खुशखबर : ५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

    दिनांक  12-Jun-2019


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर अल्पसंख्याक विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी योजना आखली जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील ५ कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुढील ५ वर्षे ३ प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. या शिष्यवृत्त्यांमध्ये ५० टक्के विद्यार्थिनींना सामावून घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

"दहावीपर्यंत, दहावीनंतर आणि व्यावसायिक-तांत्रिक शिक्षणासाठी अशा ३ शिष्यवृत्त्यांचा लाभ अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळणार आहे. रोजगार मिळवण्यासाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची गरज असते. त्यामुळे, ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे त्यांना शिक्षणाची संधी मिळू शकेल. तसेच, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींना नामांकित शिक्षण संस्थांमधून हे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास मुलींसाठी १० लाख बेग हजरत महल बालिका शिष्यवृत्त्याही दिल्या जाणार आहेत." असे नक्वी यांनी सांगितले.

 

"तसेच याअंतर्गत मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, पारसी या अल्पसंख्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण-तरुणीसाठी केंद्र-राज्यातील प्रशासकीय सेवा, बँकिंग क्षेत्र, रेल्वे आदी क्षेत्रांत रोजगार मिळावा यासाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे." असेही त्यांनी सांगितले. "पुढील महिन्यापासून या योजनेला सुरुवात केली जाणार आहे. मदरशांमध्ये हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संगणकीय शिक्षण मिळावे म्हणून तेथील शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून हा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल." अशी माहिती मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat