रे माणसा, जागा हो!

    दिनांक  12-Jun-2019


मानव शरीर हे सर्व प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ! बुद्धीचे अपार वैभव तुला माझ्याकडून मिळालेले वरदान आहे. या बुद्धिबळाच्या साहाय्याने आणि आत्मबळाने तुला जी जीवनशक्ती मिळाली आहे, तिच्या साहाय्याने तू खूप पुरुषार्थ कर. एका कवीच्या शब्दातील ही प्रेरणा तुला मोलाची ठरेल - ‘झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा!’ तुझी जीवनयात्रा यशस्वी करण्याकरिता तुला ‘शरीर’रूपी रथ हे सर्वात प्रबळ साधन मिळाले आहे. या रथावर तू स्वार हो.उद्यानं ते पुरुष नावयानं जीवातुं ते

 

दक्षतातिं कृणोमि।

आ हि रोहेमममृतं सुखं रथमथ

जिर्विर्विदथमा वदासि॥ अथर्ववेद-८.१.६)

 

अन्वयार्थ

(पुरुष) अरे माणसा, जीवात्म्या! (ते उद् यानम्) तुझी उन्नती होत राहो, (न अवयानम्) अधोगती कदापी होऊ नये. (ते जीवातुम्) तुझ्या जीवनाला (दक्षितातिम्)(मी) बलसंपन्न, शक्तियुक्त (कृणोमि) करतो. (इमम्) या (अमृतम्) अमृताने परिपूर्ण (सुखम्) सुखकारक (रथम्) रथावर तू (हि) निश्चितच (आरोह) चढ, आरुढ हो! (अथ) आणि नंतर उतरत्या वयात (जिर्वि:) जीर्ण होऊन वृद्धावस्थेत ही (विदथम्) ज्ञानाला(आवदासि) सांगत (प्रचार करीत) राहा!

 

विवेचन

प्रेरक विचार हे समग्र क्रांतीचे अधिष्ठान असतात. दिव्य विचार घेऊनच तर मानव प्रतिकूल परिस्थितीला उत्साहाने सामोरे जात यशाचे शिखर गाठतो. भगवंताची अमृतवाणी वेद हे अगदी प्रारंभापासूनच मानवाला प्रेरणात्मक विचारांची शक्ती प्रदान करतात. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि एकूणच जगाच्या सर्वांगीण कल्याणासाठी वेदांतील प्रत्येक मंत्र दिशादर्शक तर आहेतच, पण जीवनाच्या विविध प्रसंगी ते उद्बोधन करणारेही आहेत. अल्पबुद्धी व अल्पबलयुक्त माणूस आपल्या जीवनप्रवासात निराश, हताश आणि कर्महीन बनू शकतो. यामुळे एखादवेळी तो आपल्या कर्तव्यांपासून पराङ्मुखही होऊ शकेल, याची जाणीव त्या महान सर्वज्ञ परमेश्वराला असतेच! म्हणूनच आपल्या संजीवक विचारांची वृष्टी तो आपल्या प्रजासम समाजाच्या मनावर करतो.

 

वरील मंत्राशय सांसारिक माया-मोहाच्या किंवा वैयक्तिक व कौटुंबिक प्रश्नांच्या चिंतेमुळे खिन्न, दु:खी आणि निराश झालेल्या माणसाला उभारी देणारा आहे. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे न झाल्यास किंवा एखाद्या कार्यात अपयश आल्यास माणूस खचून जातो. त्याला जगावेसे वाटत नाही. अशा प्रसंगी धैर्यबांधणी करणार्‍या उद्बोधक व उत्साहवर्धक विचारांची फारच गरज भासते. अथर्ववेदाचा हा मंत्र असाच संजीवनी देणारा ठरतो. मातृ-पितृस्वरूप वेद आपल्या सुपुत्रांना म्हणतो- ‘हे प्रिय अमृतपुत्रा, ऊठ आणि जागा हो! तुझी नेहमीच प्रगती होत राहो. अधोगतीला कधीही प्राप्त होऊ नकोस. जीवन म्हणजे ऊन-सावल्यांचा खेळ आहे. रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र हा क्रम जसा निश्चित आहे तसेच सुख-दु:खाचे आहे. चाकाच्या धावेप्रमाणे ते खाली-वर होतच असतात. प्रगती साधण्याकरिताच तुझा जन्म झाला आहे.’

 

मानव शरीर हे सर्व प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ! बुद्धीचे अपार वैभव तुला माझ्याकडून मिळालेले वरदान आहे. या बुद्धिबळाच्या साहाय्याने आणि आत्मबळाने तुला जी जीवनशक्ती मिळाली आहे, तिच्या साहाय्याने तू खूप पुरुषार्थ कर. एका कवीच्या शब्दातील ही प्रेरणा तुला मोलाची ठरेल - ‘झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा!’ तुझी जीवनयात्रा यशस्वी करण्याकरिता तुला ‘शरीर’रूपी रथ हे सर्वात प्रबळ साधन मिळाले आहे. या रथावर तू स्वार हो. उपनिषदांनी कथन केल्याप्रमाणे या रथाला पंच-ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये हे घोडे जुंपलेले आहेत. बुद्धिरूपी सशक्त सारथी दिला आहे आणि त्याच्याच हातात मनरूपी लगाम दिला आहे आणि आत बसलेला तू जीवात्मा मात्र खिन्न आणि निराश होशील, तर मग तुझा काय उपयोग?

 

हा रथ मजबूत आहे, शक्तिशाली आहे. यात मोठी ताकद आहे. अशा रथावर तू मोठ्या आनंदाने आरूढ हो. यावर चढावयास मागे पुढे पाहू नकोस. कारण, तू महान आहेस. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव ठेव की सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेस. ‘लाथ मारीन, तिथे पाणी काढीन!’ या उमेदीने जग. थोडेसे संकट आले, परिस्थिती प्रतिकूल झाली म्हणून तू काय निराश होऊ नकोस. स्वत:ला संपवू नकोस. आत्महत्या करण्याच्या भानगडीत तर कदापी पडू नकोस. आत्मघातासारखे दुसरे पाप नाही. कारण, याकरिता वेदांमध्ये प्रबळ प्रमाण आहे -

 

ताँस्ते प्रेत्यापि गच्छन्ति

ये के च आत्महनो जना:।

 

जे आत्मघात करणारे असतात, ते पुन्हा-पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतात. दुर्गतीला प्राप्त होतात. एका कवीचे उत्साही वचन स्मरणात ठेव...!

 

तू जो चाहे पर्वत-पहाडों को फोड दे...

तू जो चाहे नदियों के मुख भी मोड दे

तू जो चाहे मिट्टी से अमृत निचोड दे...

तू जो चाहे धरती को अंबर से जोड दे..!

अमर तेरे प्राण, मिला तुझको वरदान

तेरी आत्मा में स्वयं भगवान् है रे

मनुष्य तू बडा महान है... भूल मत ...!

धरती की शान तू है मनु की सन्तान..

तेरी मुट्ठियों बन्द तुफान है रे..

मनुष्य तू बडा महान है..!

- डॉ. नयनकुमार आचार्य

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat