पालक-विद्यार्थ्यांना घडविणारा अवलिया - संदीप मोरे

    दिनांक  13-Jun-2019   आज संदीप मोरे यांच्या क्लासेसच्या परिवारात २४ शिक्षक कार्यरत आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे. आजही मुले इंजिनिअर, डॉक्टर, वकील, उद्योजक, इंटिरिअर डिझाईनर म्हणून आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.

 

ए छोटू, कॅरम पावडर घेऊन ये,” “छोटू, जा चहा घेऊन ये...” शेखरअण्णा छोटूला अशी बारीक सारीक कामं सांगायचा. त्या सात-आठ वर्षाच्या छोटूला अशी कामं करण्यात ‘कमीपणा’ वाटायचा नाही. खरंतर ‘कमीपणा’ म्हणजे काय हे समजण्याचं त्याचं वयही नव्हतं. उलट लोकं ज्याला घाबरतात, तो शेखरअण्णा आपल्याशी एवढ्या प्रेमाने बोलतो याचंच त्या छोटूला अप्रूप वाटायचं. शेखरअण्णा म्हणजे गुन्हे जगतातलं त्यावेळचं मोठ्ठं नाव. आपण पण शेखरअण्णासारखंच मोठ्ठं व्हायचं, स्वत:चा दरारा निर्माण करायचा, हे त्या छोटूने त्या लहान वयातंच ठरवलं होतं. शेखरअण्णा हा त्याच्यासाठी एकप्रकारे आदर्श होता. हा छोटू मोठा झाला आणि त्याने ठरविल्याप्रमाणे आपल्या क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला. फरक इतकाच होता की, हा दबदबा ‘आदरयुक्त’ आणि ‘आदर्श’ असा दबदबा आहे. तळागाळातल्या मुलांच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारा म्हणून हा दबदबा आहे. हा दबदबा आहे, चेंबूरच्या ‘श्री क्लासेस’च्या संदीप मोरे यांचा.

 

सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील धामोवडे गावात रघुनाथ मादळे पैलवानाचा एक वेगळाच दरारा होता. महाराष्ट्रस्तरावर कुस्तीमध्ये त्यांचा दबदबा होता. असं म्हटलं जायचं की, तंबाखू मळेस्तोवर हिकडं रघू पैलवान समोरच्या पैलवानाला चारीमुंड्या चीत करी. कुस्ती मारली कीपैलवानावर बक्षिसांचा वर्षाव होई. कोणी बैल देई, तर कोणी बैलगाड्या. काहीजणांनी तर जमिनीपण दिल्या. अंतर्गत राजकारणामुळे रघू पैलवानाची ‘केसरीवारी’ दोन वेळा हुकली. कालांतराने रघू पैलवान बायको मुलांसह मुंबईला आले. एका कंपनीत माल वाहण्याचं काम करू लागले. चेंबूरमध्ये एका पत्र्याच्या घरात राहू लागले. शेजारी एक रिकामी पत्र्याची खोली होती. तिथे शेखरअण्णा आणि त्याचे मित्रमंडळ जमत असे. कॅरम खेळत. त्यावेळेस त्या परिसरात शेखरअण्णाचा दरारा होता. मात्र, शेजारी राहणार्‍या लोकांना त्यांनी कधीच त्रास दिला नाही. कळत नकळत संदीपवर शेखरअण्णाचा प्रभाव पडत होता. हा विभाग सोडून जाऊया, असंदेखील संदीपच्या बाबांनी ठरवलं. मात्र, परिस्थितीला घाबरुन पळून गेल्यासारखं त्यांना वाटत होतं. ते त्यांना अमान्य होतं. काही दिवसांनी शेखरअण्णाचा विरोधी टोळीकडून भरदिवसा खून करण्यात आला. संदीपसाठी हा प्रचंड आघात होता.

 

संदीप त्यावेळेस महानगरपालिकेच्या शाळेत शिकत होता. घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच असल्याने त्याने एक मित्र आणि मैत्रीण यांच्यासोबत एक व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय होता ताडी-माडीच्या दुकानासमोर चटपटीत खाद्यपदार्थ विकण्याचा. संदीपची मैत्रीण हे पदार्थ तयार करायची आणि संदीप व त्याचा मित्र हे चटपटीत खाद्यपदार्थ विकायचे. वय होतं अवघं दहा वर्षे. दुसर्‍या दिवशी त्या ताडीवाल्याने हाकलून दिल्याने हे दुसर्‍या दुकानासमोर जाऊन विकू लागले. कालांतराने हा प्रकार संदीपच्या वडिलांना कळल्यानंतर हा व्यवसाय संपुष्टात आला. यानंतर पतंग, मांज्या विकणे, दिवाळीत फटाके विकणे हे सर्व उद्योग संदीपने केले. पुढे माध्यमिक शाळेसाठी त्याला ‘स्वामी मुक्तानंद’मध्ये दाखल केले. मुक्तानंद शाळेतील सावजी गुरुजी, निळे बाई, तर महानगरपालिकेच्या शाळेतील कोळी गुरुजी, गुप्ते बाई यांसारख्या शिक्षकांमुळे त्याला शिक्षणाची गोडी लागली.

 

आचार्य महाविद्यालयामधून बारावी करत असताना त्याने एका कंपनीत ‘ऑफिसबॉय’ म्हणून अर्धवेळ नोकरी मिळवली. चार वर्षे तिथे त्याने नोकरी केली. बाहेर पडला त्यावेळेस तो मॅनेजरपदापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर तो टायटनमध्ये नोकरीस लागला. १४ हजार रुपये पगार होता. या पगारामुळे कुटुंब सुस्थित आलं. दरम्यान बी.कॉम करून त्याने ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग’मधून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यामुळे एका जाहिरात एजन्सीमध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. यावेळेस हे सारे आठ मित्र एके ठिकाणी अभ्यासासाठी जमत. त्यावेळेस एका गृहस्थांनी संदीपला विचारले की, “तुम्ही एकत्र येऊन शिकवणी वर्ग का सुरू करत नाही?” खरा प्रश्न होता अशा शिकवणी वर्गासाठीच्या जागेचा. त्यांनी जी खोली पाहिली, त्या घरमालकिणीने स्वत:जवळचे पैसे अनामत रक्कम म्हणून द्यायला मदत केली. त्यांचे पती जे घरमालक होते ते पूर्णत: व्यावहारिक होते. पतीचा व्यावहारिकपणा पण जपला जावा आणि या मुलांचे करिअर पण घडावे, या उदात्त हेतूने त्या माऊलीने या मुलांना आर्थिक मदत केली.

 

संदीप आणि त्याच्या मित्रांनी शिकवणी वर्ग सुरू केले. हुशार आणि प्रचंड मेहनतीने हा ‘श्री क्लासेस’अल्पावधीत नावारूपास आला. पाच मित्र स्वत:च्या व्यापात गुंतल्याने ते या व्यवसायातून बाजूला झाले. आता संदीप आणि त्याचे दोन मित्रच उरले. त्यांनी वेगवेगळ्या शाखा सुरू केल्या. काही कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. आजूबाजूच्या परिसरात ‘श्री क्लासेस’चा दबदबा वाढला. मात्र, दुर्दैवाचे फेरे आडवे आले. काही मतभेदामुळे ही भागीदारी संपुष्टात आली. एक शाखा सुरू करण्यासाठी संदीपने स्वत:चं राहतं घर गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं. संदीपच्या वडिलांना ते कळल्यावर त्यांनी संदीपची चांगलीच धुलाई केली होती. कर्जाचा डोंगर अंगावर घेऊन संदीपने पुन्हा एकट्याने क्लासेसची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. आज संदीप मोरे यांच्या क्लासेसच्या परिवारात २४ शिक्षक कार्यरत आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे. आजही मुले इंजिनिअर, डॉक्टर, वकील, उद्योजक, इंटिरिअर डिझाईनर म्हणून आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.

 

चेंबूरचा हा परिसर म्हणजे निम्नमध्यमवर्गीय विभाग. बहुतांश रिक्षावाले, भाजीवाले, घरकामगारांची मुले ‘श्री क्लासेस’मध्ये शिकवणीसाठी येतात. या पालकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असते. त्यामुळे मुलांची सकस वाढ, संस्कार असे शब्द म्हणजे त्यांच्यासाठी शब्दांच्या दागिन्यांसारखेच महागडे आहेत. या पालकांना शिक्षित करण्यासाठी ‘जागो पालक’ ही चळवळ मोरे यांंनी सुरू केली आहे. पालकांचे हक्क व अधिकार, आपल्या मुलांना पोषक आहार कसा द्यावा, अशा साध्या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी येऊन या पालकांना मार्गदर्शन करतात.

 

शिक्षण क्षेत्रातील असंघटित व्यावसायिकांना एकत्र करून मोरे यांनीमहाराष्ट्र एज्युप्रिन्युअर फोरम’ नावाचा मंच सुरू केला आहे. या अंतर्गत या व्यावसायिकांना विपणन, जाहिरात, प्रशासन आणि मनुष्यबळ धोरण याविषयांवर ते मार्गदर्शन करतात. ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोशिएशन’चे ते हार्बर विभागाचे अध्यक्ष आहेत. क्लास संचालकांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांना एकत्र आणण्याचं कार्य ते करत आहेत.

 

जंगलातील शाळा’ ही मोरे यांची भविष्यातील संकल्पना आहे. मुलांनी निसर्गाकडून शिकावे आणि निसर्गाला भरभरून द्यावे. या शाळेतून आदर्श विद्यार्थी घडावेत हा त्यांचा हेतू आहे. ‘समृद्ध भारत निर्मिती’ हे त्यांचं स्वप्न आहे. पाच एकर जागेत त्यांना हे स्वप्न साकारायचे असून सध्या ते जागेच्या शोधार्थ आहेत. जीवनाचे अनेक चढ-उतार पाहिलेल्या आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक समृद्ध भारत निर्माण करण्याचं स्वप्न पाहणार्‍या संदीप मोरेंसारख्या शिक्षणासाठी वाहून घेणार्‍या तरुणांची या देशाला गरज आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat