कायदे आणि समाजरिती

    दिनांक  14-Jun-2019   अमेरिकेच्या अल्बामा राज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र काकाने बलात्कार केला. गुन्ह्यासाठी त्याला सजाही झाली. मात्र, अल्बामामध्ये कायदा आहे की, कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करायचा नाही. त्यामुळे नाईलाजाने त्या मुलीला बाळाला जन्म द्यावा लागला. त्यानंतर अल्बामा राज्याच्या दुसर्‍या कायद्यानुसार, त्या नराधम बलात्कार्‍याने न्यायालयाकडे मागणी केली की, जेलमध्ये त्याला पालकत्व निभवायचे आहे. त्यामुळे बलात्कारातून झालेल्या बाळाचे पालकत्व मला द्यावे. हे कोणते कायदे? त्यानंतर अल्बामावर जगभरात स्त्रियांसाठी अत्यंत धोकादायक देश म्हणून सातत्याने ताशेरे ओढले जाऊ लागले.

 

मात्र, नुकताच अल्बामामध्ये एक कायदा पारित झाला आहे. त्यामुळे बालिका/महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळे आणि बर्‍यापैकी चांगले पाऊल उचलले गेले आहे. नव्या कायद्यानुसार, अल्बामामध्ये 13 वर्षांखालील बालक/बालिकांवर बलात्कार करणार्‍या नराधमांना नपुंसक होण्याचे औषध/इंजेक्शन देण्यात आले. गुन्हेगार जेव्हा केव्हा पॅरोलवर सुटतील, तेव्हा त्यांना हे इंजेक्शन देण्यात येईल. त्या औषध किंवा इंजेक्शनची मात्रा किती असेल, हे न्यायाधीश परिस्थितीनुसार ठरवतील. तसेच, हे औषध विकत आणण्याची जबाबदारी त्या गुन्हेगाराची असेल. अर्थात या औषधांचा परिणाम काही कालावधीपुरता असेल. तसेच गुन्हेगाराने जर हे औषध/इंजेक्शन घ्यायला नकार दिला, तर त्याला तुरुंगातच राहावे लागेल.

 

अर्थात, या कायद्याने वरवर पाहता बरे वाटेल की, ज्या नराधमाने वासनेच्या अमलाखाली बलात्कार केला, तो हव्यास, ती दुर्बुद्धी शारीरिकतेतून कमी होईल. मात्र, तरीही बलात्कार काय केवळ लैंगिक संबंधाचाच भाग असतो? शरीराच्या कोणत्याही अंगावर मनाविरुद्ध केलेले आक्रमण हा बलात्कार नसतो का? यावर या कायद्यामध्ये काही सांगितले आहे का? यावरून नेदरलॅण्डच्या कायद्याची आठवण येते. या देशात समोरच्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध विशिष्ट पद्धतीने ओठांचे चुंबन घेणे, हासुद्धा बलात्कार समजला जातो. असो, माणूस म्हणून बलात्कारित स्त्री किंवा पुरुषांच्या दु:खापुढे मर्यादशील शब्दांची चौकट तुटूनच जाते. बलात्कारित स्त्री किंवा पुरुष हा शब्द वापरला गेला, तेव्हा अनेकांच्या भुवया वक्र होऊ शकतात.

 

कारण, आपल्या जगभरच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या दृष्टीने पुरुष हा नेहमी आक्रमक असतो. त्यामुळे त्याला असाहाय्य वगैरे बनवून त्याच्यावर बलात्कार होणे, ही अपवादात्मक बाब असावी. मात्र तसे नव्हे, जगभराचा तपशील पाहिला तर महिला आणि पुरुषांवर होणार्‍या बलात्काराच्या घटनांची संख्या थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. त्यातही इस्लामिक देशांमध्ये पुरुषांवर, लहान मुलांवर बलात्कार होण्याची संख्या वाढत आहे. शरियानुसार बलात्कार्‍याचा शिरच्छेद करण्याची किंवा गोळी मारण्याची शिक्षा आहे. फारच चांगली शिक्षा. बलात्कार्‍याला कठोरातली कठोर सजा व्हायलाच हवी. त्यामुळे शरियाचा गोडवा गाताना काही जण नेहमीच सांगत असतात की पाहा, महिलांसाठी शरियाचा न्याय किती मोठा आहे. पण, मुस्लीम देशामध्ये बलात्काराच्या घटनेचा मागोवा घेतला तर जाणवते की, बलात्कार झाला तरी त्याविरुद्ध आवाज उठवायला महिला/बालिका पुढे यायला दहादा नाही, शंभरवेळा विचार करतात. कारण, एकतर बलात्कार होण्यासाठी एकटी स्त्री आणि एक किंवा अनेक पुरुष घटनास्थळी असतात.

 

इस्लाममध्ये संबंधित नात्यातील पुरुषाशिवाय एकटी महिला या पुरुषांना सापडेलच कशी? ही महिला अशी एकटी कुठे गेली होती? हा समाजाचा पहिला प्रश्न. शिवाय वडील आणि सख्खा भाऊ सोडून घरातल्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा कुणीही बलात्कार केला तर समाजमान्यतेप्रमाणे तिला त्या व्यक्तीशी विवाह करणे भाग आहे. तसे नसेल तर तिने मरून जावे. कारण, तिच्यावर बलात्कार झाला म्हणजे तिने घरातल्यांची इज्जत घालवली. त्यामुळे इस्लामिक देशांमध्ये बलात्कार करणार्‍यांना कायद्याने मारले जाते, तर बलात्कार पीडितेला गुपचूप ऑनर किलिंगच्या हक्काने मारून टाकले जाते. त्यामुळे अत्याचार झाला तरी पीडिता बलात्कार झाला म्हणून कबूलही करत नाही. जगभरात बलात्कारविरोधी कायदे आहेत. पण, दुर्दैव की, जगभरात या कायद्यांना बगल देणारे स्थानिक समाजरिती कायदेही आहेत. त्यांचे काय? पाश्चिमात्त्य देशांचेही कायदे याबाबत कुचकामीच आहेत. त्याचाही मागोवा घ्यायला हवा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat