'हरित नाशिक'साठी स्वागतार्ह श्रमदान

    दिनांक  12-Jun-2019   


 


यंदाच्या मोसमात नाशिक जिल्ह्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या आणि यातूनच नाशिक शहराचे पर्यावरण अबाधित राहण्यासाठी आवश्यक असणारी वृक्षराजींची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. नाशिक शहर व परिसरात असणारे डोंगर हे उजाड पडलेले आहेत. येथे केवळ पावसाळ्यातच हिरवाई फुलत असते. त्यामुळे या डोंगरांचा वापर भूजल पातळीत वृद्धी करण्यासाठी करता येऊ शकतो, असा विचार नाशिककर महिलांच्या मनात आला आणि त्यांनी 'हरित नाशिक' साकारण्याचा चंगच बांधला. त्यातूनच अंबड येथील औद्योगिक क्षेत्रात असणार्‍या डोंगरावर 'कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्था' आणि 'इनरव्हील क्लब' यांच्या माध्यमातून नुकताच वृक्षारोपण आणि 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा' हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे या डोंगरावर पुढील काळात हिरवेगार वृक्षराजींचे साम्राज्य पाहावयास मिळणार आहे. तसेच, येथे तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये लाखो लिटर पाणी अडण्यास आणि तेवढेच पाणी जमिनीत जिरण्यास मदत होईल. नाशिक शहराच्या तुलनेत बरेचदा अंबड परिसरात जास्त पाऊस पडत असतो. या परिसरातील डोंगर आणि पांडवलेणीसारखा समृद्ध परिसर हे कायमच वरुणराजाला साद घालत असतात. त्यामुळे या परिसरात साकारण्यात आलेल्या 'वृक्षारोपण' आणि 'पाणी अडवा, पाणी जिरवा,' मोहिमेचे फलित प्राप्त होण्याची आस बाळगण्यास निश्चितच हरकत नाही. यंदाच्या उन्हाळ्यात नाशिककरांना वाढलेला उष्मा आणि पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागला. त्यातूनच 'हरित नाशिक' या संकल्पनेचे भविष्यदेखील धोक्यात आहे की काय, अशी शंका सतावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नाशिककरचिंतातूर झाल्याचे दिसून आले. तसेच, नाशिक महानगरपालिकेनेदेखील 'देवराई वन'सारखी संकल्पना राबवत हरितकार्याचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोणे एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरही प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहराची पुन्हा तीच ओळख प्रस्थापित व्हावी आणि पूर्वीच्या 'गुलशनाबाद' या नावाप्रमाणे नाशिकही 'गुलशन' व्हावे, यासाठीच हा प्रयत्न केला गेला आहे, असे समजून प्रत्येक नाशिककराने या हरितकार्यात नक्की आपला सहभाग नोंदवायला हवा.

 

चॉकलेटसारखे गोड काम

 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रावळगाव हे चॉकलेटसाठी जगप्रसिद्ध असणारे गाव. रावळगावच्या चॉकलेटचा गोडवा हा अगदी सातासमुद्रापार पोहोचलेला. मुळात मालेगाव तालुका इतर विविध कारणांप्रमाणे तेथील उष्णता आणि रावळगावमधील चॉकलेट यामुळेदेखील ओळखला जातो. मालेगाव तालुक्यात असणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य हा तर कायमच बातम्यांचा विषय राहिला आहे. मात्र, केवळ लोकप्रतिनिधींच्या किंवा शासनाच्या विविध विभागांच्या कृपेवर अवलंबून न राहता, रावळगाव येथील नागरिकांनी श्रमदानातून चॉकलेटसारखे गोड काम करत आपल्या कार्यातून संघटित प्रयत्नांचा आदर्श घालून दिला आहे. रावळगावची पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र झाली आहे. गावाची संपूर्ण मदार ही गावाला पाणीपुरवठा करणार्‍या 'डंकीण' तलावावर. याच तलावातील गाळ काढण्यासाठी व स्वच्छतेसाठी सप्ताह समितीच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेत श्रमदानातून या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. हा गाळ उपसा करताना याच तलावातून जिवंत पाण्याचे अनेक स्रोत बाहेर आले. या प्राप्त जिवंत स्रोतांच्या माध्यमातूनदेखील आता रावळगावकरांना पाणी उपलब्ध होणार आहे. गावातील युवक म्हणजे 'कार्याशिवाय जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालविणारा इसम' असा गैरसमज काहीजण करुन घेतात. मात्र, रावळगावमध्ये हे काम युवकांच्या सहभागातूनच पूर्णत्वास गेले आहे. गावातील युवक आणि ज्येष्ठांनी एकत्रित येत हे काम केले आहे. त्यामुळे अख्खा गावच जेव्हा एखाद्या समस्येसाठी एकजूट होतो, तेव्हा मूळ समस्या तर सुटतेच. मात्र, त्यातून समस्या कायमस्वरूपी निकाली काढता येईल, असा नवीन मार्गदेखील प्रशस्त होतो, हेच या घटनेवरून दिसून येते. जलस्रोतात साचणारा गाळ हा पात्राची खोली कमी करण्यास कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे आगामी काळात खोली वाढवली जावी, अशी मागणी आता रावळगावकर करत आहेत. नव्याने सापडलेले जलस्रोत आणि काढण्यात आलेला गाळ हा पाऊस पडेपर्यंत रावळगावची तहान भागविण्यात नक्कीच साहाय्यभूत ठरेल, यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat