्रशिक्षक म्हणून निवड करून पुन्हा एकदा जोमाने तयारी लागली. बराच काळ खेळापासून लांब असलेल्या राहीने नवीन आत्मविश्वास मिळवून नवीन आयाम रचण्यास सज्ज झाली. पालेमबंगमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू केली. तिची ध्येय गाठण्याची जिद्द, कुठेही न डगमगता भारतासाठी काहीतरी करून दाखवण्याची चिकाटी आणि खेळासाठी असलेले प्रेम यासर्व गोष्टींमुळे ऑलिम्पिकध्येही ती भारतासाठी सुवर्णपदक मिळवेल, हीच सर्व भारतीयांची इच्छा आहे. तिच्या या यशासाठी आणि ऑलिम्पिकसाठी सर्व भारतीयांतर्फे शुभेच्छा...!

 

- अभिजीत जाधव

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat