जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात CRPF चे पाच जवान शहीद

    दिनांक  12-Jun-2019जम्मू : जम्मू-काश्मीर येथे अनंतनाग बस स्थानकानजीक दहशतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत. अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत सुरू असलेल्या या चकमकीत एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

 

दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीनुसार, या भागात उशीरापर्यंत गोळीबार सुरू होता. सीआरपीएफ जवानांच्या तुकडीला बुधवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी अचानक लक्ष्य केले. या हल्ल्यात ६ जवान जखमी झाले. त्यातील पाच जणांना उपचारांदरम्यान वीरमरण आले. दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहीती उघड झाली आहे. पोलिस आणि सीआरपीएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत यातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आहे.

 

दरम्‍यान, या पूर्वी जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात एक जवान शहीद झाला होता. तर एक जवान जखमी झाला होता. पोलीसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त केला असून भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat