जगभरातल्या या कायद्यांचे काय?

    दिनांक  11-Jun-2019   
जगाच्या पाठीवर महिलांना काही देशांमध्ये काय स्थान आहे, याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. इस्रायल तसे आपले मित्रराष्ट्र, पण या देशामध्ये महिलांना तिच्या पतीपासून कितीही त्रास असला आणि त्याच्यापासून दूर जाणे तिच्या जगण्यासाठी महत्त्वाचे असले तरी ‘तिला हवा’ आणि ‘तिला वाटते’ म्हणून घटस्फोट घेता येत नाही. तिच्या पतीला तिला घटस्फोट द्यावासा वाटला, तरच घटस्फोट मिळतो. असे का? याला उत्तर नाही. पण, वैवाहिक जीवनामध्ये पतीच्या पसंतीला आणि मताला सर्वाधिकार मिळावेत, हीच भूमिका यामागे असणार? अर्थात, याचा विरोधाभास म्हणजे तिहेरी तलाक जगाच्या पाठीवर आहेच. तीनवेळा ‘तलाक तलाक’ म्हणून पत्नीला तिच्या संमतीशिवाय असहायपणे सोडून देणारा हा कायदा आजही धर्मांधतेचा आसूड घेऊन मुस्लीम महिलांच्या मानेवर वेताळ बनून राहिला आहेच.

 

विवाहाच्या संदर्भातले अनेक कायदे, अनेक नियम जगभरात आहेत. अर्थातच, ते सगळे नियम महिलांसाठीच आहेत, हे ओघाने आलेच. जगभरात अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह करू नये, यासाठी विशेष प्रकल्प राबवले जातात. मात्र, सुदानमध्ये मुलींसाठी लग्नाचे वय वर्षे चक्क १० ठरवले गेले आहे. अगदी कायद्याने आणि रूढीसंमत. सुदान काय जगाच्या बाहेरचा देश आहे? सुदानमधल्या मुलींच्या दुःखाची किनार वेगळी आहे का?

 

पाकिस्तानमध्ये तर एका याचिकेवर सुनावणी करण्यात आली की, आपल्या पत्नीला सुधारण्यासाठी (म्हणजे पतीच्या सोईला अनुसरून) पती-पत्नीची ‘हलकी धुलाई’ करू शकतो. तिला मारझोड करू शकतो. तसेही पाकिस्तानमध्ये काही गुन्ह्यांच्या साक्षीदार म्हणून एका महिलेची साक्ष पुरुषाच्या साक्षीच्या अर्धी म्हणून गृहित धरली जाते. याचाच अर्थ एका महिलेच्या साक्षीला महत्त्वाची नाही. इजिप्त आणि सीरियामध्ये एक कायदा आहे की, पुरुषाला वाटले की, त्याची संबंधित नातेवाईक महिला त्याला फसवत आहे किंवा तिचे विवाहबाह्य लैंगिक संबंध आहेत, तर त्याने त्या महिलेचा खून केला तरी तो विशेष गुन्हा नाही. रशियामध्ये दर ४० मिनिटाला घरगुती हिंसेमध्ये महिलेचा मृत्यू होतो. मात्र, रशियामध्ये स्त्रियांबाबत होणारी घरगुती हिंसा हा अदखलपात्र गुन्हा आहे.

 

बलात्कार हा तर जगाच्या पाठीवर महिलांबाबत होणारा प्रथम क्रमांकाचा अन्याय आणि गुन्हा. पण, याबाबतही प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळेच. सध्या भारतीय कायद्याने बलात्कार या गुन्ह्याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली आहे. मात्र, तरीही १५ वर्षांवरील पत्नीबरोबर पती लैंगिक संबंध ठेवू शकतो. तो गुन्हा ठरत नाही. अर्थात, या कायद्याला दुसरे अनेक पदरही आहेत. जसे भारतीय कायद्यात मुलीचे विवाहाचे वय १८ वर्षे आहे, तर मग १५ वर्षांमध्ये एखादी मुलगी कुणाची ‘पत्नी’ म्हणून कायदेशीर दर्जा कसा प्राप्त करू शकते? बरं, १८ वर्षे वयाखालील मुलीशी लग्न केले आणि तिच्या मर्जीशिवाय तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले तर? तर तोही गुन्हा नाही का? असो, लेबनॉन या देशामध्ये बलात्कारित महिलेशी तिच्यावर बलात्कार करणार्‍याने विवाह केला तर त्यावरचा बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यात येतो. अमेरिकेमध्ये बलात्कारामुळे जन्माला येणार्‍या बालकांवर बलात्कार करणारा नराधम पालकत्वाचा हक्क कायदेशीरपणे सांगू शकतो.

 

मुस्लीम राष्ट्रांमध्ये तर महिलांना खतनापद्धती विरुद्ध आवाजही उठवता येत नाही. इजिप्त या पिरॅमिडच्या देशामध्ये ९० टक्के महिलांना खतना रूढीचे दुःख भोगावे लागत आहे. जगभरात स्त्री-पुरुष असमानतेचे कंगोरे विविध अंगाने परावर्तित होताना दिसतात. इंडोनेशिया हा तसा परिचित देश. या देशामध्येही स्त्री-पुरुष समानतेचा गजर होतच असतो. मात्र, या देशामध्ये महिला कामगाराला (मग कोणत्याही क्षेत्रातली) पुरुष कामगारापेक्षा ३० टक्के वेतन कमी मिळणार, असा अलिखित नियमच झाला आहे. अफगाणिस्तान आणि येमेनमध्ये पिता-पती-पुत्राशिवाय महिला एकट्या घराबाहेर पडू शकत नाही, तर ट्युनिशियामध्ये मुलीपेक्षा मुलाला संपत्तीचा वाटा दुप्पट मिळतो. महिलांचे माणूसपण नाकारताना जगभरात विविध कायदे रूढी-धर्म आणि तिथल्या भौगोलिक संस्कृतीचे संदर्भ घेत आपली भूमिका कशी योग्य आहे, हे सांगत असतात. हे सगळे मांडत असताना, इथे स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा अपेक्षित नाही, तर वाटते की समानता नको, केवळ माणूस म्हणून जगण्याची बरोबरीची संधी तरी महिलांना मिळायला हवी. विवाह, बलात्कार, हिंसा, अपत्य, वारसा हक्क, संपत्ती यासंदर्भातील कायद्यांमध्ये महिलांचा महिला म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून विचार केला जाईल काय? मुक्ती-समता-विद्रोह वगैरेंची बडबड करणारी जगभरातील तथाकथित पुरोगामी मंडळी लक्ष देतील का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat