अलौकिक असामान्यत्व

17 Jun 2019 20:22:44



खऱ्या अर्थाने कुठल्याही परिस्थितीत आपली ऊर्जा व प्रेरणा जीवंत ठेवणारी माणसे शेवटी ‘असामान्य’ असतात. म्हणून आपल्याला एखादी वेगळी गोष्ट मिळवायला हवी असे वाटते, तर ती मिळविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या व्यक्ती अलौकिक काम करून दाखवितात. तथापि, शेवटी असामान्य अस्तित्वाचा उदय कशात होतो? केवळ कृतीत? वा विचारात? खरे तर विचार व कृतीचा उद्गम जिथे होतो, त्या असामान्य तत्त्वज्ञानात.


या जगातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच असं एक खास विश्व घेऊन जन्माला आलेली असते. या स्वतःच्या विश्वाची जाणीव ठेवण्यासाठी मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात. स्वतःला समजून घेताना कधी कधी काही गोष्टींपासून दूर राहावे लागते. यात आपला ‘अभिमान’ आणि ‘गर्व’ या दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत. पण, जर आपल्याला एक असामान्य अस्तित्व शोधायचे असेल, तर नक्की काय केले पाहिजे? आपण ‘असामान्य’ झाले पाहिजे. असामान्य होण्याची कल्पनाच मुळात जीवाला गुदमरून टाकणारी आहे. आपण इतक्या मोठ्या जगात इतर माणसांपेक्षा असामान्य कसे होणार, हा प्रश्न तसा कठीण आहे. कारण, असामान्य बनायचे, तर त्यासाठी त्या विचारांची बीजे मनात रूजायला लागतात आणि ते खूप आव्हानात्मक काम आहे. आपल्या ‘सामान्य’ जीवनात आपण इतके काय आणखी जमा करणार आहोत की ज्यामुळे ते ‘असामान्य’ होईल. खरे तर ‘अ’ खूप महत्त्वाचा आहे. कुठेतरी आपल्याला सुरुवात करावी लागते. थोडक्यात सांगायचे, तर आयुष्यात ‘सुरुवात’ वा ‘आरंभ’ खूप महत्त्वाचा आहे.

 

आपण दिवसरात्र काहीही विचार करत असतो. त्यातले बरेच विचार हे रोजचे आणि तेच तेच असतात. अशावेळी तुम्ही जर विचार करणारच असाल, तर एखादा ‘मोठा विचार’ का करत नाही? आपल्याला विचार करण्याचे अमाप स्वातंत्र्य मिळालेले आहे आणि या मनाच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने पाहिले, तर आपण कसा विचार करायला हवा किंवा काय कल्पना करायला पाहिजेत, यावर कुणी बंधन वा मर्यादा आणू शकत नाही. म्हणजेच आयुष्यात मोठी स्वप्ने पाहावी आणि मोठे विचार करावेत, म्हणजे मन आपोआप पुलकीत होईल. रोज सकाळी उठल्यावर आपला पगार काही हजारांनी वाढला, या कल्पनेनेच आपण अंथरुणात पटकन उठून बसतो. स्टीव्ह जॉबसारखी माणसे जगात ‘असामान्य’ झाली, ती मुळात विचारांच्या महानतेमुळे. त्यांनी संगणकाच्या उद्योगात जी प्रचंड आणि व्यापक क्रांती केली, ती मुळातच त्यांच्या विचारांच्या क्रांतीमुळेच‘असामान्य’ आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा वेगळी बुद्धिमता असावी लागते, असे नाही. असे असते तर अचाट बुद्धीची सगळी माणसे ‘असामान्य’ झाली असती. त्यासाठी इतरांना मिळत नाही अशी ‘संधी’ मिळायला हवी, असेही नाही. उत्तम संधी मिळूनसुद्धा अनेकांचे पानिपत झाले आहे. कारण, विचारांचा दुष्काळ. आपल्याला काहीतरी अचाट आणि अफाट करायचे तर ‘सामान्यात बसणार नाही’ ही वैचारिक बैठक असायला हवी. एकदा का ही बैठक बसली की, मग अधिक प्रयत्न करण्याची क्षमता विकसित करायला हवी. चांगले आयुष्य शक्य आहे, पण त्यासाठी पोषक प्रवृत्ती आणि अधिक परिश्रम आवश्यक आहेत.

 

आयुष्यातील बऱ्याच संधी दारावर आवाज न करता अलगद येतात, पण त्या ओळखण्यासाठी आपली दृष्टी तितकीच तीक्ष्ण असायला हवी. रोज ज्या गोष्टी सामान्यांनी पाहिल्या आणि त्या त्यांना नैसर्गिक व नित्यक्रमाच्या वाटल्या. पण, शास्त्रज्ञांनी मात्र त्यातून नवीन शोध लावले. म्हणजेच आपण विचारपूर्वक आपल्या आयुष्यात किती नवीन विचार, नवीन सवयी वा नवीन गोष्टी आणतो हे खूप महत्त्वाचे आहे. ऐहिक जगातील सगळी माणसे सामान्य माणसाने पेललेलीच आव्हाने झेलतात. पण, ती आव्हाने पेलताना त्याची प्रक्रिया मात्र वेगळी असते. ती प्रक्रियाच त्यांना असामान्यत्वाकडे नेत असते. त्याच्या प्रक्रियेत स्पष्टता असते व त्यांच्या कृतीत बहादुरी असते. त्याच्यात आणि एक महत्त्वाचा गुणधर्म असतो, तो म्हणजे आयुष्यात कठीण परिस्थितीशी आणि गैरसोयीशी जुळवून घेत आपली ऊर्जा जोपासणारी; खऱ्या अर्थाने कुठल्याही परिस्थितीत आपली ऊर्जा व प्रेरणा जीवंत ठेवणारी माणसे शेवटी ‘असामान्य’ असतात. म्हणून आपल्याला एखादी वेगळी गोष्ट मिळवायला हवी असे वाटते, तर ती मिळविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या व्यक्ती अलौकिक काम करून दाखवितात. तथापि, शेवटी असामान्य अस्तित्वाचा उदय कशात होतो? केवळ कृतीत? वा विचारात? खरे तर विचार व कृतीचा उद्गम जिथे होतो, त्या असामान्य तत्त्वज्ञानात. खऱ्या अर्थाने असामान्य अस्तित्व जगत असते, ते काहींना उमगते, पण काहींना नाही. कधी ऐहिकतेत व्यक्त होते, तर कधी संवेदनेला जाणवते. ते असामान्यत्व मानवी मूल्यांना जोपासणारे नक्की असते. म्हणूनच त्या अलौकिकापुढे आपण कर जोडोनी नतमस्तक होतो.

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0