आता ‘ते’ गप्प का?

    दिनांक  15-Jun-2019   पोलिसांकडून किरण जगताप मारहाण व हत्याप्रकरणात दिरंगाई होत असतानाच भाजप खा. अमर साबळे यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र जगताप कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. तसेच मोर्चाही काढण्यात आला. परंतु, एरवी आक्रमक असलेल्या डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांची मात्र या प्रकरणात दातखीळ बसली.


राज्यात एकीकडे ‘जय भीम-जय मीम’चे नारे लावले जात असतानाच, नगर जिल्ह्यात मुस्लिमांच्या एका टोळक्याने किरण उर्फ प्रेम जगताप या दलित युवकाला बस स्थानकावरील रांगेत तिकीट काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून अमानुष व बेदम मारहाण केली. दि. २९ एप्रिलला घडलेल्या या घटनेनंतर किरणला कुटुंबीयांनी नगरच्याच आनंदऋषिजी रुग्णालयात दाखल केले. घरची अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या गरीब व मजूर आई-वडिलांनी किरणला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, लोकांकडून पैसे गोळा करत उपचार केले. परंतु, अद्ययावत व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार न मिळाल्याने कोमात गेलेल्या किरणची प्राणज्योत दि. ४ जूनला मालवली आणि ३५ दिवसांची झुंज अपयशी ठरली. स्वतः मजुरीचे काम करणारा किरण कुटुंबीयांसाठी, आई-वडिलांसाठी एकमेव आधार होता, पण गुंडांच्या दहशतीला बळी पडल्याने तो आधारही त्यांनी गमावला. दरम्यान, किरणला मारहाण झाली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र, तक्रार देऊनही पोलिसांनी ढिसाळपणाचे प्रदर्शन घडवत किरणच्या मारेकऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. किरणच्या वडिलांनी पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या, पण ढिम्म प्रशासनाने हालचाल न करण्याचेच धोरण अवलंबले. अखेर किरणचा मृत्यू झाला, त्यानंतर सूत्रे हलली आणि अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांकडून हल्लेखोरांना पकडले गेले.

 

पुण्यातील कोंढवा भागातून शेख फैजान आणि शेख अराफत अब्दुल या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण, हेच पोलीस तब्बल महिनाभर नेमके काय करत होते? किरणचा जीव गेल्यानंतर लगोलग गुन्हेगारांना अटक करण्याची तत्परता दाखवणारे पोलीस त्याआधी कोणाच्या दबावामुळे आरोपींना पाठीशी घालत होते? आरोपींचा कोण्या राजकीय व्यक्तीशी संबंध आहे का, असल्यास ती व्यक्ती कोण आणि त्या व्यक्तीच्या दडपशाहीमुळे पोलीस कारवाई करण्यापासून दूर पळत होते का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. सोबतच पोलिसांनी सदर आरोपींवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही नगर शहरातील विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शिवाय किरणच्या जागी मुस्लीम युवक असता, तर टोळक्याने त्यालाही अशीच मारहाण केली असती का, असेही विचारले जात आहे. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी बाबा जहागिरदार यालाही लवकरात लवकर अटक करण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, पीडित कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत करावी, अशा मागण्याही करण्यात येत आहेत.

 

पोलिसांकडून किरण जगताप मारहाण व हत्याप्रकरणात दिरंगाई होत असतानाच भाजप खा. अमर साबळे यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र जगताप कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. तसेच मोर्चाही काढण्यात आला. परंतु, एरवी आक्रमक असलेल्या डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांची मात्र या प्रकरणात दातखीळ बसली. ‘बुद्धिजीवी’, ‘उदारमतवादी’ आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्यांनीही किरण जगतापसाठी तोंडातून ‘ब्र’ही काढला नाही. वंचितांच्या नावाने राजकारण करणाऱ्या संघटनांनीही आपलाच समाज आपल्यापासून वंचित राहील याची खबरदारी घेतली. कोणत्याही दूरवरच्या एखाद्या घटनेवरून वादविवाद करण्यात आघाडीवर असलेल्या संघटनांच्या एकाही कार्यकर्त्याने किरणच्या घरी जाण्याची तसदी घेतली नाही. किरणचे आई-वडील न्यायासाठी टाहो फोडत असताना समाजातील संघटना मात्र त्यांच्यापासून दूर पळत आहेत. अर्थातच, हे सर्व समोरचे आरोपी मुस्लीम असल्यानेच होत असल्याचे उघड सत्य आहे. २०१५ सालीही नगरमधल्या सनी शिंदे नामक दलित युवकाची अल्पसंख्याक समुदायातील लोकांनी हत्या केली होती. तेव्हाही वर उल्लेखलेल्या संघटनांनी मूग गिळून गप्प राहण्यातच पुरुषार्थ समजला. आजच्या किरण जगताप प्रकरणात इतरांप्रमाणेच प्रसारमाध्यमांनीही विशेष असे लक्ष घातले नाही.

 

अन्य एखाद्या घटनेवरून देशातले सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याची बतावणी करणाऱ्या पत्रकार-संपादकांनीही इथे आपली संवेदनशीलता, सर्वसमावेशकता धाब्यावर बसवत न्यायासाठी शब्द उच्चारले नाहीत. असे का होते? याचा विचार आता समाजाने करायला हवा. मरणारा आणि मारणारा कोण होता, मरणाऱ्याची जात कोणती, धर्म कोणता, मारणाऱ्याचा धर्म कोणता, जात कोणती, आपल्याला कोणत्या जातीतली वा धर्मातली व्यक्ती बळी गेल्यास फायदा होईल वा फायदा होणार नाही, असा सगळा विचार करुनच ही मंडळी एखादे प्रकरण उचलायचे की दाबायचे हे ठरवत असतात. म्हणजेच इथे न्याय वा इतर मुद्दे गौण असतात, तर केवळ स्वतःच्या फायद्यालाच महत्त्व दिले जात असते. हेच यावरून सिद्ध होते. आता सरकारने तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांवरही योग्य ती कार्यवाही करावी आणि किरण जगतापला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा अन्याय होतच राहील, पीडित टाहो फोडतच राहतील आणि गुन्हेगार कोणाच्या ना कोणाच्या पाठिंब्याने, वरदहस्ताने उजळ माथ्याने वावरतच राहतील, जे लोकशाहीत, संविधानिक व्यवस्थेत, कायद्याच्या राज्यात अपेक्षित नाही-तर उलट ते लांच्छनास्पद ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat