विश्वशांती संमेलनाची उपयुक्तता

    दिनांक  16-Jun-2019   
भारतीय लोक जेव्हा अशा संमेलनासाठी नेपाळमध्ये दाखल होतात, तेव्हा सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक आदानप्रदानास चालना मिळते. तसेच, पर्यटकांच्या संख्येत वृद्धी झाल्याने नेपाळच्या अर्थकारणासदेखील थोडेफार बळ प्राप्त होते. त्यामुळे दोन देशांतील नागरिक माणूस म्हणून मानवतेच्या भावनेतून एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यतादेखील वृद्धिंगत होत असते.

 

‘वसुधैव कुटुंबकम्’ किंवा ‘हे विश्वची माझे घर’ अशी संतवचने आपण नेहमीच ऐकली आहेत. या विश्वाला घर समजून या विश्वात शांती प्रस्थापित व्हावी याकरिता अनेक लोक जगाच्या पाठीवर प्रयत्नरत असतात. सध्या नेपाळमध्ये नाशिक येथील एका संस्थेच्या वतीने करण्यात आलेले विश्वशांती सोहळ्याचे आयोजनदेखील याच प्रयत्नांचा एक भाग आहे. नाशिक येथील एका संस्थेच्या माध्यमातून आयोजित या संमेलनात भारताच्या विविध राज्यांतून आणि वैश्विक पटलावरून अनेक नागरिक सहभागी होत आहेत.

 

जागतिक स्तरावर विश्वशांतीसाठी एकत्रित प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांसाठी हे संमेलन म्हणजे एक सुपीक व्यासपीठ आहे, असे वाटते. आध्यात्माच्या आधारावर विश्वशांती हा जरी या संमेलनाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असला तरी, हे संमेलन भारतासाठी अनेकार्थाने महत्त्वपूर्ण ठरू शकते. राजकीय अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेचा विचार करणारे अभ्यासक यांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पटलावर घडणारी कोणतीही आणि कितीही छोटी घटना ही नवविचारास जन्म देणारी ठरत असते. किंबहुना ती ठरायला हवी.

 

कोणत्याही देशात दुसऱ्या देशातील नागरिकांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा जागतिक पटलावर दखल घेण्याचा विषय ठरत असतो. सध्या नेपाळमध्ये सुरू असणारे हे संमेलनदेखील त्याचाच एक भाग आहे. नेपाळच्या भूमीत जाऊन विश्वशांतीचा जागर करणे, त्यावर मंथन करणे आणि यासाठी नेपाळची अधिकृत परवानगी मिळणे, हे भारत-नेपाळ संबंधांच्या सुदृढतेचे प्रतीक आहे. भारताच्या बाजूने कायमच नेपाळ सरकार आणि नेपाळी जनता उभी राहिली आहे. मात्र, मागील काही वर्षांत नेपाळची भारताबाबतची भूमिका ही तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून आले आहे.

 

चीनचे नेपाळसमवेत वाढणारे घनिष्ठ संबंध हे त्याचे मुख्य कारण आहे. नेपाळी भूभागाचा विचार केला तर, हिंदुकूश पर्वताच्या पलीकडे चीन वसला आहे. त्यामुळे नेपाळी जनतेचे जीवन सुकर व सुखमय करण्यासाठी, तेथील सरकारला मदत करण्यासाठी आणि नेपाळी भूभागावर वर्चस्व निर्माण करण्यात चीनसाठी हिंदुकूश पर्वत हाच मोठा अडसर आहे आणि त्यामुळेच भारतविरोधी भूमिका कठोरपणे नेपाळलादेखील घेता येत नाही. याच संधीचा फायदा घेत भारताने सातत्यपूर्ण नेपाळसमवेत आपले नाते घट्ट केले आहे. त्यामुळे या नात्यांची वीण आताच्या घडीला अगदी घट्ट विणली गेली आहेच. त्यामुळे आता चीनसमोर हिंदकुश पश्चात हे वृद्धिंगत झालेले नातेदेखील एक मोठे आव्हान असणार आहे. नेपाळच्या भूमीचा डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापर करायचा आणि चिनी माल भारतीय बाजारात उतरवायचा, अशी एकंदरीत भूमिका चीनची राहिली आहे, हे आपण जाणतोच.

 

चीनच्या या नीतीला पायबंद घालण्यासाठी नेपाळची भूमी आणि नेपाळी सरकार व जनता यांच्याशी आपले सलोख्याचे नाते कायम असणे आवश्यक आहे. अशाप्रकारचे संमेलन नेपाळमध्ये होत असल्याने हा सलोखा अजूनच वृद्धिंगत होण्यास मदत होईल, हे नक्की. भारतीय लोक जेव्हा अशा संमेलनासाठी नेपाळमध्ये दाखल होतात, तेव्हा सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक आदानप्रदानास चालना मिळते. तसेच, पर्यटकांच्या संख्येत वृद्धी झाल्याने नेपाळच्या अर्थकारणासदेखील थोडेफार बळ प्राप्त होते. त्यामुळे दोन देशांतील नागरिक माणूस म्हणून मानवतेच्या भावनेतून एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यतादेखील वृद्धिंगत होत असते. त्यामुळे जरी, विश्वशांतीसाठी हे संमेलन होत असले तरी, या संमेलनाच्या माध्यमातून विश्वशांतीच्या व्यापक उद्देशाबरोबरच द्विराष्ट्र संबंध सुधारणेसदेखील चालना मिळण्यास मदत होणार आहे.

 

तसेच, मागील वर्षी पुणे येथे आयोजित जगातील काही राष्ट्रांच्या संयुक्त लष्करी सरावात भाग घेण्यासाठी निघालेल्या नेपाळी सैन्याने अचानक पीछे मूड करत या सरावात सहभाग नोंदविला नव्हता. त्यावेळी चीनचा नेपाळवर असणारा दबावदेखील जगाला जाणवला होता. अशा प्रकारच्या नेपाळच्या तळ्यात मळ्यात भूमिकेस एक दिशा अशा प्रकारच्या संमेलनांच्या माध्यमातून प्राप्त होण्याची आणि नेपाळचे भारताशी अतूट नाते निर्माण होणाची आस निश्चितच बळावते. त्र्यंबकेश्वर आणि पशुपती यांचे अवताराचे समान नाते अधिक वृद्धिंगत करणारे हे संमेलन ठरावे आणि विश्वशांतीसाठी ड्रॅगनचा नेपाळमधील प्रवेश अवरोधित करण्यात यांसारख्या संमेलनाची उपयुक्तता सिद्ध व्हावी हीच अपेक्षा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat