सरकार २ लाख टन डाळ बाजारात विकणार

    दिनांक  12-Jun-2019
 
 
डाळींचे भाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्राचे पाऊल


नवी दिल्ली : कांद्यानंतर आता डाळींच्या भाववाढीसंदर्भात सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. डाळींचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी बाजारात २ लाख टन डाळ खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडे असलेल्या साठ्यातून ही विक्री केली जाणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, सरकारकडे ३९ लाख टन डाळीचा साठा शिल्लक आहे.

 

केंद्र सरकारने डाळ आयात करण्याची मर्यादा ४ लाखांवर केली आहे. यंदा सरकारने १.७५ लाख टन डाळ आयात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान साठेबाजांवरील कारवाईही कडक करण्यात आली आहे. कृषि उत्पन्न, डाळी आणि इतर वस्तूंची उपलब्धता जाणून घेण्यासाठी ११ जून रोजी केंद्रीय कृषि सचिव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी २ लाख टन आयात करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

 

सध्या बाजारपेठेत तूरडाळीच्या किंमती १०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत तुरीचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटले आहे. उडीद डाळीच्या उत्पादनातही १५-२० टक्क्यांनी घट झाली आहे. नव्याने उत्पादन घेण्यात आलेल्या डाळींना बाजारात येण्यासाठी आणखी महिनाभराचा अवकाश आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. २०१५ मध्ये डाळींचे दर दोनशे रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, सरकारच्या उपाययोजनांमुळे डाळींच्या भावांवर नियंत्रण राहण्याची शक्यता तूर्त व्यक्त केली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat