'एनडीटीव्ही"च्या प्रणव रॉय यांना सेबीचा दणका

14 Jun 2019 22:26:24



गुंतवणूक गोठवली, भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर दोन वर्षांची बंदी

 


मुंबई  इन्सायडर ट्रेडिंग प्रकरणी ठपका ठेवत 'एनडीटीव्ही'चे प्रवर्तक प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांच्यावर 'सेबी'ने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारला. सेबीने रॉय दाम्पत्यावर भांडवली बाजारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे व्यवहार करण्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्यांचा कंपनीतील हिस्सा आणि म्युच्यअल फंडातील गुंतवणूक गोठवली आहे.

 

भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. १४ ऑक्‍टोबर २००८ ते २२ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत सेबीने चौकशी केली, ज्यात एनडीटीव्ही आणि आयसीआयसीआय बॅंक यांच्या कॉर्पोरेट लोनचा करार झाल्याचे समोर आले. एकाच कंपनीने दोन भिन्न कंपन्यांशी तीन कर्जविषयक करार केल्याने भागधारकांची फसवणूक केल्याचा ठपका रॉय यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सेबीचे पूर्णवेळ संचालक एस.के. मोहंती यांनी सांगितले.

 

निर्बंध कालावधीत 'एनडीटीव्ही'त व्यवस्थापकीय पदावर राहू नये, असे आदेश सेबीने रॉय दाम्पत्याला दिले आहेत. 'एनडीटीव्ही'मध्ये प्रणव रॉय यांचा १५.९४ टक्के हिस्सा आहे. राधिका रॉय यांच्याकडे १६.३३ टक्के हिस्सा आहे. एनडीटीव्हीच्या प्रवर्तकांची कंपनी 'आरआरपीआर होल्डींग' आणि विश्‍वप्रधान कमर्शिअल या कंपनीसोबत कर्जासंदर्भात २००८ मध्ये करार झाला होता, मात्र हा करार करताना प्रवर्तकांनी अंधारात ठेवले, असा आरोप 'एनडीटीव्ही'च्या भागधारकांनी केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0