बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय वारसा जागवणारी अस्मिता

    दिनांक  15-Jun-2019   


 


जातीयतेच्या विषैल उतरंडीचे स्वरूप संविधानामुळे बदलताना दिसत आहे. मात्र, तरीही आर्थिकस्तरावर प्रगती साधून सत्तेच्या दालनात स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे कठीणच. मात्र, या सर्व कारणांना पुरून उरत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र,' पुणे (बार्टी) यांनी समाजाचा उत्कर्ष साधला आहे. जातीयतेमुळे निर्माण झालेल्या सर्वच कारणांना समतेच्या संधी उपलब्ध करून देताना 'बार्टी' आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यात अग्रेसर आहे.


पुण्यातील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र' अर्थात 'बार्टी' म्हणजे एक भव्य, पण तितकीच आपलीशी वाटणारी वास्तू. केंद्रात प्रवेश करतानाच स्वागत करतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारे फलक. प्रवेश करताक्षणीच जाणवते की, आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत, जिथे हजारो स्वप्ने साकार झालेली आहेत. वंचित समाजघटकांच्या उत्थानाची सकारात्मक प्रेरणा 'बार्टी'मध्ये प्रवेश करतानाच मनात रूंजी घालते. सरकारी संस्था किंवा कार्यालय म्हटले की, त्यांचे एक विशिष्ट रूप-स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर येते. त्या पार्श्वभूमीवर 'बार्टी'ची वास्तू खूपच वेगळी आणि आदर्शच आहे. पण, ही संस्था काही आधीपासूनच पुण्याला नव्हती. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठा'ची स्थापना दि. २९ डिसेंबर, १९७८ रोजी मुंबई येथे करण्यात आली आणि नंतर याचे नामकरण 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था' असे करण्यात आले. पुढे १९७८ साली ही संस्था मुंबईहून पुण्याला स्थलांतरित करण्यात आली. संविधानाने समाजाला हक्क व अधिकार दिलेले आहेत. पण, जोपर्यंत समाजाचा त्यातही वंचित समाजाचा शैक्षणिक आणि त्या अनुषंगाने आर्थिक स्थैर्यशील विकास होणार नाही, तोपर्यंत संविधानाच्या हक्कांची आणि अधिकारांची खऱ्या अर्थाने कार्यवाही होणार नाही, हाच विचार करून महाराष्ट्र शासनाकडून या संस्थेस दि. १७ ऑक्टोबर, २००८ रोजी स्वायत्त संस्थेचा दर्जा प्रदान करण्यात आला.

 

'बार्टी'च्या नावातच 'संशोधन आणि प्रशिक्षण' आहे. त्यामुळे या संस्थेमध्ये अनुसूचित जमातीमध्ये मोडणाऱ्या ५९ समाजांविषयी 'संशोधन' आणि समाजगटातील गरजूंना 'प्रशिक्षण' ही संकल्पना स्पष्ट होते. युपीएसी, एमपीएसी किंवा आयबीपीएसच्या स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी 'बार्टी' समाजातील तरुणांना प्रशिक्षण आणि इतरही मदत करते. पण, यासाठीची कार्यपद्धती अत्यंत पारदर्शक आणि वाखण्याजोगी आहे. 'बार्टी' हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण करावे, यासाठी त्यांना विविध शिष्यवृत्तीही देत असते. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल सोशल सायन्स रिसर्च शिष्यवृत्ती' (BANSSRF), 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च शिष्यवृत्ती'(BANRF), 'सावित्रीबाई फुले नॅशनल रिसर्च शिष्यवृत्ती' (SPNRF), 'जोतीराव फुले नॅशनल रिसर्च शिष्यवृत्ती'(JPNRF), 'छत्रपती शाहू नॅशनल रिसर्च शिष्यवृत्ती' (CSNRF) देण्यात येते. 'बार्टी' विविध अंगाने समाजकार्यात अग्रेसर आहे. जातीचा दाखला पडताळणी विभाग, कॉम्पिटेटिव्ह कोचिंग परीक्षा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, अधिछात्रवृत्ती विभाग, संशोधन विभाग, प्रकाशन व प्रसिद्धी विभाग, निवासी शाळा येरवडा, पुणे, स्कॅनिंग अ‍ॅण्ड डिजिटलायझेशन, कौशल्य विकास कार्यक्रम विशेष कक्ष, विशेष प्रकल्प, प्रशिक्षण वगैरे विभागांमधून 'बार्टी' समाजसेवेचे नवे नवे उच्चांक गाठत आहे. 'बार्टी'चे संचालक आयपीएस कैलास कणसे यांना भेटले आणि 'बार्टी'चे अंतरंग उलगडत गेले. कैलास कणसे या अधिकाऱ्याचे 'बार्टी'चे संचालक असणे म्हणजे 'दुग्धशर्करा योग' म्हणायला हवा. कारण, समाजकार्याचे पदव्युत्तर प्रशिक्षण, कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण आणि एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण झालेले कैलास कणसे. हुशार बुद्धिमान कणसे यांचा 'बार्टी'चे काम आणखीन प्रभावशाली कसे करता येईल, यासाठी प्रचंड मेहनत घेणारे आणि नवनव्या कल्पना प्रत्यक्षात राबवणारे म्हणून लौकिक आहे. पण, या लौकिकाचा तीळमात्रही गर्व त्यांना नाही. भेटायला आलेल्या शेवटच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकल्याशिवाय कैलास यांचे कार्यालयीन काम संपत नाही, यातच सर्व आले.

 
 
 

'बार्टी'ने संविधान जागरणाचा एक अनोखा उपक्रम घेतला आहे. 'बार्टी'तर्फे चंद्रपूर ते चैत्यभूमी दादर अशी 'संविधान जागर यात्रा' होणार आहे. त्यादरम्यान प्रत्येक शहरात संविधान जागरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात 'बार्टी'चे अधिकारी, त्या शहरातील समतादूत, (समता दूत म्हणजे शहरामध्ये 'बार्टी'च्या योजना समाजामध्ये कार्यान्वित करण्यासाठी नेमलेले 'बार्टी'तर्फे सेवक) आणि 'बार्टी'तर्फे राबवलेल्या योजनांचे लाभार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी संविधानानाने दिलेले हक्क आणि अधिकार, तसेच नागरिकांची जबाबदारी, संविधानिक एकता यावर जागृती करण्यात येणार आहे. परिसरातील लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात येणार आहे.

 

'बार्टी'च्या कामातील सगळ्यात संस्मरणीय काम कोणते? या प्रश्नावर कैलास सांगतात,"मी मूळचा मराठवाड्यातला. वडील महसूल विभागात कामाला. घरची परिस्थिती सामान्य. वडील नेहमी सांगत की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असे सांगितले आहे. प्रथम शिका, स्वत:ला सक्षम बनवा." वडिलांचे म्हणणे मी काळजावर कोरले. त्यामुळे शिकत गेलो. मात्र, समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण घेताना मला कैकाडी समाजावर एक प्रकल्प करावा लागला. तो प्रकल्प करताना कैकाडी समाजाच्या पालावर गेलो. पण, त्या समाजाचे प्रश्न आणि वास्तव पाहून पुरता हादरून गेलो. त्यांचे जगणे म्हणजे जन्माच्या आणि मरणाच्यामध्ये जो काळ असतो, तो नरकयातना भोगून ढकलणे. यांच्यासाठी काय करावे सूचत नव्हते. मात्र, 'बार्टी'मध्ये आल्यानंतर 'बार्टी'तर्फे संशोधनांतर्गत कैकाडी समाजावर शोधप्रकल्प सादर केला. त्यावेळी मनाला आंतरिक समाधान मिळाले. वाटले, ज्या समाजाचे वास्तव पाहून माझ्यातल्या माणूस खऱ्या अर्थाने भावविवश झाला होता, त्या समाजाचे प्रश्न शासन दरबारी मी पोहोचवू शकलो," हे सांगताना कैलास यांच्या चेहऱ्यावर शब्दातीत समाधान होते. मात्र, क्षणभर थांबून पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळत त्यांनी 'बार्टी'च्या उपक्रमांची यादीच मांडली. तसेच 'बार्टी'मध्ये दीड वर्षांपूर्वी नियुक्ती झाल्यानंतर काय निर्णय घेतले, त्यांची अंमलबजावणी कशी केली, याचीही त्यांनी मनमोकळी चर्चा केली. कैलास हे 'बार्टी'चे संचालक होण्याआधी पोलीस खात्यात अधिकारी होते. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा येथील जनजीवन त्यांच्या अनुभूतीचे. समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी त्यातही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे त्यांना चांगलेच माहिती. त्यामुळे 'बार्टी'तर्फे पूर्वी स्पर्धा परीक्षेसाठी १०० विद्यार्थ्यांना साहाय्य केले जायचे. मात्र, कैलास यांच्या प्रयत्नांनी 'बार्टी' २०० मुलांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करत आहे. या निर्णयाबाबत सांगताना कैलास म्हणतात की, "स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तरीसुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. त्यांच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. त्यामुळे ते प्रशासकीय अधिकारी नाही झाले तरी, आयुष्यात इतर क्षेत्रांमध्ये यशस्वी होतील. ही माझ्यासाठी आणि 'बार्टी'साठी आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे."

 

कैलास आणि 'बार्टी'चा असा सकारात्मक, ऊर्जात्मक विचार आणि कार्य असल्यामुळेच गेल्यावर्षी अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीचे काम अचानकपणे बार्टीकडे सोपविण्यात आले. दिलेल्या कालावधीमध्ये आहे, त्या कर्मचारीवर्गामध्ये अतिरिक्त आणि अत्यंत गंभीर जबाबदारीचे काम 'बार्टी'कडे आले. त्यावेळी कैलास यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला होता. मात्र, कुशल व्यवस्थापकाचा आदर्श निर्माण करत कैलाश यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, कर्मचारी वर्ग आणि वेळ यांचे व्यवस्थित नियोजन केले. हेल्पलाईन निर्माण केल्या. त्यामुळेच ७० हजार विद्यार्थ्यांची वेळेवर उत्तमरीत्या जात पडताळणी झाली आणि हे विद्यार्थी वेळेवर त्यांच्या नियोजित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकले. आगामी काळात 'बार्टी'तर्फे अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या ५९ समाजांचे सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षणअनुसूचित समाजाच्या प्रगतीचे प्रवेशद्वार आहे, हे नक्कीच. 'बार्टी'तर्फे सफाई कामगारांच्या मुलांसाठी येरवडा येथे वसतिगृह चालवले जाते. यंदा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेत लक्षणीय यश मिळवले आहे. 'बार्टी'तर्फे समाजातील तरुणांनी उद्योजक व्हावे यासाठीही विशेष उपक्रम राबवले जातात. समाजातील महिलांच्या उत्थानासाठीही ते नवनवीन प्रकल्प आखत आहेत. बळीराजाच्या जीवन मरणाच्या प्रश्नाचा अभ्यास करीत समाजातील शेतकरी बांधवांना आधुनिक कृषी कौशल्याचे प्रशिक्षणही बार्टीकडून देण्यात येते. तसेच 'राईट टू एज्युकेशन'अंतर्गत 'बार्टी'ने ग्रामीण भागातील चार हजार मुलांना शिक्षणाची संधी उपल्ब्ध करून दिली. तसेच पाली त्रिपीटिकाचे मराठी भाषांतर 'बार्टी' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून करत आहे. याच विद्यापीठासोबत 'बार्टी'ने 'पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डॉ. बाबासाहेब आंबेडकर : थॉट्स ऑन नेशन सिक्युरिटी' ही पदव्युत्तर पदविका सुरू केली आहे. शासनाच्या विविध खात्यांशी समन्वय साधत 'बार्टी' समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करत आहे. एकंदर समस्त समाजाच्या कल्याणासाठी 'बार्टी' सिद्ध आहे. 'बार्टी'ची अंतर्गत व्यवस्था, प्रशासन नव्हे, सुशासन पाहिले की वाटते, 'बार्टी' भारतातील सर्वच प्रशासकीय संस्थांसाठी 'दीपशिखा' तर आहेच आहे; त्याहीपलीकडे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विचारसूर्याचा वारसा जागणवारी एक अस्मिता आहे.

 

संपर्क : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), ०२०-२६३३३३३०, २६३३३३३९, २६३४३६००

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat