दोष हा कुणाचा...?

    दिनांक  14-Jun-2019   


 

२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर अजूनही पराभूत मानसिकतेत बुडालेले विरोधक सावरलेले नाहीत. एकीकडे राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्षपद नकोसे झाले, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात सपा-बसपाने वेगळी चूल मांडली. शरद पवार, ममता बॅनर्जी यांनी सूडबुद्धीने इव्हीएमवर दोषारोपण केले, तर कोणी मोदींमुळेच पराजय पत्करावा लागल्याची जाहीर कबुलीही दिली. पराभूत झालेल्या कुठल्याही पक्षाने थेट आपल्या कार्यकर्त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले नाही. हो, शरद पवारांसारख्या 'जाणत्या' नेत्याने कार्यकर्त्यांचे कान टोचले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा कानमंत्रही दिलाच. पण, काँग्रेसच्या चिंतनात या सगळ्या पराजयाचे खापर हे सुरुवातीला त्या पक्षातील ज्येष्ठ त्रिमूर्तींवर फोडण्यात आले. गहलोत, कमलनाथ आणि चिदंबरम यांच्या पुत्रप्रेमामुळे म्हणे काँग्रेस बुडाली. हे जरी खरे मानले तरी मग राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू या तीन नेत्यांच्या राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांतही काँग्रेसची कामगिरी निराशाजकच राहिली. असो. पण, कोणावर तरी पराजयाचे खापर फोडून जबाबदारी डोक्यावर मारणेच काँग्रेसला अधिक सोयीस्कर वाटले. या सगळ्यात सध्या कडी केली ती प्रियांका गांधींनी. काँग्रेसच्या या अध:पतनाला खुद्द काँग्रेस कार्यकर्तेच जबाबदार असल्याचे विधान प्रियांकांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी रायबरेलीचाच दाखला दिला. २०१४ ला साडेतीन लाख मतांनी विजयी झालेल्या सोनिया गांधी यंदा १ लाख, ६७ हजार मतांनीच रायबरेलीतून जिंकल्या. अर्थात, मताधिक्क्य वाढायच्याऐवजी कमी झाले. याला प्रियांकाच्या लेखी जबाबदार कोण, तर काँग्रेसचे कार्यकर्ते! “ज्यांनी पक्षासाठी काम केले नाही, त्यांची नावे मी शोधून काढेन,” असा दमही प्रियांका गांधींनी भरला. त्यामुळे काँग्रेसची आज जी काय दुरवस्था झाली, त्याला माता-पुत्र-कन्या हे गांधी घराण्यातील, पक्षातील सर्वोच्च त्रिकूट नाही तर जबाबदार कोण, तळागाळातले कार्यकर्तेच! पराभूत कार्यकर्त्यांना धीर देण्यापेक्षा, त्यांच्यात मिसळून पक्षपातळीवरील समस्या जाणून घेण्यापेक्षा आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर विश्वास दाखवून पुढील निवडणुकांत जिद्दीने काम करण्याची उमेद जागृत करण्यापेक्षा प्रियांकांनी 'ब्लेमगेम'चा आधार घेतला. प्रियांकाने दाखविलेल्या या अविश्वासामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील खदखदणारा रोष अधिक वाढीस लागून, आधीच फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या काँग्रेसची आगामी काळात अजून शकले पडल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

प्रगती की अधोगती?

 

आपला जन्मच मुळी देशाचे नेतृत्व करण्यासाठी झाला आहे, या आवेशात वावरणार्‍या गांधी घराण्यातील एकाही सदस्याने कधी विचारही केला नसेल की, जनतेकडून गांधी घराण्यातील सदस्याने चक्क मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे, अशी मागणीही केली जाऊ शकते. पण, रायबरेलीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रियांका गांधींना २०२२ साली होणार्‍या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी काही उत्साही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. आता या आग्रही मागणीकडे कुणी गांधी घराण्याची प्रगती म्हणून पाहावे की अधोगती, हाच प्रश्न उपस्थित होतो. नेहरूंपासून ते राजीव गांधींपर्यंत काँग्रेसने सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहून सत्ता उपभोगली. पंतप्रधानपद हे जणू या देशाने आपल्याच घराण्याच्या पदरात कायमस्वरूपी दान केल्याचा (गैर)समज या घराण्याने करून घेतला. सोनिया गांधीही त्याला अपवाद नाहीत. पण, म्हणे 'अंतरात्मा की आवाज' ऐकून त्यांनी २००४ साली मनमोहन सिंगांना पंतप्रधानपदी बसवून सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात ठेवल्या. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांत राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार ठरले. पण, २०१९च्या पराभवानंतर आता काँग्रेसमध्येही उलटे वारे वाहू लागले आहेत. कारण, राहुलची जागा प्रियांकाने घ्यावी, वाराणसीतून त्यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवावी, अशा चर्चांचा स्तर आता चक्क प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित करा, इथवर पोहोचला आहे. गांधी घराण्यात यापूर्वी कुणीही मुख्यमंत्रिपद भूषविलेले नाही. हे पद या घराण्यासाठी तसे कायमच दुय्यम. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच कारभार हाकणार्‍या काँग्रेसी मुख्यमंत्र्यांची जुनी परंपराच... त्यामुळे गांधी घराण्यातील सदस्याचा राजकीय प्रवास हा 'पंतप्रधानाचे उमेदवार ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार' असा खानदानी प्रवाहाच्या विरोधात झालाच, तर ती राजकीय अधोगतीच म्हणावी लागेल. म्हणूनच काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांवर अशी मागणी करण्याची वेळ का ओढवली, याचे चिंतन करावे. कारण, याचाच दुसरा अर्थ असा निघतो की, उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यातही काँग्रेसला पक्षपातळीवर नेतृत्व देऊ शकणारा सध्या एकही खात्रीलायक नेता नाही. प्रियांका गांधी निश्चितच या मागणीला हसण्यावारी नेतील, पण ही नेतृत्वहीनताच काँग्रेसच्या अधोगतीला कारणीभूत ठरली आहे, एवढे मात्र निश्चित !

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat