धनंजय मुंडेंनी सरकारी जमीन हडपली, गुन्हा दाखल करा - उच्च न्यायालय

    दिनांक  11-Jun-2019मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी मंगळवारी सुनावणी करताना हा निर्णय दिला.

 

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही सरकारी जमीन असल्याने ती ट्रस्ट किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असे फड यांनी याचिकेत म्हटले होते. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

 

दरम्यान, आपण कोणत्याही संस्थानाची किंवा शासनाची फसवणूक करून ही जमीन खरेदी केली नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. तसेच न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुंडे म्हणाले.

 

काय आहे प्रकरण?

 

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस गावातील सरकारी जमीन बेलखंडी देवस्थानाला इनाम म्हणून देण्यात आली होती. हीच जमीन धनंजय मुंडे यांनी १९९१मध्ये जगमित्र शुगर फॅक्टरीसाठी २४ एकर जमीन खरेदी केली होती. इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही मात्र येथे दबाव आणून खरेदी व्यवहार केल्याचा आरोप याचिकाकर्ता राजाभाऊ फड यांनी केला आहे. याशिवाय ही जमीन कृषी असताना देखील अकृषिक करून घेतल्याचा आरोप फड यांनी केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat