बदलत्या चित्राचे अंतरंग

    दिनांक  14-Jun-2019बिश्केकला जे काही घडत आहे आणि पुढे जपानला जे घडणार आहे, ते भारताच्या संयत व सकारात्मक परदेशनीतीचेच फलित आहे.

 

भारत, चीन आणि रशिया हे तीन देश. जगाच्या दृष्टीने या देशांचे मूल्यमापन कसे करायचे, हा सध्याचा मोठाच प्रश्न. स्वत:ची पत गमावणारा पाकिस्तान. चीनच्या भीतीने भारताकडे मित्र, मार्गदर्शक आणि साथीदार म्हणून आशेने पाहणारी श्रीलंकेसारखी लहान राष्ट्रे. स्वत:च्याच वजनाने वाकलेला एकेकाळचा ग्रेट असा ग्रेट ब्रिटन. महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा रशिया आणि त्यादृष्टीने वाटचाल करणारा आक्रमक चीन. उरलेल्या जगाने या सगळ्या घटनाक्रमाकडे कसे पाहायचे, हा मोठाच प्रश्न सध्या जगासमोर निर्माण झाला आहे. भारत हा त्यातला सर्वात मोठा अनाकलनीय प्रश्न आहे.

 

कारण, लहान देशात भारताने लहानमोठ्या गुंतवणुकीचे पर्याय किंवा त्यांना चांगल्या संस्था उभारून देण्याची हमी घेतली आहे. या संस्था त्या त्या देशांच्या राष्ट्रउभारणीच्या कामात साहाय्यभूत ठरतील. मात्र, मोठ्या राष्ट्रांमध्येही भारताबाबतचे आकर्षण काही वेगळ्या प्रकारेच निर्माण झाले आहे. योगासारखा अजेंडा घेऊन भारताने अन्य देशांच्या भावविश्वात निर्माण केलेले स्थान हे चीनच्या राजकारणी किंवा तिथल्या वित्तीय घडामोडी ताब्यात घेऊन प्रभाव निर्माण करण्याच्या र्ईर्ष्येपेक्षा फारच निराळे आहे. रशियाचेही काही असेच. तेलाबाबत पर्याय निवडून रशिया आज स्वत:च्या आर्थिक जोखडातून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, रशियाबाबतही कुठलाही देश विश्वासू पद्धतीने कुठल्याही प्रकारचे भाष्य करू शकत नाही.

 

व्यावसायिक हितसंबंध निर्माण करणे आणि ते जोपासणे हे जागतिक राजकारणाचे एक अंग. त्यामुळे डोळ्यांना न दिसणार्‍या कितीतरी घटना परदेशनीतीच्या बाबतीत सुरू असतात. एखाद्या रंगहीन, चवहीन व आकारहीन वायूच्या निर्मिती प्रक्रियेप्रमाणे या घडामोडी सुरूच असतात. एखाद्या प्रक्षिप्त प्रसंगी हे वायू ज्याप्रमाणे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे भारताची परदेशनीती काम करीत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बाबतीत जे झाले, ते अशाच प्रतिक्रियेचा भाग होता. पहिल्यांदाच पुलवामा हल्ल्यासारखी घटना संपूर्ण जगाने 'भारत-पाक दरम्यानचे काश्मीरचे भांडण' असे न पाहाता, 'जागतिक शांततेला असलेला इस्लामी दहशतवादाचा धोका आणि त्याच्याशी झगडत असलेला भारत' असे या चित्राचे अंतरंग होते. त्यामुळे या सगळ्याकडे पाहात असताना सार्‍या जगाचाच दृष्टिकोन पालटला.

 

मसूद अझहरच्या बाबतीतही जे झाले, तेही याच प्रक्रियेचा भाग. मसूदच्या बाबतीत चीनने कधीही भारतधार्जिणी भूमिका घेतलेली नाही. रशिया मात्र सदैव या विषयात भारतासोबत आहे. यावेळी रशियाने चीनला भरीस घातले व मसूदला 'जागतिक दहशतवादी' म्हणून जाहीर होण्याच्या प्रक्रियेला अडसर निर्माण केला नाही. अर्थात याला अनेक पदर आहे. संबंध आहेत आणि हितसंबंधही आहेत. सापशिडीच्या या खेळात मोदी ज्या प्रकारे संयमाने एक एक घर पुढे सरकत आहेत, ते पाहण्यासारखे आहे.

 

जागतिक शांतता, व्यापार-उदीम यांच्या वाढीसाठी होत असलेले प्रयत्न हे नवीन नाहीत. परस्परांच्या विरोधातले संशयाचे वातावरण, अविश्वास, विस्तारवाद अशा प्रकारच्या द्वंद्वातून बाहेर पडून, त्याचे चटके सहन करून सारे जग काही मूल्यांपर्यंत पोहोचले आहे, ती परस्पर सहकार्याची आहे. व्यापार-उदीम हा त्यातला महत्त्वाचा भाग. किर्गिझस्तानची राजधानी असलेल्या बिश्केकमध्ये जे सध्या सुरू आहे, त्यावर सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटींकडेच सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. हा तिहेरी नेतृत्वाचा उदय एका पार्श्वभूमीवर होत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कराचा वापर शस्त्राप्रमाणे करायला सुरुवात केली आहे. भारतीय उद्योगांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. ही एका प्रकारची अरेरावीच असून आज या तीन देशांनी त्याचा मुकाबला करायचे ठरविले असले तरी त्यात पुढे इराणसारख्या देशांची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

इराण आणि अमेरिकेच्या ताणलेल्या संबंधांत ट्रम्प यांनी इराणशी व्यापारी संबंध ठेवणार्‍या सगळ्यांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान यांचा यात समावेश होता. आता हे सगळेच देश स्वत:चे म्हणून पर्याय शोधू लागले आहेत. चाबहारचा उपयोग हा इथे होणार आहे. अमेरिकन मार्गाने जाण्यापेक्षा चाबहारमार्गे जाणे वणळदार असले तरी भरवशाचे असेल. व्यापार-उदीमाच्या अशा वाटा एकदा मळल्या गेल्या की, मग त्या बदलणे फार अवघड असते. या वाटा जागतिक इतिहासाचा मोठा हिस्सा राहिल्या आहेत. चीनचा व्यापारी मार्ग, बंदरे ताब्यात घेण्याचे धोरण, चाबहार बंदराविषयीचे जगाचे कुतूहल यातून काही नवेच घडणार, याचे संकेत आता स्पष्ट मिळू लागले आहेत. भारतीय परिप्रेक्ष्यात बोलायचे झाले तर कुठल्याही प्रकारच्या आततायी धोरणांना बळी न पडता भारताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केलेली वाटचाल कौतुकास्पद मानावी लागेल.

 

जपानमध्ये होत असलेल्या 'जी-२०' देशांच्या परिषदेत अजून काय घडेल, हा तितक्याच कुतूहलाचा विषय असेल. भारतीय उत्पादनांची करसवलत नाकारल्याने जो काही परिणाम होणे अपेक्षित होते, त्याचा तितकासा परिणाम अद्याप तरी जाणवलेला नाही. या तीन देशांच्या भूमिका आणि परदेशनीतींभोवतीच 'जी-२०' परिषद फिरत राहील, हे वेगळे सांगायला नको. मोदींनी बिश्केक येथे ज्या प्रकारे इमरान खानना वागवले, ते 'ठकासी व्हावे ठक' असेच होते. मोदी या दौर्‍यावर असताना 'इस्त्रो'चे शास्त्रज्ञ भारताचे अंतराळ स्थानक उभे करण्याचा कार्यक्रम जाहीर करीत होते, तर पाकिस्तानात नागरिकांवर लावलेले भरमसाट कर जाहीर होत होते. यातच सगळे आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat