नैसर्गिक उर्जेसाठी ‘सोलार ट्री’

    दिनांक  15-Jun-2019   ‘सोलार ट्री’ हा काही नवीन प्रकार नाही. जसे ‘सोलार पथदीप’, ‘सूर्यचूल’ असे प्रकार आपण पाहात असतो, तसेच ‘सोलार ट्री’ हा प्रकार आहे. या ‘सोलार ट्री’च्या माध्यमातून संपूर्ण दिवस सूर्यप्रकाशात वीजनिर्मिती केली जाते आणि ही निर्मित झालेली वीज रात्री विद्युत वितरण महामंडळाला दिली जाते. तसेच रात्रीच्या वेळी विद्युत महामंडळाची वीज वापरासाठी उपयोगात आणली जाते. घरात उभारण्यात आलेल्या ‘सोलार ट्री’ च्या माध्यमातून नागरिकाने महिनाभर किती वीज विद्युत मंडळाला दिली व किती वापरली याचे प्रमाण तपासून एकूण बिल काढले जाते. अशाप्रकारे नेट मीटरिंग असणारे ‘सोलार ट्री’ राज्यात पहिल्यांदा नाशिक येथे गंगापूर रोड येथील एका रो हाऊसमध्ये लावण्यात आले आहे. त्याविषयी सविस्तर...

 

भवतालच्या वातावरणात पर्यावरण समृद्ध करणारे वृक्ष आपल्याला नेहमीच दिसत असतात. निसर्गचक्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सूर्यापासून प्राप्त होणाऱ्या उर्जेमुळे पृथ्वीतलावर पर्यावरणाचा समतोल राखला जातो, हे आपण सर्व जाणतोच. जसे झाडांना फांद्या, पाने असतात आणि त्यामार्फत सूर्यप्रकाशात प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया होत असते आणि वृक्ष अन्ननिर्मिती करत असतात, त्याचप्रमाणे एकाच खांबावर झाडांच्या पानांसारखेच असणारे मोठे सोलार पॅनल जे सूर्यप्रकाशात वीजनिर्मिती करतात, त्यांना ‘सोलार ट्री’ म्हणतात. अशाच प्रकारची मापनपद्धती अर्थात नेट मीटरिंगवर असणारे राज्यातील पहिले सोलार ट्री नाशिकमध्ये उभारण्यात आले आहे. ‘नेव्हीटास ईफीसेन्स’ कंपनीचे संचालक अमित कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या ‘सोलार ट्री’ची उभारणी करण्यात आली आहे. ‘सोलार ट्रीची’ संकल्पना कशी सुचली, हे सांगताना कुलकर्णी यांनी सांगितले की, “एका साईटवर काम करताना तेथील गच्चीच्या एका कोपऱ्यात ऊन असल्याचे दिसले. गच्चीवर इतरत्र आजूबाजूच्या इमारती व बाकी काही कारणांनी सावली होती. तेव्हा तेथे सोलार पॅनलची जोडणी कशी करावी, हा प्रश्न समोर उभा ठाकला आणि यावेळी ‘सोलर ट्री’ उभारला आणि त्याची संलग्नता नेट मीटरिंगशी जोडली. या माध्यमातून तीन किलो वॅट वीजनिर्मितीसाठी जमिनीवर फक्त दोन बाय दोनची जागा आवश्यक असते. जर, पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने ही व्यवस्था लावली असती तर २५० स्क्वे. फूट जागा लागली असती. मात्र, आता ती केवळ चार स्क्वे. फूट इतकीच लागते.

 

या ‘सोलार ट्री’चे वैशिष्ट्य म्हणजे यातील सोलार पॅनल साफ करण्यासाठी स्वयंचलित सफाई यंत्रणा वापरली जाते. सोलार पॅनल साफ झाले तर वीजनिर्मिती होते, पक्षी बसू नये म्हणून यात बर्ड्स स्पाईकचा वापर करण्यात आला आहे. आकर्षक डिझाईन, कमी जागा, ही याची खास वैशिष्ट्ये आहेत. तसेच यात सोलार सप्लाय ‘डीसी’मध्ये तयार होत असतो. तो ‘एसी’मध्ये रूपांतरित करण्यासाठी ग्रीड टाईड इर्न्व्हटर यात बसविण्यात आले आहेत. विद्युत व्यवस्थेचे एसी वितरण बॉक्स, डीसी वितरण बॉक्स हे सर्व एकाच खांबावर असतात. त्यामुळे देखभाल करणेदेखील सोपे जाते. घर बदलले तरी ही यंत्रणा स्थलांतरित करता येणारी आहे, हे विशेष. तसेच, यात वापरण्यात आलेल्या नेट मीटरिंग प्रणालीमुळे आवश्यक तितकाच वीज वापर होतो, वापरलेल्या विजेचे पैसे अदा केले जातात आणि ऊर्जा संवर्धनास चालना मिळते. भारतात विद्युत वितरणापुढील सर्वात मोठी समस्या ही ट्रान्समिशन लॉसेसची आहे. ट्रान्समिशन लॉसेस याचा अर्थ असा की, चंद्रपूर येथे निर्माण होणारी वीज जेव्हा मुंबई येथे पाठविली जाते, तेव्हा तिच्या वहन प्रक्रियेत होणारे नुकसान. मात्र, ‘सोलार ट्री’ आणि यात वापरण्यात आलेल्या नेट मीटरिंगमुळे विकेंद्रित वीज वितरण निर्मिती या अंतर्गत जेथे वीजनिर्मिती होते, तेथील आजूबाजूच्या परिसराला ती वीज पोहोचवली जाते. ज्यामुळे ट्रान्समिशन लॉसेस कमी होतात. विद्युत वितरण मंडळाचे ट्रान्समिशन लॉसेसचे प्रमाण अद्याप ४० ते ४५ टक्क्यांच्या घरात आहे. त्याला प्रतिबंध करण्यसाठी ‘सोलार ट्री’ व नेट मीटरिंग हे सशक्त पर्याय म्हणून पुढे येत आहेत. तसेच, ‘सोलार ट्री’च्या वापरामुळे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रावर पडणारा ताण कमी होऊ शकतो आणि ज्या गावांना वीज मिळत नाही, त्यांना वीज उपलब्ध होऊ शकते.

 

‘सोलार ट्री’ उभारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात ही योजना राज्यात २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाली. तेव्हा ही योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील १२ वे राज्य होते. मात्र, खऱ्या अर्थाने या योजनेला पहिले मूर्त स्वरूप नाशिकमध्ये देण्यात आले आहे. २०१२ मध्ये ही योजना गुजरातमध्ये सुरू झाली. मात्र, सोलार ट्रीच्या नेट मिटर प्रणालीविरोधात मंडळाच्या वतीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दावा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार मंडळाने ग्रॉस मीटरची मागणी केली आहे. मात्र, ग्रॉस मीटर ही प्रणाली ग्राहकहिताची नसल्याने आणि यातून ऊर्जा संवर्धन होणार नसल्याने नेट मीटरिंगला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेदेखील कुलकर्णी यांनी सांगितले. आज नाशिकचा समावेश हा ‘स्मार्ट सिटी’ परियोजनेत करण्यात आलेला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ‘स्मार्ट सिटी’ परियोजनेत ‘सोलार ट्री’ वापरास चालना मिळणे आवश्यक आहे. यात नाशिकमधील उद्याने, रस्ते, महामार्ग येथे हे ‘सोलार ट्री’ उभारले जाऊ शकतात. तसेच, यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी सूर्यप्रकाशाच्या मदतीने दाखल होणाऱ्या लाखो लोकांचे मोबाईल चार्जिंग करणे सोयीचे ठरू शकते. तसेच, इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंगदेखील या माध्यमातून उपलब्ध करून देणे नक्कीच सोयीचे आहे. नाशिक ते मुंबई दरम्यान या सोलार ट्री बसविल्या तर १४० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते आणि या मार्गावर सूर्यापासून वीजनिर्मिती करण्याकरिता पारंपरिक पद्धतीने यंत्र बसविल्यास ५०० एकर जागा लागेल. मात्र ‘सोलार ट्री’च्या माध्यमातून १००० स्क्वे. फूटपेक्षा कमी जागा लागणार आहे. १ मेगावॅटमध्ये साधारणतः दिवसाला ४००० युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. १४० मेगावॅटमध्य ५ लाख, ६० हजार युनिट एवढी वीजनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे नाशिकमध्ये प्रथमच उभारण्यात आलेल्या या ‘सोलार ट्री’ला राज्यभरात चालना मिळणे ऊर्जा बचत आणि पर्यावरण समृद्धीसाठी आवश्यक आहे, असे वाटते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat