गुजरातला वायू चक्रीवादळाचा धोका ; हाय अलर्ट जारी

    दिनांक  12-Jun-2019मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हे चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून अवघ्या ६३० किमी दूर असले तरी मुंबईला धोका नाही असेही सांगितले आहे. यासंदर्भात गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी केले.

 

मच्छिमारांनी दोन दिवस खोल समुद्रात न जाण्याचा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित स्थानी हलवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

 

एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी १० टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat