'बौद्धजन समिती' व्हाया 'बाबासाहेब'

    दिनांक  13-Jun-2019   


 


राहुल सवणे यांचे वडील नामदेव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक होते. तो परिसस्पर्श सवणे कुटुंबाला झाला. त्यामुळेच राहुल सवणे बाबासाहेबांच्या विचारांसाठी सर्वस्व अर्पून काम करत आहेत.


"माझे वडील नामदेव सवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणून काम करायचे. तसेच डॉ. आर. डी. भंडारे माझ्या वडिलांचे मावसभाऊ. बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी वडिलांनी आम्हाला सांगितल्या होत्या. त्यापैकी एक अशी की, मुंबईला सवर्ण आणि दलितांमध्ये दंगा पेटला होता. त्यावेळी वरळीचा किल्ला वडिलांनी लढवला होता. समाजातील मुलांना गोळा करून गोफणीने मारा करण्यात आला. या दंग्यात मुंबई होरपळू लागली. बाबासाहेबांनी भंडारेंना वरळीबद्दल विचारले. त्यावेळी वरळीचा किल्ला आपल्या पोरांनी लढवला, हे ऐकून बाबासाहेब क्षणभर शांत राहिले आणि म्हणाले, "हे चूक आहे. समाजाला पेटवून समता येणार नाही. हा दंगा थांबवायला हवा. हे कोणत्याही आणि त्यातही आपल्या समाजासाठी अजिबात चांगले नाही," असे बोलून बाबासाहेब ताडकन उठून निघून गेले." इंदापूरच्या माता रमाई वसतिगृहाचे संचालक राहुल सवणे सांगत होते. एखाद्या वसतिगृहाच्या संचालकाचे म्हणजे राहुल यांचे जगणे कसे असेल? मूळ सांगलीच्या आटपाटवाडी तालुक्याच्या गोदेवाडी गावातील सवणे कुटुंब. नामदेव सवणे आणि हिराबाई सवणे यांना एकूण सहा अपत्य. त्यापैकी एक राहुल.

 

नामदेव हे मुंबईमध्ये बाबासाहेबांचे अंगरक्षक म्हणून काम करायचे. मात्र, बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात समाजसेवा करण्याचे ठरवले. त्यामुळे कुटुंबाला घेऊन ते सोलापूरला आले. तिथे समाजाच्या वस्तीच्या बाबासाहेबांच्या जीवनावरचीभजन गाणारी भजन मंडळं सुरू केली. वस्तीतल्या मुलांना दांडपट्टा, लाठीकाठी, छडीपट्टा शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने ते इंदापूरला आले. मात्र, त्यांच्या मनात आले की, एका ठिकाणी राहून समाजाचे काम होणार नाही. बाबासाहेबांचे समतेचे विचार महाराष्ट्राच्या दुर्गम खेड्यात पोहोचायला हवे. त्यामुळे त्यांनी एका रात्री पत्नीला सांगितले की, "हिरे, माता रमाईने जशी बाबासाहेबांना साथ दिली, तशी तू मला दे. लेकरं अन् संसार सांभाळ. मी समाजात फिरीन, जागृती करीन." त्यानंतर हिरबाईंनी शेणकूट गोळा करून, गोवऱ्या बनवून, त्या विकण्याचे काम सुरू केले. जगणे सोपे नव्हते. मुले सकाळी अन्न मागायला जायची. कधी कधी तर कुटुंबाला पाण्यावरच निभवावे लागे. अशा परिस्थितीमुळे नववीनंतर राहुल यांना शाळा सोडावी लागली. अशावेळी शेजारच्या मातंग समाजाच्या स्त्रीने राहुल यांना सांगितले की, "काम कर बाबा, भंगार गोळा कर वा काही कर." इतकेच नाही, तर काम करण्यासाठी २५ रुपयेसुद्धा दिले. या २५ रुपयामध्ये राहुल यांनी भंगार व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांना लाज वाटे. कारण, त्यादरम्यान राहुल यांच्या वडिलांनी इंदापूर आणि बाजूच्या परिसरामध्ये 'समाजसेवक' म्हणून ख्याती मिळवली होती. इंदापूरमध्ये त्यांनी गरजू-गरीब मुलांसाठी माता रमाई वसतिगृहही काढले होते. 'या इतक्या मोठ्या माणसाचा मुलगा भंगार गोळा करतो,' असे कुणीही म्हणू नये याचाही विचार हिराबाई आणि राहुल करत. मात्र, या व्यवसायामध्ये हळूहळू जम बसत गेला.

 

या काळातच महाड ते पंढरपूरची 'समरसता यात्रा' राहुल यांच्या गावी आली. रा. स्व. संघाचे अतुल तेरखेरकर यांनी या यात्रेचे स्वागत राहुल यांना करायला सांगितले. डॉ. बाबासाहेबांच्या समतेचा समरस मार्ग सांगणारी यात्रा पाहून त्यांना वडिलांनी सांगितलेली बाबासाहेबांची गोष्ट आठवली की, समाज एकत्र प्रेमाने राहिला पाहिजे. राहुल यांनी या यात्रेचे जंगी स्वागत केले. त्याचवेळी दादा इदातेंशी त्यांचा परिचय झाला. या परिचयाने राहुल 'समरसता मंचा'शी जोडले गेले. हा काळ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. नामदेव यांची इच्छा होती की, आपल्या मुलाने लेखक व्हावे. ही इच्छा पूर्ण होण्याची परिस्थिती 'समरसता मंचा'च्या सान्निध्याने पूर्ण झाली. राहुल यांनी 'मोजमाप' हे आत्मचरित्र लिहिले. या आत्मचरित्राला बरीच प्रसिद्धी मिळाली. इतकी की विद्यावाचस्पती मधुकर मोकाशी यांनी या आत्मचरित्राला आपल्या समीक्षणात्मक पुस्तकात समाविष्ट केले, तर अनिता गाडे या विद्यार्थिनीने या आत्मचरित्रावर पीएच.डीही केली. दरम्यान, राहुल यांनाही वाटले की, शिक्षणाचा जागर घेऊन वस्तीपातळीवर गेले पाहिजे. जवळ जवळ १४ वर्ष ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विचार घेऊन महाराष्ट्रभर फिरले. आत्मचरित्रावर व्याख्याने केली. त्यातून थोडेफार उत्पन्न पदरी पडे. यावेळी त्यांच्या पत्नी संगीता यांनी मोलमजुरी करून घर सांभाळले. याच काळात रा. स्व. संघाचे पदाधिकारी, प्रचारक आवर्जून राहुल यांच्या घरी संपर्क करायचे. पुढे 'नर्मदा कुंभा'च्या बैठकीमध्ये राहुल यांचे सर्वथा पालकत्व 'प. महाराष्ट्र धर्मजागरण' संयोजक हेमंत हरहरे यांनी घेतले. त्यानंतर राहुल 'बौद्धजन समिती'चे काम करू लागले. १५ गावांमध्ये त्यांनी वस्त्यांमध्ये काम सुरू केले. पुढे संगीता यांना कर्करोगाचे निदान झाले. यावेळी हेमंत हरहरे आणि माधवराव देशपांडे यांनी राहुल यांना मोलाची साथ दिली. रा. स्व. संघाच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी उपचारासाठी गोळा करण्यात आला. मात्र, संगीता यांचे निधन झाले. ही आठवण सांगताना राहुल म्हणतात, "यावेळी जातपात, उच्चनीच्चता यापेक्षा 'समरस बंधू' म्हणून सगळे माझ्यासोबत होते," हे सांगताना त्यांचा स्वर हळवा होतो. समाजातील मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगती करावी, शिकावे आणि आपला विकास करावा, यासाठी राहुल काम करू लागले. 'बौद्धजन समिती'चे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून करायचे, हीच राहुल यांच्या जगण्याची प्रेरणा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat