रेशन धान्य दुकानांचे कामकाज होणार ऑनलाईन

12 Jun 2019 21:32:46




मुंबई : अन्न व नागरी पुरवठा विभागात होणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाचा वापरामुळे येथील भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. मात्र पुढील काळातही या विभागात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून संपूर्ण विभाग तसेच सर्व रेशन धान्य दुकानाचे कामकाज ऑनलाईन जोडण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिली. यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांची जलदगतीने अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी आज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

 

मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे नुकतीच अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन या खात्याची अतिरिक्त जबादारी देण्यात आली आहे. या विभागातील कामकाजाची माहिती घेण्यासाठी मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योजना व कामांचे सादरीकरण केले. अधिकाऱ्यांना सूचना देताना मंत्री रावल म्हणाले, रेशन व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याच्या तसेच आधार क्रमांकाशी रेशनकार्ड जोडण्याच्या प्रक्रीयेत कोणीही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अन्नधान्याची गुणवत्ता राखण्याबरोबरच लाभार्थ्यांना वेळेत रेशन मिळेल यासाठी आखलेल्या कॅलेंडरची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

 

अन्न व औषध प्रशासन विभागानेही यावेळी सादरीकरण केले. हा विभाग प्रत्येक व्यक्तीशी संबंधीत असल्याने या विभागाची व्याप्ती वाढणे गरजेचे आहे. या विभागाची कार्यालये ही जिल्हा तसेच तालुका स्तरावर सुरु करण्यासाठी तसेच त्यानुषंगाने कर्मचारीवर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विभागाने यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना यावेळी रावल यांनी दिल्या. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव संजय मुखर्जी, हाफकीन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनुपकुमार यादव, अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

दुर्गम भागातील रेशन दुकानेही ऑनलाईन जोडणार!

राज्यात दुर्गम भागातील काही गावांमध्ये रेशन व्यवस्थेचे कामकाज ऑफलाईन चालते अशी माहिती यावेळी मंत्र्यांना देण्यात आली. यावर या दुर्गम गावांमधील रेशन दुकाने ऑनलाईन जोडण्यासाठी इंटरनेट डाटा पुरवठादार कंपन्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात यावी, अशी महत्त्वाची सूचनाही यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0