युवराज तुला माफी नाही...

    दिनांक  11-Jun-2019    

क्रिकेटच्या मैदानावर तर त्यानं आमच्या पीढीला जिंकणं शिकवलंच पण जीवनाच्या रंगमंचावर नियतीशीही दोन हात करून जिंकता येऊ शकतं हे युवीनं आमच्या मनावर बिंबवलं. कॅन्सरचं निदान झाल्यावर कुणीही हाय खाल्ली असती पण युवी जिद्दीनं झुंजला इतकचं नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतला.

 

क्रिकेट चहात्यांच्या हृदयावर 'युवराज' म्हणून गेली १७ वर्षे आपला हक्क सांगणारा युवराज अखेर राज्यभिषेक न होताच पायउतार झाला. माझ्या सारख्या असंख्य क्रिकेट चाहत्यांनी हे युवीचं युवराजत्व आपल्या रक्तात भिनवलं होतं. आज त्या रक्ताशी युवीनं नात तोडलंय म्हणून युवी तुला माफी नाही. तुम्ही सगळेजण अचंबित असाल की युवराजनं नेमका अस काय गुन्हा केलाय की त्याला माफी देता येणार नाही. तर युवीनं एक नव्हे असंख्य गुन्हे केलेत ज्याची त्याला माफी देता येणार नाही.

 

युवीचा सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे त्यानं आमच्या पीढीला जगणं शिकवलं. आम्ही आताशी कुठं सावरत होतो तर त्याने क्रिकेटला अलविदा करुन आमच्या विश्वासाला तडा दिलाय. मी हे यासाठी म्हणतोय की दबंग पालकांचा जाच सहन करून आपल्यातील गुणवत्ता कशी बहरवता येते याचे युवी हे मुर्तीमंत उदाहरण होते. आजही पालक आपल्या मुलांवर आपली स्वप्न लादत असतात. युवीही त्याला अपवाद नव्हता. माजी कसोटीपटू योगराज हे युवीचे वडील. युवराज क्रिकेटर व्हावा यासाठी त्यांनी दंगल सिनेमात दाखवलेल्या अमीर खानपेक्षाही टोकाची भुमिका घेतली होती. मुलाचं निरागस बालपण युवीच्या वाट्याला त्यामुळे कधी आलेच नाही. बापाच्या कर्तृत्वाचा मुलाला जितका म्हणून फटका बसू शकतो तितका तो युवीला बसला. तरीही त्याने स्वतःला निराशेच्या गर्तेत कधी ढकलले नाही. वडीलांच्या जाचक महत्वाकांक्षेमुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या युवकांसाठी युवराज हा दीपस्तंभ ठरावा. वडीलांच्या बेताल वागण्यामुळे क्रिकेटच्या महासागरातील आपले जहाज कधी भरकटणार नाही याची युवीनं नेहमीच काळजी घेतली. युवीचा दुसरा गुन्हा म्हणजे अपयशावर जिद्दीनं मात करता येते हे त्यानं आमच्या पीढीला शिकवले. आम्ही त्याला त्यासाठी देवत्व दिले आणि आज हाच आमचा देव चारदोन अपयशानं भरल्या ताटावरून उठून निवृत्तीची घोषणा करतो हे आमच्यातील आत्मविश्वाला तडा देणारे होते. युवीनं स्वतः काल सांगितले यशापेक्षा मला अधिकदा अपयशाला सामोरे जावे लागले पण प्रत्येकवेळी पडल्यावर मैदानावरची धुळ झटकून नव्या आव्हानाला सामोरे जाण्याची एक नशा होती. ही नशा आता युवीनं आमच्याकडून हिरावून घेतलीय.

 

आमच्या पीढीला जिगरबाज बनवण्याचं काम युवीनं केलं. चंद्रावर अनेक अंतराळवीरांनी पाऊल ठेवलीत. पण आपल्याला लक्षात राहतो तो चंद्रावर पहीलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग. अगदी तसेच टी २० क्रिकेटमध्ये आणि तेही टी २० च्या वर्ल्डकपमध्ये युवीनं इंग्ल्डंच्या ख्रिस ब्रॉर्डला ठोकलेले ६ बॉलमधील ६ सिक्सर आम्ही अजूनही विसरलेलो नाही. त्या प्रत्येक सिक्सरच्या उंचीनं आमच्या पीढीतील जिगरबाजपणा उंचावत गेला होता. २००७चा टी२० वर्ल्डकप आणि २०११ चा क्रिकेट वर्ल्डकप विजेतेपदात युवीचा जिगरबाजपणा आम्ही कसे विसरु शकतो. २०११ च्या वर्ल्डकमध्ये ३६२ रन्स १५ विकेट, ४ मॅन ऑफ द मॅच आणि वर्ल्डकपचा मॅन ऑफ द वर्ल्डकपकिताब. कोणत्याही खेळाडूला स्वप्नवत वाटावी अशीच ही कामगिरी. पण हे यश साजरं करण्याची संधीच नियतीनं त्याला दिली नाही. विशेष म्हणजे अंगी कॅन्सरचा आजार घेऊन त्यानं ही कामगिरी बजावली होती.

 

क्रिकेटच्या मैदानावर तर त्यानं आमच्या पीढीला जिंकणं शिकवलंच पण जीवनाच्या रंगमंचावर नियतीशीही दोन हात करून जिंकता येऊ शकतं हे युवीनं आमच्या मनावर बिंबवलं. कॅन्सरचं निदान झाल्यावर कुणीही हाय खाल्ली असती पण युवी जिद्दीनं झुंजला इतकचं नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतला. नियतीशी तो लढाई जिंकला खरं पण शरीराची झालेली झीज आणि त्यानंतर येणारं मानसिक दडपण याच्याशी त्याला झुंजावे लागले. आम्हा मीडियावाल्यांनीही त्याला त्याच्या पुर्वपराक्रमाची आठवण न ठेवता अपयशानंतर फैलावर घेतलं. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा संघ मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स ठरला पण त्यातील युवराजचं योगदान होतं फक्त ४ मॅच आणि ९८ रन्स त्यात एक अर्ध शतक. असा युवराज पाहण्याची आम्हाला कधी सवयचं नव्हती. युवराजलाही त्याची जाणीव झाली होती. या जाणीवेतूनचं त्यानं क्रिकेटला अलविदा म्हटलं. ना गौरव मॅचचा आग्रह ना सेंड ऑफ”. खरं तर युवीचं भारतीय क्रिकेटमधिल योगदान पाहता त्याच्या चाहत्यांना त्याला प्रत्यक्ष मैदानावर अलविदा करण्याची एक संधी मिळालीच पाहीजे. पण हल्ली क्रिकेट म्हणे खुप व्यावसायिक झालंय. अगदी ऑस्ट्रेलियापेक्षाही. ऑस्ट्रेलियानंही त्यांना १९८७ चा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या डेव्हिड बूनला सेंड ऑफ ची संधी न देताच अलविदा करायला भाग पाडले होते. युवीनं बीसीसीआयला ती संधीही दिली नाही. युवी असाच बेभानपणे जगला आणि यापुढेही जगेल पण तो बेभानपणा आमच्या पीढीत आम्ही आता आणणार कुठून. युवी म्हणूनच तुझ्याशिवाय क्रिकटच्या मैदानाचा विचार करणं आमच्या पीढीला जड जाणार आहे आणि याला जबाबदार तुच आहेस. त्यामुळे तुला माफी नाही. तुला क्रिकेटमधील राजाचं पद नाही कधी बहाल केले गेले पण त्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. तू आमचा युवराज होतास. आहेस आणि यापुढेही राहशील. आमच्या मनातील तुझी ही जागा आता कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat