ज्ञानमार्गावरील पथदर्शी

    दिनांक  14-Jun-2019२००५ पासून देशाच्या भावी पिढीला दिशा देण्याचे काम करणारी ‘स्पंदन फाऊंडेशन’ ही सामाजिक संस्था आपल्या काही विद्यार्थ्यांसह यशस्वीपणे चालवणार्‍या प्रमोद मोहिते यांचा हा जीवनप्रवास...

 

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते पिणारा वाघासारखा गुरगुरणारच,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनावर बालपणापासून बिंबवणारा एका अवलिया म्हणजे प्रमोद मोहिते. आजवर कित्येक अशिक्षित मुलांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधःकार दूर करणार्‍यास्पंदन फाऊंडेशन’ची स्थापना केल्यानंतर अनेक अशिक्षित, वंचित आणि शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाणार्‍या नव्या पिढीला घडवण्याचे काम मोहिते यांनी केले आहे. ‘स्पंदन फाऊंडेशन’तर्फे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी थेट मदतीसह व्याख्यानमाला, व्यवसाय मार्गदर्शन, एमपीएससी, युपीएससी प्रशिक्षण वर्ग, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तासिका आदी उपक्रम मुंबई आणि इतर महानगरांमध्ये राबवत आहे. ‘स्पंदन’रूपी वृक्षाच्या छायेत कित्येक मुलांनी शिक्षणाचा वसा घेत आयुष्यात यशस्वी वाटचाल केली आहे. याचे श्रेय जाते ते केवळ प्रमोद मोहिते आणि त्यांच्यासोबत कार्यरत असणार्‍या संस्थेतील ३० स्वयंसेवकांनाच... मात्र, त्याचा कुठेही गाजावाजा न करता आपले काम नि:स्वार्थ भावनेने सर्वजण आजवर करत आहेत.

 

स्पंदन फाऊंडेशनही संस्था देशाच्या भावी पिढीला दिशा देण्याचे काम आजवर करत आली आहे. २०१५ मध्ये प्रमोद मोहिते यांनी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला प्रमोद मोहिते यांनी अनाथाश्रमात जाऊन तेथील मुलांना भेटवस्तू आणि अभ्यासाचे साहित्य पुरवले. मात्र, शिक्षणापासून वंचित राहणार्‍या मुलांची संख्या आणि आकडेवारी पाहतास, या मदतकार्याची व्याप्ती वाढवण्याचे त्यांनी ठरवले. स्वतः शिक्षक असल्याने त्यांना या कामात त्यांच्या विद्यार्थ्यांची मोठी मदत मिळाली. ते नेहमी आपल्या विद्यार्थ्यांबद्दल गौरवाने सांगत असतात, “मी वयाच्या ४० व्या वर्षापासून समाजकार्यात उतरलो, पण माझे विद्यार्थी अवघ्या १८व्या वर्षापासूनच हे काम करत आहेत.” अनेकजण नव्या पिढीला संस्कार, दायित्व, मूल्यशिक्षण शिकवण्यासाठी कुणी उरलेले नाही, अशी दूषणे देऊन मोकळे होतात. मात्र, हे साफ खोटे आहे. ते ‘स्पंदन फाऊंडेशन’च्या कार्याचे स्वरूप समजून घेतल्यावर तुम्हाला समजेल.

 

दसरा, दिवाळी, रक्षाबंधन, ईद, नाताळ आदी सण ‘स्पंदन फाऊंडेशन’ गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत साजरे करते. मोहिते आणि त्यांचे विद्यार्थी अनाथ मुले आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत आपला आनंद द्विगुणित करतात. मोहिते यांचा जन्म २९ ऑगस्ट, १९७४ रोजी कोकणातील रत्नागिरी येथील संगमेश्वर तालुक्यातील एका गावात झाला. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण ‘न्यू इंग्लिश स्कूल, बुरंबी’ या शाळेत झाले. वडील भागूराम मोहिते मुंबईत नोकरी करत असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी वडिलांकडे येण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नोकरी करत असतानाच मुंबई विद्यापीठात पदवी आणि एम.ए, बी.एड हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासून त्यांनी शिकवणी वर्गांमध्ये शिकवणी सुरू केली. शिक्षकीपेशात सुरुवातीपासूनच असल्याने कुठलेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, असा त्यांचा कटाक्ष असतो. आपल्या विद्यार्थ्यांनाही ज्ञानार्जनाचा सल्ला ते देतात. हीच प्रेरणा आणि शिक्षणाचे बीज रोवणार्‍या महापुरुषांच्या विचारांवर कायम राहत त्यांनी ‘स्पंदन फाऊंडेशन’ संस्था स्थापन केली आणि त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. इतकेच नव्हे, तर ’स्पंदन’च्या माध्यमातून शिकून पुढे गेलेली मुलेही संस्थेत खारीचा वाटा उचलण्यासाठी तयार झाली आहेत.

 

आपल्या रोजच्या कामातून काही वेळ समाजाला देता यावा, यासाठी मोहिते आणि ‘स्पंदन’ची समिती भेट देण्याचे ठिकाण ठरवते. तेथील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप, अन्य प्रकारची मदत देऊ करते. याकामासाठी ज्यांना शक्य असेल त्या स्वयंसेवकांवर जबाबदारी सोपवली जाते. आपल्या सुट्टीचा दिवस लहानग्यांसोबत घालवल्यानंतर विद्यार्थ्यांचाही भार हलका होतो. सर्व स्वयंसेवक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी. आपल्या ‘पॉकेट मनी’तून दर महिन्याला १०० रुपये मदत संस्थेला करतात. ही मदत गरजूंसाठी लागणार्‍या वस्तूंपेक्षा तशी तोकडी असली तरी, या सर्वांची इच्छाशक्ती कधीच कमी पडत नाही. शिक्षणाच्या मार्गातील दुवा होण्याचे काम प्रत्येक स्वयंसेवक करत असतो. या सार्‍यामागे मोहिते यांची शिकवण आणि संस्कार दिसून येतात. याचे किंचीतही श्रेय त्यांचे लाडके मोहिते कधी घेत नाहीत. आपल्या मदतीच्या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत क्षणचित्रे काढण्यासाठी सर्व स्वयंसेवक इच्छुक असतात. मात्र, मोहिते मात्र हा सर्व नजारा लांबूनच पाहत उभे असतात. हे कार्य आणखी व्यापक रुपात कसे करता येईल याच विचारात...

 

स्पंदन फाऊंडेशन’ केवळ एक सुरुवात आहे, असे सांगताना मोहिते यांनी आपल्या पुढील कार्याविषयीच्या इच्छाही व्यक्त करून दाखवल्या आहेत. “अत्याधुनिक शिक्षण देणारी शाळा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे, ‘स्पंदन’कडे येणारा प्रत्येक विद्यार्थी कधीही हताश होऊन परत जाणार नाही, त्याचीच काळजी त्यांना लागून असते. मात्र, या सार्‍यासाठी तूर्त निधीची चणचण त्यांना भासत आहे,” अशी खंत ते व्यक्त करतात. या सार्‍या अडचणीतून मात करत हा शिक्षणाचा वसा पुढे चालू राहावा, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat